पुढचं पाऊल! (ढिंग टांग!)

पुढचं पाऊल! (ढिंग टांग!)

(अर्थात पुन्हा सदू आणि दादू...) 

एक खोली. खोलीच्या दोन टोकांना दोन सिंगल खाटा...एकावर हात उशाला बांधून दादू शेषशायी पडला आहे, तर दुज्या खाटेवर सदूने विश्‍वचिंता आरंभली आहे. काळ गोठलेला. आता पुढे... 
दादू : (डोळे मिटून) सद्याऽऽऽ... 
सदू : (डोळे मिटूनच...) अंऽऽऽ...? 

दादू : (प्रेमाने) काय करतोयस? 
सदू : (गोंधळून) काय म्हंजे? तुझ्याशी बोलतोय!! 

दादू : (खंतावून) कुठे बोलतोयस? बोलतोस तेव्हा रागावून तर बोलतोस! 
सदू : (दीर्घश्‍वसनाचा बेत रचत) हंऽऽ... 

दादू : (डोळे मिटलेलेच...) हं काय हं!! बाय द वे, तुझी रास काय आहे रे? 
सदू : (पुन्हा डोळे मिटत) काय माहीत? माझा काही भविष्यावर विश्‍वास नाही!! 

दादू : (मिटल्या डोळ्यांनीच...) आज माझ्या भविष्यात 'कराल ते होईल' असं लिहून आलंय...तुझ्या? 
सदू : (सुस्कारा टाकत) माझ्या भविष्यात 'होईल ते कराल' असंच आलं असणार! 

दादू : (दीर्घ श्‍वास घेत) कशावरून? 
सदू : (श्‍वास सोडत) गेली कित्येक वर्षं तेच चालू नाही का? 

दादू : (सहज विचारल्यागत) तू पाच तारखेला खरंच चर्चगेटला जाणारेस? 
सदू : (घुश्‍शात) अर्थात! 

दादू : (शहाजोगपणाने सल्ला देत) तिकीट काढून जा! 
सदू : (भडकून) आयुर्विम्याच्या हपिसात नाही चाललो मी! मोर्चा काढतोय, मोर्चा!! 

दादू : (निर्ममपणे) जपून जा!! रस्त्यात 'खळ्ळखटॅक' करायला स्कोप असतो! रेल्वेत तसं काहीही नाही! गाडीला टायरं नसतात!!..आणि चर्चगेट हा काही टोल नाका नव्हे!! कळलं ना? 
सदू : (वैतागून) ते मी बघून घेईन! रेल्वे अधिकाऱ्यांशी चर्चा करायची आहे आम्हाला!! 

दादू : (खिजवत) म्हंजे त्याला चर्चागेट म्हणा!! हाहा!! 
सदू : (आंबट चेहऱ्याने) शी:!! भिक्‍कार विनोद!! 

दादू : (अचानकपणे) सद्या, समजा उद्या बुलेट ट्रेन आली आणि गेली तुझ्या परसातून...तर? 
सदू : (झिडकारून) तरीही माझ्या भुंड्या हाताला खुंट फुटणार नाही, असं पुलं देशपांडेंसारखं म्हणायचं असणार तुला! अंतू बरवा सोडून तू काही वाचलेलं दिसत नाहीस त्यांचं!! आणि कृपा करून सारखे बुलेट ट्रेन, बुलेट ट्रेन करू नका! वीट आलाय मला त्याचा!! 

दादू : (गालातल्या गालात हसत) म्हणूनच बुलेट ट्रेनची वीट रचू देणार नाही, असा इशारा दिलास ना? 
सदू : (विषण्ण होत) दादूराया, असले पांचट विनोद करणं कधी थांबवणार आहेस? 

दादू : (मिटल्या डोळ्यांनीच हात उडवत) तुला जे पांचट विनोद वाटतात, ते माझ्या मराठी माणसासाठी विचारांचं सोनं असतं, सद्या! अद्रक क्‍या जाने बंदर का स्वाद? 
सदू : (मिटल्या डोळ्यांवरती आठ्या...) पुन्हा चुकलास! दसऱ्याच्या भाषणातसुद्धा 'कमळ नाही, मळच आहे' किंवा 'असून सत्ता, कारभार बेपत्ता...किंवा 'गाईला जपायचं, ताईला झोडायचं...' ही असली काहीतरी यमकं जुळवत राहिलास? शोभतं का तुला? 

दादू : (छद्मीपणाने) तुला नाही कळायची त्यातली गंमत! ओघवतं वक्‍तृत्व म्हंटात त्याला!! 
सदू : (डुलकी लागल्यागत) घुर्रर्र...! 

दादू : (मिटलेल्या डोळ्यांनीच) झोपलास की काय रे! 
सदू : (उत्तर देत) अगदी गाढ...घुर्रर्र! 

दादू : (जरासं खाकरुन) बरं...पुढे काय करायचं ठरवलं आहेस? 
सदू : (गाढ झोपी जात) घुर्रर्र!! तू? 

दादू : (बिनधास्तपणे) मी ठरवून काहीच करत नाही! आपल्या हातात काय आहे? 
सदू : (पिन मारत) तुझा तो सिंधुदुर्गातला शत्रू येतोय म्हणे मंत्रिमंडळात! 

दादू : (हात झटकत) येऊ दे नाही तर जाऊ दे! आपल्याला काय करायचंय? आपलं ठरलंय- 
सदू : (झोपेतच) काय? 

दादू : (डोक्‍यावरून पांघरुण घेत) घुर्रर्र!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com