स्वप्नाची पूर्ती की चुराडा? (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जुलै 2017

आता उद्धव ठाकरे यांनी एकाच वेळी मुख्यमंत्री आणि शेतकरी या दोहोंच्याही स्वप्नपूर्तीसाठी झटण्याचा निर्णय घेतल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनाही त्याच 'महामार्गा'ने जावे लागणार! 

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मनीचे स्वप्न आजमितीला नेमके काय आहे, ते खरे तर सर्वांनाच ठाऊक आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मनीचे स्वप्न तर एकच आहे आणि ते म्हणजे नागपूर-मुंबई 'समृद्धी' महामार्ग होता होईल, तेवढी किंमत देऊन पूर्ण करणे! मुख्यमंत्र्यांच्या नेमक्‍या याच स्वप्नाला उद्धव गेले काही महिने प्राण पणाला लावून विरोध करत होते; पण त्याहीपेक्षा महत्त्वाची बाब म्हणजे हा मार्ग ज्या भागातून जाणार होता, त्या मार्गावरील बहुसंख्य शेतकऱ्यांचा त्यासाठी आपल्या जमिनी देण्यास तीव्र विरोध होता. त्यासाठी अनेक ठिकाणी शेतकऱ्यांनी मोर्चेबांधणीही केली होती आणि आंदोलनेही झाली होती. त्यापैकी सर्वांत मोठा विरोध हा ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्‍यातील शेतकऱ्यांचा होता.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनास अर्थातच शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा होता. गेल्या काही महिन्यांपासून हमीभाव आणि कर्जमाफीसाठी राज्यभरात शेतकऱ्यांनी उभ्या केलेल्या आंदोलनासही शिवसेनेचा पाठिंबाच होता. अखेर फडणवीस यांना कर्जमाफी जाहीर करणे भाग पडले, तेव्हा तर 'आम्ही या आंदोलनात असल्यामुळेच कर्जमाफी जाहीर करणे, सरकारला भाग पडले!' अशा गमजाही उद्धव यांनी मारल्या होत्या. तेव्हा आता या 'समृद्धी' आंदोलनातही, उद्धव हेच आपल्या जमिनी वाचवतील, अशी भाबडी आशा काही शेतकऱ्यांच्या मनात होती. मात्र, गेल्या शुक्रवारी अघटितच घडले. नागपुरात समृद्धी महामार्गाच्या भूमी अधिग्रहणाचा सोहळा मोठा गाजावाजा करून पार पडला आणि हिंगणे तहसील कार्यालयात या महामार्गासाठीचे पहिले जमीन खरेदीखत नोंदवण्यात आले, त्या वेळी शिवसेनेचे नेते आणि फडणवीस सरकारमधील एक मंत्री एकनाथ शिंदे केवळ जातीने उपस्थितच राहिले नाहीत, तर त्यांनी साक्षीदार म्हणून या खरेदीखतावर आपल्या डाव्या हाताचा अंगठाही उमटवला. त्यामुळे आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वप्नपूर्तीचा मार्ग मोकळा झाला आहे, असे मानण्यास हरकत नसावी! 

