रजनीकांत हा  नभी उगवला...(अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 1 जानेवारी 2018

तमिळनाडूतील राजकारणाच्या नभांगणात रजनीकांत अवतरणार असल्याने रंगत वाढणार आहे. मात्र, सर्वच्या सर्व जागा लढवण्याचा आणि सारी व्यवस्थाच बदलण्याचा निर्धार प्रत्यक्षात आणणे, ही बाब सोपी नाही. 

खलनायकाच्या हडेलहप्पीने आणि क्रूर कारनाम्यांनी अक्षरशः जेरीस आलेली निरपराध माणसे निराशेच्या अंधकारात लोटली गेली असतानाच जीवघेण्या प्रतीक्षेनेतर हीरोची दणक्‍यात एंट्री व्हावी, हा रुपेरी पडद्यावरचा हमखास टाळ्या घेणारा प्रसंग. तसे ते रंगविण्यात माहीर असलेले प्रख्यात चित्रपट अभिनेते रजनीकांत यांनी राजकारणात प्रवेश करतानादेखील तसाच आविर्भाव आणला आहे. पडद्यावरची दुनिया आणि जगण्याचं कठोर वास्तव यांत महदंतर असते, हे खरेच; पण तेवढ्याने या राजकारणप्रवेशाचे महत्त्व कमी होत नाही. कारण तमिळनाडूच्या जनतेवर असलेली चित्रपट कलाकारांची जबरदस्त मोहिनी हेदेखील एक रोकडे वास्तवच! एम.जी. रामचंद्रन, जयललिता काय किंवा करुणानिधी काय, या सर्वांनी चित्रपट रसिकांच्या मनावर अधिराज्य तर केलेच; पण या राज्यातील जनतेवर प्रत्यक्षातही राज्य केले. त्यामुळे चित्रपटातील हीरो राजकारणात काय मर्दुमकी गाजविणार, हा प्रश्‍नच तेथे फिजुल आहे. शिवाजी गायकवाड हा कनिष्ठ मध्यमवर्गीय कुटुंबातून पुढे आलेला मूळचा मराठी तरुण आपल्या कलेच्या जोरावर पाहता पाहता तमीळ जनतेच्या गळ्यातील ताईत बनतो, हा प्रवासच कमालीचा अद्‌भुत म्हणावा असा. पण त्याहीपेक्षा अद्‌भुत बाब म्हणजे हे वलय आणि झळाळी आपल्या मूळ व्यक्तित्वावर स्वार होऊ न देण्याचा त्याचा स्वभाव. त्याचा हा साधेपणा सर्वसामान्यांबरोबरचे बंध अधिक घट्ट करू शकतो. राजकारणप्रवेशाची रजनीकांतने साधलेली वेळही अचूक आहे. जयललितांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात पोकळी निर्माण झाली. त्यांच्या अण्णा द्रविड मुन्नेत्र कळघमची सत्ता कायम असली, तरी त्या पक्षातील लाथाळ्या, भावनिक ब्लॅकमेलिंगच्या राजकारणाला आलेला ऊत एकीकडे आणि गटबाजीने ग्रासलेला द्रमुक दुसरीकडे अशा परिस्थिती आहे. त्याच वेळी आपली ठसठशीत मुद्रा उमटविण्याला वाव आहे, हे रजनीकांतने बरोबर ओळखले. जयललिता यांच्या एकेकाळच्या सहकारी शशिकला यांचे भाचे व अण्णा द्रमुकमधील बंडखोर दिनाकरन यांचा नुकताच विधानसभा पोटनिवडणुकीतील विजय हा राज्यातील सध्याच्या अनिश्‍चित राजकारणाचा परिपाक म्हणावा लागेल. जयललिता यांचे निधन झाल्याने आणि वृद्धत्वामुळे करुणानिधी सक्रिय राहिलेले नसल्याने अनेकांच्या महत्त्वाकांक्षांना त्यामुळेच पंख फुटले असल्यास नवल नाही. कमल हासन यानेदेखील राजकारणात येण्याची इच्छा प्रदर्शित केली होतीच. "आजच्याइतकी योग्य वेळ कोणतीच नाही' हे रजनीकांतचे उद्‌गार त्याअर्थाने खरेच आहेत. वास्तविक बरीच वर्षे त्याच्या राजकारणाची चर्चा सुरू आहे. तो "आज येणार', "उद्या येणार' अशा वावड्या अधूनमधून उठत राहिल्या. रजनीकांतनेही त्या होऊ दिल्या आणि पुरेशी वातावरणनिर्मिती झाल्यानंतर मोठ्या नाट्यमयरीतीने त्याने आज पक्षप्रवेशाची घोषणा करताना जनतेला भावनिक साद घातली आहे. "आज जर मी हा निर्णय घेतला नाही तर कर्तव्याला चुकलो, अशी माझी भावना होईल. तमिळनाडूच्या जनतेने मला भरभरून प्रेम दिले, आता त्याची परतफेड करायलाच हवी आणि सत्ता मिळाल्यानंतर तीन वर्षांत आश्‍वासने पूर्ण करू शकलो नाही, तर सत्ता सोडेन,' असेही त्याने म्हटले आहे. हे सगळे भाषण जनतेच्या काळजाला हात घालणारेच आहे. मात्र पुढच्या विधानसभा निवडणुकीत त्याच्या नव्या पक्षाला पूर्ण बहुमताने सत्ता मिळेल का, याचे भाकीत आताच करणे कठीण आहे. सर्वच्या सर्व म्हणजे 234 जागा रजनीकांत यांचा नवा पक्ष लढविणार आहे. पण पक्षाची रचना, संघटना अद्याप तयार व्हायची आहे. धोरणे व कार्यक्रमही ठरायचा आहे. परंतु त्याच्या राजकारणप्रवेशाने तमिळनाडूच्या राजकारणात रंगत येणार हे नक्की. आजवर दोन छावण्यांत विभागल्या गेलेल्या या राजकारणात जनतेने कधी द्रमुक तर कधी अण्णा द्रमुकला कौल दिला. या दुरंगी राजकारणाला आता तिसरे परिमाण लाभते आहे. या राज्यात कसा शिरकाव करायला मिळेल, याची भाजपकडून चाचपणी सुरू आहे. त्याच वेळी हा प्रवेश झाल्याने त्याच्या नेमक्‍या परिणामांचा अंदाज घेण्यात सगळ्यांचीच कसोटी लागणार आहे.

