लष्कराचे यश, राजकीय अपयश (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 ऑगस्ट 2017

काश्‍मीरमध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम चालू ठेवण्याबरोबरच राजकीय आघाडीवरही प्रयत्न करणे गरजेचे आहे. तेथील सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा एकमेव उपाय संवाद हाच आहे, हे मोदी सरकारने लक्षात घ्यायला हवे. 
 

काश्‍मीरमध्ये दहशतवादी कारवाया करणारा "लष्करे तैयबा'चा म्होरक्‍या बुऱ्हान वणी चकमकीत मारला गेल्यानंतर वर्षभरात याच संघटनेचा आणखी एक म्होरक्‍या अबू दुजाना आणि त्याचा एक साथीदार सुरक्षा दलांच्या कारवाईत ठार झाले आहेत. त्यामुळे "लष्करे तैयबा'चे कंबरडे मोडले गेले असले, तरी काश्‍मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवायांना आळा बसू शकेल काय, याबाबत शंका आहे. त्याचे कारण पुलवामा येथे दुजाना लपलेल्या घराजवळ चकमक सुरू असताना जमावाने जवानांवर केलेल्या दगडफेकीतून स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ बुऱ्हान वणी मारला गेल्यानंतर शांतता प्रस्थापित होण्याऐवजी खोऱ्यात कित्येक महिने हिंसाचार सुरू होता, त्याचप्रमाणे आताही भडका उडण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

खरे तर भारतीय लष्कराच्या तळांवर गेल्या एक-दीड वर्षात झालेल्या हल्ल्यांचा आणि बॅंकांवरील दरोड्यांचाही दुजाना हा सूत्रधार होता. तरीही त्याला स्थानिक जनतेची सहानुभूती मिळण्यामागील कारणे वेगळी आहेत. दुजाना हा पाकिस्तानव्याप्त काश्‍मीरमधील नागरिक होता. बाल्टिस्तानातील गिलगिट हे त्याचे मूळ गाव. दुजानाने पुलवामा जिल्ह्यातील एका युवतीशी विवाह केला होता आणि तिला भेटण्यासाठी तो लपून-छपून पुलवामात आला होता. त्याची खबर गुप्तचर यंत्रणांना मिळाली आणि त्यांनी ती लष्करापर्यंत पोचविल्याने दुजानाला संपविणे शक्‍य झाले. दहशतवाद्यांना "जशास तसे' उत्तर देण्याच्या भूमिकेतून लष्कराने सुरू केलेल्या घणाघाती मोहिमेत मारला गेलेला दुजाना हा गेल्या आठ महिन्यांतील 115 वा दहशतवादी आहे. बुऱ्हान वणीच्या मृत्यूनंतर "लष्करे तैयबा' संघटनेतील त्याची जागा घेणाऱ्या सबझार अहमद भट आणि त्याच्या दोन साथीदारांचा दोनच महिन्यांपूर्वी लष्कराने खातमा केला होता. त्यानंतर लष्कराला मिळालेले हे मोठे यश आहे. 

मात्र, या कारवाईमुळे पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादी संघटना आणि विशेषत: "लष्करे तैयबा' यांच्या आणखी एका "मोडस ऑपरेंडी'वर प्रकाश पडला आहे. अनेक पाकिस्तानी दहशतवादी आणि प्रामुख्याने त्यांचे म्होरके हे काश्‍मिरी युवतींच्या प्रेमात पडतात आणि सीमेला लागून असलेल्या पुलवामा व अन्य जिल्ह्यांतील या युवती त्यांच्या "धाडसी' कृत्यांवर मोहित होऊन, त्यांच्याशी विवाह करून मोकळ्या होतात. त्यांना भेटण्यासाठी हे दहशतवादी अशा प्रकारे चोरून भारतात येतात. दुजानाला ठार करण्यात लष्कराला यश आले, ते त्यामुळेच. त्याशिवाय आणखी एक बाब म्हणजे दुजानाबरोबर ठार झालेला स्थानिक दहशतवादी अरिफ हा अवघ्या 15 वर्षांचा होता.