त्यानंतरच्या अवघ्या 24 तासांत शहापूर तालुक्‍यातील तीन शेतकरीही पुढे आले आणि पुन्हा एकवार एकनाथ शिंदे यांच्याच साक्षीने त्यांनी आपल्या जमिनी सरकारच्या हवाली केल्या. त्यामुळे अपेक्षेप्रमाणेच शिवसेना आणि स्वत: उद्धव यांनी या प्रश्‍नावरही कोलांटउडी घेतली काय, असा प्रश्‍न राज्यभरातील तमाम शेतकरी तसेच मूढ जनतेच्या मनात उभा राहू शकतो. मात्र, तसे बिलकूलच झालेले नसून, 'आपले स्वप्न साकारताना इतरांच्या स्वप्नांचा चुराडा करता कामा नये!' असे स्वत: उद्धव यांनीच ठणकावून सांगतले आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. शेतकरी जमीनविक्रीस तयार नव्हते, तेव्हा शिवसेना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटत होती आणि आता काही शेतकरी जमीनविक्रीस तयार झाल्यामुळे शिवसेनेला त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटणे भाग पडले आहे! अर्थात, उद्धव काही कच्च्या दमाचे खेळाडू नाहीत. त्यामुळेच, 'समृद्धी महामार्गासाठी शेतकऱ्यांवर कोणतीही जबरदस्ती करून जमिनी घेतल्या जाऊ नयेत,' असा सणसणीत इशाराही त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे. आता कोणी शेतकऱ्यांचा या महामार्गासाठी जमिनी देण्यास विरोध असतानाही, खरेदीखताच्या व्यवहारास एकनाथ शिंदे यांनी साक्षीदार व्हावे, ही शिवसेनेची दुटप्पी भूमिका आहे, असे म्हणेलही. मात्र, तसे बिलकूलच झालेले नाही; कारण शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांची नाराजी दूर करण्यास सरकार तयार असल्याचे, शिंदे यांनी स्वत:च सरकारच्या वतीने सांगून टाकले आहे.

शिवाय, आपण याप्रकरणी उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेनुसार आणि सूचनेप्रमाणेच काम करत आल्याचेही त्यांनी सांगून टाकले आहे. आता कोणी 'इतके दिवस ही नाराजी दूर करण्यास शिंदे वा सरकार यांना कोणी रोखले होते?' असा सवाल विचारेलही; पण शिवसेनेच्या आजच्या राजकारणात तो फिजूल आहे. 

अर्थात, यामुळे खरी पंचाईत झाली असणार ती शिवसेनेच्या आमदारांचीच! प्रस्तावित 'समृद्धी महामार्ग' ज्या दहा जिल्ह्यांतून जातो, तेथे शिवसेनेचेच सर्वाधिक आमदार आहेत. उद्धव यांनी केवळ शेतकऱ्यांच्या हितासाठी या महामार्गाच्या विरोधात घेतलेली भूमिका बघून हे आमदारही विधानसभेत शेतकऱ्यांच्याच बाजूने उभे ठाकले होते. महामार्गासंबंधीच्या अन्य बैठकांमध्येही त्यांनी आपला विरोध स्पष्टपणे नोंदवला होता. आता उद्धव यांनी एकाच वेळी फडणवीस आणि शेतकरी या दोहोंच्याही स्वप्नपूर्तीसाठी झटण्याचा निर्णय घेतल्यामुळे, या आमदारांनाही त्याच महामार्गाने जावे लागणार, यात शंका नाही!

अर्थात, आपल्या नेत्याने सर्वांच्याच स्वप्नपूर्तीसाठी काम करावयाचे ठरवल्याने मग या आमदारांच्या स्वप्नांचा चुराडा झाला तर त्यात विशेष ते काय! -आणि या आमदारांनाही अशा प्रकारे इतरांच्या स्वप्नपूर्तीसाठी झटण्याची गेल्या दोन-अडीच वर्षांतील उद्धव यांची 'कामगिरी' बघून सवयही झाली असणार. त्यामुळे आता दोन गोष्टी नक्‍की झाल्या. एक म्हणजे आता हा महामार्ग होणार आणि त्याचबरोबर शेतकरीही सरकार देऊ पाहत असलेल्या भरमसाट दरामुळे शेतकरीही 'समृद्ध' होणार! तरीही कोणी या महामार्गास विरोध करू पाहत असतील, तर त्यांच्या स्वप्नांचा चुराडा होणार, यात आता तीळमात्र शंका उरलेली नाही, हे सर्वांनीच लक्षात घ्यायला हवे; कारण आता फडणवीस यांच्या स्वप्नपूर्तीसाठी शिवसेना आणि उद्धव ठाकरे हे जातीने त्यांच्या पाठीशी उभे ठाकलेले आहेत.

Web Title: marathi news marathi website Shiv Sena Uddhav Thackray Devendra Fadnavis