महाबळेश्‍वरची रणभेरी! (ढिंग टांग)

महाबळेश्‍वरची रणभेरी! (ढिंग टांग)

कटकातील काही फितुरांनी फंद केलियाने महाराजांच्या गुप्त महाबळेश्‍वर मोहिमेची वार्ता चौदिशांस फुटली. चार तोंडे चौ दिशी गेली. भिंतीस कान फुटलें. अत: गनिम सावध जाहला. फंदफितुरी हा तो मऱ्हाटी मुलखास लाभलेला पुरातन शाप! अहह!! 

मऱ्हाटी रयतेसाठी क्षण नि क्षण वेंचणाऱ्या, अहर्निश झटणाऱ्या मा. उधोजीमहाराजांस अचानक तकवा आला. कामें बहुत, जीव बेजार ऐसा मामला. अखेर वैद्यराजांनी हवापालटासाठी बाहेरग्रामी जाण्याचा सला दिधला. वस्तुत: वांदऱ्याच्या बालेकिल्ल्यात महाराजांचे मन आतिशय निश्‍चिंत होते. प्रंतु वेस वलांडणे क्रमप्राप्त ठरलें. आर्थात, सह्याद्रीचे दऱ्याखोरी हिंडण्यास प्रत्यक्ष महाराष्ट्रचालकास काय भय होय? अतएव श्रमपरिहारासाठी सहकुटुंब सहकबिला महाबळेश्‍वरी कूच करण्याची आज्ञा महाराजांनी केली. जावळी खोऱ्यातील जहागीरदार मा. अविनाशाजी भोसले हे महाराजांचे सन्मित्र. महाराजांनी त्यांस खलिता रवाना केला : ''...ऐसीयास काम बहुत पडिले. श्रम जाहला. तस्मात श्रमपरिहारासाठी आपल्या महाबळेश्‍वरी कोठीत वास्तव्य ठेवावे, असे साहेबमनीं आले आहे. तजवीज करावी. इति.'' त्यावर रा. भोसले ह्यांनी टांकोटांक लिहियले : ''उदईक यावयाचें, ते आजच यावें! जेवत असाल तर आंचवावयास यावे! जावळी आपलींच. महाबळेश्‍वरही आपलेंच. प्रतीक्षेत सदैव तिष्ठ. अविनाशाजी.'' साहेब निघाले... 

आपले कटक वाईमार्गे चढाई करेल, अशी आवई उठवोन देत साहेबांनी सफाईने थेट आंबेनळीचा घाट गाठला. उजव्या बगलेतील प्रतापगडाकडे पहात त्यांनी मोजक्‍या स्वारांसमवेत दौड मारिली. ''युवराज, उजवीकडे ती जागा बघोन ठेवा!,'' साहेब म्हणाले. 

''कोणाचा प्लॉट आहे?,'' युवराजांनी विचारिले. 

''प्लॉट?'' येवढेच बोलोन महाराज कष्टी जाहले. मजल दरमजल करीत त्यांनी कोठी गाठली. 

आराम फर्मावणार, इतक्‍यात कर्णकर्कश्‍श रणभेरी निनादल्या. सहस्त्र विजा एकसमयावच्छेदे कोसळाव्यात तैसा ध्वनि जाहला. कोठीभोवतीचें पहाऱ्यात हलकल्लोळ माजला. 

धावा! धावा! शत्रूने डाव साधिला! हमला, हमला!' ऐश्‍या आरोळ्या उमटल्या. महाबळेश्‍वरीच्या दऱ्याखोऱ्यात नव्या जुझांस तोंड फुटल्याचा माहौल जाहला. 

महाराज सदैव सावध असताती. किंबहुना, त्यांजसारिखा अष्टावधानी राजा उभ्या त्रिखंडात जाहला नाही. वेगाने उशाकडील तलवार उपसोन महाराज त्वेषाने उभे राहिले. म्हणाले : त्वरा करा! गनिमाने हमला केला आहे! आपल्या छावणीची वार्ता कोण्या फंदफितुराने दगलबाजी करोन फोडिली आहे! माझ्या सवंगड्यांनो, महाराष्ट्राचे रक्षण करण्याची हीच खरी वेळ, हाच तो क्षण! चला, आपण शत्रूवर तुटोन पडू या!!'' 

महाराजांच्या बोलांनी पहाऱ्यावरील मावळ्यांमध्ये बारा हत्तीचे बळ संचारले. बारा हत्ती म्हंजे प्रत्येकी बारा हत्ती!! सर्व मिळून बारा हत्ती नव्हे!! 'हर हर हर हर महादेव' ऐसा युद्धघोष करत मोजके मावळे शत्रूच्या बिनीच्या फौजेकडे दौडोन गेले... 

इकडे महाराजांनी तत्परतेने चिलखत परिधान केले. हाती तळपती तेग घेतली. डाव्या हातीं ढाल धरिली, आणि खांद्यावर अमोघ, अजेय, अक्षय्य धनुष्यबाण!! काय मूर्त दिसत होती, इतिहासास सांगवत नाही!! 

रणभेरीच्या दिशेने महाराज घोडियास टांच मारणार, इतुक्‍यात एक मावळा सांगत आला,'' साहेब, साहेब! वाईच थांबा!'' 

''वाईत कशाला? इथेच लढणार!! आक्रमण जाहले म्हणोन गड सोडणारी औलाद आमची नव्हे!!'' गरागरा डोळे फिरवत महाराज म्हणाले. 

''वाईत नव्हं हो साहेब! जरा थांबा, म्हनलं म्या!!,'' मावळ्याने खुलासा केला. महाराजांनी प्रश्‍नांकित चर्येने (पक्षी : काही टोटल न लागल्याने) त्याच्याकडे पाहिले. 

''जुझबिझ काई बी न्हाई! बगलेतल्या हाटिलात डीजे लावलाया!! ढोल-नगारा, साउंड सिस्टम कंप्लीट जामानिमा आहे!!..गनिम फिनिम काई न्हाई! उगा पळापळ झाली बगा!!'' मावळा हांसत म्हणाला. 

''अस्सं? आम्ही इथे मौजूद असताना इतुके ध्वनिप्रदूषण? बंद करा तो डीजे ताबडतोब!'' महाराज कडाडले, ''...आणि हो, त्या मस्तवाल हाटेलाला आधी टाळे ठोका!'' 

इत्यलम.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com