एक चेहरे पे कईं चेहरे.... (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 ऑगस्ट 2017

भारतीय समाजातील सहिष्णुतेची भावना देशातील राजकीय स्थित्यंतरानंतर झपाट्याने लयास जाऊ लागली आहे, याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आता देशातील सर्व उच्च पदांवर संघपरिवारातील नेते विराजमान झाल्यानंतर मोदी, तसेच नायडू यांनी केलेल्या वक्‍तव्यांमुळे भाजपचे उच्चपदस्थ नेते वास्तवाकडे कशी पाठ फिरवू पाहत आहेत, याचेच दर्शन घडले आणि त्यामुळेच ते आजवर कसा वेगळाच मुखवटा परिधान करून राजकारण करत होते, तेही अधोरेखित झाले आहे.

हमीद अन्सारी यांचे वक्तव्य हे अल्पसंख्याक समाजाच्या भावनांचे प्रतीकात्मक उद्‌गार समजून त्याची गंभीर दखल घ्यायला हवी. त्याऐवजी त्यांना थेट प्रत्युत्तर दिल्याने सत्ताधारी वास्तवाकडे कशी पाठ फिरवू पाहत आहेत, याचेच दर्शन घडले. 

भारतीय स्वातंत्र्याच्या सत्तराव्या वर्षी राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि लोकसभा अध्यक्ष या देशातील चार सर्वोच्च पदांवर संघपरिवारातील व्यक्‍ती विराजमान झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा आत्मविश्‍वास वाढणे, साहजिकच म्हणावे लागेल. मात्र, या आत्मविश्‍वासाचे रूपांतर हे अहंकारात तर होऊ पाहत नाही ना, अशी शंका पंतप्रधान नरेंद्र मोदी, नवनिर्वाचित उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू यांनी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी यांच्या निरोप समारंभात केलेल्या वक्तव्यांमुळे येऊ शकते.

अन्सारी यांनी निवृतीपूर्वी चारच दिवस आधी बंगळूरमधील 'नॅशनल लॉ स्कूल ऑफ इंडिया' विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात बोलताना देशातील अल्पसंख्याक म्हणजेच दलित, ख्रिस्ती, मुस्लिम यांच्यावर सध्याच्या वातावरणात उभ्या राहिलेल्या भयाच्या सावटाचा उल्लेख केला होता. त्यावर भाजपच्या बड्या नेत्यांकडून कोणतीही प्रतिक्रिया जाहीरपणे व्यक्‍त झाली नाही. मात्र, गुरुवारी त्यांच्या निरोप समारंभात बोलताना मोदी यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत टोलेबाजी करत अन्सारी यांना जाहीर आहेर दिला. 'आता तुम्ही मुक्‍त झाला आहात आणि तुम्हाला तुमच्या विचारसरणीनुसार बोलण्याचा अधिकारही प्राप्त झाला आहे!' असे उपरोधिक उद्‌गार मोदी यांनी काढले, तर नायडू यांनी अन्सारींना खडे बोल सुनावताना 'सध्या देशातील अल्पसंख्याक समुदायात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे, असे म्हणणे हा राजकीय प्रचाराचा भाग आहे,' असे वक्‍तव्य केले. हा सगळाच औचित्यभंग होता. 

मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने 2014 मध्ये लोकसभेत प्रथमच पूर्ण बहुमत मिळवल्यापासून देशातील अल्पसंख्याकांमध्ये, विशेषत: मुस्लिम समाजात असुरक्षिततेची भावना निर्माण होण्यास नेमक्‍या कोणत्या बाबी कारणीभूत ठरत आहेत, याची खरे तर अनेक उदाहरणे देता येतील. गोवंशमांस हा विषय देशाच्या अजेंड्यावर आला तो मोदी यांनी पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतरच आणि त्यानंतर झुंडशाहीने जमावबळी घेण्याचे प्रकार सुरू झाले. 2015 मध्ये दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या दादरी गावात महमद अखलाख याला घरात गोवंशमांस ठेवल्याच्या निव्वळ संशयावरून दगडांनी ठेचून मारण्यात आले. अलीकडेच जुनैद खान या 16 वर्षांच्या युवकासही अशाच पद्धतीने ठार करण्यात आले. दरम्यान, अशा अनेक घटना घडल्या असून, तथाकथित गोरक्षकांची दादागिरी आणि गुंडगिरी देशाच्या अनेक भागांत थैमान घालत आहे. त्यामुळे अन्सारी यांनी केलेले वक्तव्य हे खरे तर अल्पसंख्याक समाजाच्या भावनांचे प्रतीकात्मक उद्‌गार समजायला हवेत आणि त्याची गांभीर्याने दखल घ्यायला हवी. 

अन्सारी यांनी आपल्या भाषणात देशाचे एक सुप्रतिष्ठित राष्ट्रपती आणि अन्सारी यांच्याप्रमाणेच दहा वर्षे उपराष्ट्रपतिपद भूषवलेले डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या वक्‍तव्याचा दाखला दिला. 'देशातील अल्पसंख्याक समाजास आपण किती आणि कशी सुरक्षितता देतो, यावरूनच त्या देशातील लोकशाहीचे मूल्यमापन करता येते,' हे राधाकृष्णन यांचे उद्‌गार खरे तर आजच्या विद्वेषाची दुही माजलेल्या वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर महत्त्वाचे आहेत. मात्र, नायडू यांना तसे वाटत नाही. त्यांच्या मते आज भारतात अल्पसंख्याक जेवढे सुरक्षित आहेत, तेवढे क्‍वचितच अन्य देशांत असतील. देशात असहिष्णुतेची भावना वाढत चालली आहे, हेही नायडू यांना मान्य नाही. 'सहिष्णुतेच्या भावनेमुळे आजवर या देशातील लोकशाही सुरक्षित राहिली आहे,' या नायडू यांच्या वक्‍तव्यात मात्र तथ्य आहे. तथापि, भारतीय समाजातील हीच सहिष्णुतेची भावना देशातील राजकीय स्थित्यंतरानंतर झपाट्याने लयास जाऊ लागली आहे, याकडे ते जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे आता देशातील या सर्व उच्च पदांवर संघपरिवारातील नेते विराजमान झाल्यानंतर मोदी, तसेच नायडू यांनी केलेल्या या वक्‍तव्यांमुळे भाजपचे उच्चपदस्थ नेते वास्तवाकडे कशी पाठ फिरवू पाहत आहेत, याचेच दर्शन घडले आणि त्यामुळेच ते आजवर कसा वेगळाच मुखवटा परिधान करून राजकारण करत होते, तेही अधोरेखित झाले आहे.

Web Title: marathi news marathi website Hamid Ansari Muslim Narendra Modi