उत्तम क्रिकेट खेळणारा अरिफ दोन वर्षांपूर्वी क्रिकेटचे सामान घेऊन घरातून बाहेर पडला आणि पुढे त्याचा थांगपत्ताच लागला नाही. तो दहशतवादी संघटनेत सामील झाला होता, हे आता समोर आले आहे. खोऱ्यातील कोवळ्या मुलांची दिशाभूल करून त्यांना दहशतवादाकडे आकर्षित करण्याचे दहशतवादी संघटनांचे प्रयत्न कसे सुरू आहेत आणि काश्‍मिरी जनता अद्यापही दहशतवाद्यांना कशी साथ देत आहे, या बाबी या घटनेतून पुन्हा एकदा ठळकपणे पुढे आल्या आहेत. बुऱ्हान वणीच्या मृत्यूनंतर पेटलेले काश्‍मीरचे खोरे आठ-दहा महिने विझू शकले नव्हते आणि आताही दुजानाच्या मृत्यूनंतर सुरू झालेली निदर्शने व जवानांवरील दगडफेक बघता, त्याचीच पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता आहे. दुजाना आणि त्याचा साथीदार अरिफ चकमकीत ठार झाल्याचे वृत्त पसरताच, फुटीरतावादी नेत्यांना दिलेल्या "बंद'च्या हाकेला पुलवामा आणि परिसरातील जनतेने दिलेला जोरदार प्रतिसादही हेच सांगत आहे. त्यामुळे सुरक्षा दलांना अधिक दक्ष राहून परिस्थिती नियंत्रणाखाली आणावी लागेल.

खबरदारीचा उपाय म्हणून खोऱ्यातील मोबाईल फोन सेवा तूर्तास बंद करण्यात आली आहे. मात्र, अशा थातूरमातूर उपायांनी आणि विशेषत: इंटरनेट व मोबाईल सेवेवर बंदी लादून हा प्रश्‍न सुटणार नाही. खरा प्रश्‍न दहशतवाद्यांना असलेल्या स्थानिक जनतेच्या सहानुभूतीचा आहे. गेली काही वर्षे काश्‍मीर खोऱ्यातील हिंसाचार रोखण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर लष्कर तैनात करावे लागले आहे. शिवाय, फुटीरतावादी नेत्यांशी कोणत्याही प्रकारचा संवाद करायचा नाही, या मोदी सरकारच्या भूमिकेमुळे तणाव कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. खोऱ्यातील सर्व प्रकारच्या मतप्रवाहाच्या नेत्यांशी सुसंवाद साधण्याच्या वाजपेयी सरकारच्या भूमिकेला मोदी सरकारने दिलेल्या तिलांजलीमुळे गेल्या वर्षभरात तेथील परिस्थिती अधिकच बिघडत चालली आहे. त्यामुळे केवळ अमूक इतक्‍या दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची मिरवलेली शेखी प्रसारमाध्यमांत ठळक बातमी होण्यापलीकडे त्यातून फार काही हाताला लागणार नाही. या पार्श्‍वभूमीवर भारतीय जनता पक्षासमवेत जम्मू-काश्‍मीरमध्ये सरकार बनवणाऱ्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या अलीकडच्या विधानाचा गांभीर्याने विचार करावा लागेल. "काश्‍मिरी जनतेला मिळालेले विशेषाधिकार काढून घेण्याचा प्रयत्न झाला, तर येथे तिरंगा फडकू शकणार नाही,' असे त्या म्हणाल्या होत्या. तेव्हा दहशतवाद्यांच्या विरोधात मोहीम चालू ठेवण्याबरोबरच राजकीय आघाडीवरही प्रयत्न करणे गरजेचे आहे. काश्‍मीरच्या सध्याच्या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा एकमेव उपाय संवाद हाच आहे.

Web Title: marathi news marathi website Kashmir News Kashmir Unrest