जयललितांच्या राजकारणाचा कट्टर विरोधक, अशी प्रतिमा असलेल्या रजनीकांतमुळे अण्णा द्रुमकला तर आव्हान उभे राहीलच; परंतु पुढच्या निवडणुकीत प्रस्थापितविरोधी जनभावनेवर भिस्त असलेल्या द्रमुकला प्रतिस्पर्धी वाटेकरी तयार होत आहे. हे सर्व खरे असले तरी करिष्म्याला पक्षसंघटनेची जोड द्यावी लागते. अण्णा द्रमुक आणि द्रमुक या दोन्ही पक्षांचे ग्रामपंचायतींच्या स्तरापर्यंत अस्तित्व आहे. नव्हे त्यांची पाळेमुळे तळागाळापर्यंत पसरून घट्ट झालेली आहेत. विधानसभेच्या सर्व जागा लढविण्याचा रजनीकांतचा निर्णय असला तरी तळापर्यंत पक्ष बांधण्यासाठी तो कसे प्रयत्न करणार, हे महत्त्वाचे ठरेल. व्यवस्था बदलण्याची रजनीकांतने केलेली गर्जना कितीही आकर्षक वाटली तरी ही गोष्ट सोपी नसते, हे इतिहासाने अनेकदा दाखवून दिले आहे. त्यामुळेच तमिळनाडूच्या नभांगणातील या नव्या "अवतारा'मुळे आशा उंचावल्या असल्या, तरी फार मोठ्या चमत्काराची अपेक्षा करणे मात्र योग्य ठरणार नाही. 

 

Web Title: Marathi News Marathi Websites Editorial Article