आदर्श आचरणाची आठ कलमे! (ढिंग टांग!)

आदर्श आचरणाची आठ कलमे! (ढिंग टांग!)

कमळ भवन, कमळाध्यक्ष कक्ष, 
11, अशोका रोड, 
न्यू डेल्ही, 110001. 

प्रत रवाना : 1. प्रात:स्मरणीय, 
अजेय सर्वसाक्षी सर्वव्यापी 
श्री नमोजी हुकूम. 
2. कमलमित्र कमलतारक 
श्रीमान मणिशंकरजी अय्ययोर. 

श्री. अमितशाहजी (मोटाभाई) ह्यांच्या मेजावरून. 
(अत्यंत तातडीचे आणि गोपनीय) 

भारतवर्षातील सर्व मुख्यमंत्र्यांसाठी- 

सर्वांना सतप्रतिसत प्रणाम अने नववर्षनीं अनेकोनेक सुभेछाओ. 

आपल्या सर्वांना खबर असेल की केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 'आदर्श आचरण नियमावली' जारी करण्यात आली असून त्यातील नियमानुसारच हरेक कर्मचाऱ्याला नोकरी करावी लागणार आहे. सरकारी धोरणे, सरकारी नेते, अधिकारी ह्यांच्याविरोधात कुठलीही टिकाटिप्पणी सरकारी बाबूलोकांना यापुढे करता येणार नाही, तसेच निवडणुकीत कुणाच्या बाजूने किंवा विरोधात प्रचारदेखील करता येणार नाही. तसे आढळून आल्यास योग्य ती कारवाई करण्यासाठी सेपरेट खोली प्रत्येक सरकारी कचेरीत तयार करण्यात येत आहे. तसेच पोकळ बांबूंचा पुरेसा साठा सर्व सरकारी आस्थापनांमध्ये असेल, ह्याची दक्षता घेण्यात येत आहे. 

विशेष म्हणजे सरकारी बाबूलोकांच्या 'आदर्श आचरण नियमावली'बरोबरच मुख्यमंत्र्यांसाठीही 'आदर्श मुख्यमंत्री आचरण नियमावली'देखील तयार करण्यात आली आहे. आपल्याला हे माहीत असेलच की मा. नमोजींच्या कृपेने गेल्या साडेतीन वर्षात आपल्या कमळ पक्षाला देशभरात भरीव यश मिळाले आहे. एकेकाळी आपल्या कार्यकर्त्यांना एस्टीचा कंडक्‍टरही खाली उतरवत असे, पण आज आपल्या पक्षाची तब्बल 19 राज्यात सत्ता आहे. फक्‍त सहा-सात राज्ये उरली आहेत. लौकरच संपूर्ण देश कोंग्रेसमुक्‍त करून कमळ संस्कृती फुलणार आहे. केंद्रशासित प्रदेशातही आपलीच सत्ता असावी, असा प्रयत्न आहे. त्यासाठीच आपल्या मुख्यमंत्र्यांसाठी आचरण नियमावली तयार करण्यात आली आहे. ती पूर्ण वाचावी व त्यानुसार आचरण करावे, ही सूचना आहे. पोकळ बांबूंची व्यवस्था व पुरवठा सर्व विभागीय पक्षकार्यालयांकडे करण्यात येईल. 

1. प्रत्येक मुख्यमंत्र्याने किमान तीन नमोकुर्ते व दोन नमोजाकिटे शिवून तयार ठेवावीत. 
2. मुख्यमंत्र्यांनी कोणत्याही परिस्थितीत परस्परांमध्ये जाकिटे व कुर्त्यांची अदलाबदल करू नये. त्यासाठी कॉलरीच्या ठिकाणी स्वत:चे नाव विणून घ्यावे. त्याची वेळोवेळी तपासणी केली जाईल. 
3. नमोकुर्ते व नमोजाकिटे हमेशा धुऊन इस्तरी केलेल्या अवस्थेत असावीत. अंगावरचा कुर्ता व जाकिट जमेस धरण्यात येणार नाही, ह्याची नोंद घेणेचे करावे. 
4. सर्व राज्यात मुख्यमंत्री झाले की दर काही महिन्यांनी कुठे ना कुठे शपथविधी समारंभ होणारच. त्याला न चुकता हजर राहावे. हेच मुख्यमंत्र्याचे पहिले कर्तव्य आहे. बाकी कारभार दुय्यम मानावा. 
5. देशभरात जेथे कोठे शपथविधी असेल, तेथे स्वखर्चाने यावयाचे आहे. बिले पक्ष मुख्यालयास पाठवू नयेत, तसेच सिकनोटचाही विचार केला जाणार नाही, ह्याची नोंद घ्यावी. 
6. शपथविधी हा एक पवित्र समारंभ असतो. शपथेचे एकवेळ सोडा, पण तो समारंभ असतो हे सदैव लक्षात ठेवावे. समारंभ म्हणजेच इव्हेंट! 
7. जो मुख्यमंत्री सर्वाधिक शपथविधी समारंभ अटेंड करील, त्याला आदर्श मुख्यमंत्री पुरस्कार प्रदान करण्यात येईल. हादेखील एक मानाचा इव्हेंटच असेल. 
आणि शेवटचे आणि महत्त्वाचे कलम... 
8. जो कोणी राज्याराज्यांत होणाऱ्या शपथविधी समारंभांना 95 टक्‍के उपस्थिती राखणार नाही, त्याला केंद्रात बढती देण्यात येईल!! 
वरील नियमावलींचे तात्काळ पालन करणेचे आहे. कळावे. आपला. मोटाभाई.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com