विक्रमादित्याचे मौन! (ढिंग टांग!)

विक्रमादित्याचे मौन! (ढिंग टांग!)

विक्रमादित्याने हट्ट सोडला नाही. तो पुन्हा झाडापाशी गेला. झाडावर लटकणारा कबंध त्याने खेचून काढला. पाठुंगळी टाकून तो निघाला. त्याची वाटचाल सुरू होते न होते तोच, कबंधामध्ये असलेल्या वेताळाने संधी साधली आणि डांबरटासारखा हसून तो म्हणाला, 

''राजा, ऐक, मी तुला एक गोष्ट सांगतो. ती नीट ऐकून मला माझ्या प्रश्‍नाचे उत्तर दे.'' 

'अडलंय माझं खेटर...' असे विक्रमादित्य म्हणाला, पण मनातल्या मनात. चक्रवर्ती राजाला असली कोडी हल्ली कोण घालतो? आणि त्याने तरी अशा प्रश्‍नांना भीक कां घालावी? उमेदवारीच्या काळात विक्रमादित्य फक्‍त बोलत असे. गरजू लोक वेळेपरत्वे त्याच्यासमोर फक्‍त ध्वनिक्षेपक धरत असत. वेळ संपली की काढून नेत असत. विक्रमादित्याचा वाक्‍प्रवाह चालूच राहात असे. परंतु आता दिवस बदलले होते. तो राजा होता. दरबारात असता तर ह्या वेताळाला त्याने तोफेच्या तोंडीच दिले असते. सर्व राज्यावर ज्याची कर्तुम अकर्तुम सत्ता चालते, सर्व नागरिक ज्याचा कायम उदो उदो करत असतात, अशा विक्रमादित्याला कुणाचे उत्तरदायित्व मानण्याचे काहीच कारण नव्हते. साहजिकच तो काहीच बोलला नाही. म्हंजे साधे 'नो कॉमेंट्‌स' असेही म्हणाला नाही. 

वेताळ म्हणाला, ''ऐक, एक पुजारी होता. तो एकदा रानात गेला असता त्याला एक गुराखी दिसला. पाषाणाच्या उंच टेकाडावर बसून तो राजनीतीचे गूढगहन पाठ घडाघडा म्हणून दाखवत असे. पुजाऱ्याला अचंबा वाटला. एक साधा गुराखी, पण राजनीतीमध्ये इतका निपुण कसा?'' 

एवढे बोलून वेताळ खोकला. कुणाच्या पाठीवर उलटे टांगलेल्या अवस्थेत इतका वेळ पडून राहण्याने घशात ठसका येतो. एवढेच. इकडे राजा मनात विचार करत होता, 'हा चोर लेकाचा चंद्रगुप्त मौर्याची स्टोरी ढापून आपल्याला सांगतो आहे. शंभरवेळा ऐकलेली. त्याला काय उत्तर द्यायचे? हाड!' 

''सॉरी. ऐक... पुजाऱ्याने त्या गुराख्यास राजधानीत नेले. गडबडगुंडा करून क्रांति घडवली, आणि विद्यमान राजास कुटुंबकबिल्यासह विजनवासात पाठवले. राजपुत्र वैतागला, पण करील काय? तोही रानात गेला. इकडे पुजाऱ्याने त्या गुराख्यास सिंहासनावर बसवले. प्रजेला आनंद झाला. आपल्यातलाच एक गुराख्याचा पोर राजा झाला. राज्याभिषेक झाल्यावर दरबार भरू लागला. राजा एकेक पावले टाकीत दरबारात येई. सिंहासनावर बसे, आणि न्यायनिवाड्याची वेळ आली की नुसते 'हिर्रर्र...हिर्रर्र' दरबारीजन हैराण झाले. अशाने गुरे राखता येतील. पण राज्यकारभार कसा राखणार? दरबारीजनांना काळजीने पोखरले. पुजारीही हबकून गेला. आता कॅय क्रावे? शेवटी पुजाऱ्याने राजास एकांतात गाठून विचारले, 'हे राजन, रानात त्या टेकाडावर बसून तू जे ज्ञान पाजळत होतास, ते कोठे गवत खायला गेले? आता तुला काय झाले? तू मौनीबाबा कां झालास?'' 

पुन्हा एकदा कचकावून खोकत वेताळ पुढे म्हणाला, की राजा, त्यावर गुराख्याचा पोरगा ऊर्फ राजाने काय उत्तर दिले, हे तू मला सांगू शकतोस काय? म्हंजे सांगच. नाहीतर त्याचा परिणाम काय होईल, हे तुला माहीत आहेच. तुझ्या डोक्‍याची शंभर शकले होऊन ती तुझ्याच पायाशी लोळण घेऊ लागतील.'' 

...विक्रमादित्याला अर्थातच उत्तर ठाऊक होते. गुराख्याच्या ज्ञानाचे इंगित त्या पाषाणाच्या टेकाडात होते. तो पाषाण नेऊन सिंहासनाच्या जागी ठेवला तरी काम भागण्यासारखे होते. गुराख्याने तेच सांगितले असणार. हे तर साधे लॉजिक आहे. पण पुजारी खुळा होता. 

''सांग ना ए मौनीबाबा...'' वेताळ उतावीळ झाला होता. 

अखेर विक्रमादित्याने मौन सोडले. तो म्हणाला,''...अडलंय माझं खेटर!'' 

त्या क्षणी खदाखदा हसत वेताळाने त्याची पाठ सोडली आणि तो पुन्हा झाडावर जाऊन लोंबकळू लागला. 

इति.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com