मुंगीच्या पावलांनी वाढणारे गजक्षेत्र 

संतोष शिंत्रे
शनिवार, 26 ऑगस्ट 2017

राष्ट्रीय पातळीवर नुकत्याच झालेल्या हत्तींच्या गणनेत देशात हत्तींची संख्या 'मुंगीच्या पावलांनी' का होईना, पण वाढते आहे. मात्र याचा अर्थ हत्तींच्या संवर्धनाबाबत सगळे आलबेल आहे, असा नाही. 

सृष्टीविज्ञानात 'कळीच्या प्रजाती' (कीस्टोन स्पेसीज्‌) ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. आपल्या निव्वळ अस्तित्वानेच भोवतालच्या सृष्टीव्यवस्थेवर, अन्य निसर्गसंपदेवर अशा प्रजाती फार मोठा, सकारात्मक परिणाम घडवतात. सृष्टीव्यवस्थेचे (इकोसिस्टिम) संतुलन अबाधित ठेवतात. आशियाई हत्तींच्या भारतात आढळणाऱ्या तीनही उपजाती अशाच 'कळीच्या प्रजाती' म्हणता येतील. 

मार्च ते मे 2017 दरम्यान एक लाख दहा हजार चौरस किलोमीटर धुंडाळून भारतभरात केल्या गेलेल्या हत्तींची गणना म्हणूनच अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागेल. या गणनेच्या नुकत्याच हाती आलेल्या प्राथमिक निष्कर्षांवरून भारतीय गजराजांच्या साम्राज्य विस्ताराबरोबरच त्यांच्यापुढे उभ्या ठाकलेल्या काही गंभीर आव्हानांची ही कल्पना येते. 

या वेळी प्रथमच ही गणना प्रत्यक्षदर्शनांवर आधारित आणि हत्तींचा वावर असलेल्या सर्व राज्यांमध्ये एकाच वेळी केली गेली. पुढील काही महिन्यांत हे निष्कर्ष, काहीशा अप्रत्यक्ष अशा, हत्तींच्या विष्ठांच्या विश्‍लेषणातून व अन्य पद्धतींतून मिळणाऱ्या गणनसंख्येशी पडताळून पाहिले जातील आणि अंतिम संख्या घोषित करण्यात येईल. पण प्राथमिक निष्कर्षांनुसार भारतात 27,312 इतके हत्ती आहेत. (हा लेख लिहित असतानाच त्यातले तीन हत्ती दक्षिण भारतात विजेचा शॉक देऊन मारल्याची बातमी आली आहे.) कर्नाटकात सर्वाधिक म्हणजे 6049, त्याखालोखाल आसाम 5719 आणि केरळमध्ये 3054 हत्ती अशी संख्या असल्याचे दिसते. तमिळनाडूत हीच संख्या 2761 आहे. महाराष्ट्रात केवळ सहा हत्ती वन्य स्वरूपात आहेत. मूळ अधिवास नसताना, बाहेरून आणून सोडले असतानाही, अंदमान-निकोबार द्वीपसमूहांमध्येही त्यांच्या संख्येत काहीशी वाढ दिसते आहे. उत्तर-पूर्व, मध्य-पूर्व, दक्षिण आणि उत्तर अशा चार भूभागांमध्ये ही गणना केली गेली. यापूर्वीची गणना 2012 मध्ये केली होती. त्यात हत्तींची संख्या 29,391 ते 30,711 असल्याचा अंदाज व्यक्त झाला होता. पण दोन गणनांची तुलना करू नये, असे तज्ज्ञांनी ठासून सांगितले. कारण मागील गणनेच्या वेळी प्रत्येक राज्याने वेगवेगळी पद्धत वापरली ते एक; आणि दुसरे म्हणजे या गणनांच्या वेळाही वेगवेगळ्या होत्या. 'एक समयावच्छेदे करून' नव्हत्या. या गणनेत जन्मदर इत्यादी अन्य घटकांचाही शास्त्रीय विचार करून भारतात हत्तींची संख्या व क्षेत्र 'मुंगीच्या पावलांनी' का होईना, पण वाढते आहे असे दिसते. अर्थात, याचा अर्थ सगळे आलबेल आहे, असा अजिबात होत नाही. गणनेसाठी केलेल्या निरीक्षणांनुसार हत्तींचे कळप कर्नाटक, तमिळनाडू, चित्तूर (पश्‍चिम) या भागात, तसेच ओडिशातून आंध्र प्रदेशात असे नियमित ये-जा करताना आढळले. भारतात एकूण 23 राज्यांमध्ये हत्तींचा वावर आढळतो. प्रत्यक्षदर्शी मोजणीला पूरक अशी अप्रत्यक्ष मोजणी, पाणवठ्यांवरील अंदाज, हत्तींची विखरण कशी झाली आहे, त्याचे 'मॅपिंग' इत्यादी अन्य तंत्रेही या सर्व 23 राज्यांमध्ये वापरून अचूकता वाढेल. विभागशः पाहू गेल्यास दक्षिणेत सर्वाधिक (11960), त्याखालोखाल उत्तर-पूर्व भारतात (10,139), पूर्व मध्य भारतात 3128 आणि उत्तरेकडील प्रदेशांमध्ये 2085 अशी संख्या आढळते. बारा ऑगस्टला, 'जागतिक हत्ती दिना'चे औचित्य साधून केंद्रीय पर्यावरणमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी ही आकडेवारी जाहीर केली. 1992 मध्ये भारताने आपला महत्त्वाकांक्षी 'प्रोजेक्‍ट एलिफंड' सुरू केला, त्याला या वर्षी 25 वर्षे झाली. या निष्कर्षांबरोबरच मंत्रिमहोदयांनी हत्तींच्या सीमावर्ती भागातील संवर्धनाबाबत एकमत असलेल्या कृती योजनेचा आराखडाही सादर केला. भारत आणि बांगलादेश यांचा हा संयुक्त उपक्रम आहे. हत्तीदिनापासून पुढील 60 दिवसांत हे दोन्ही देश सीमा भागातील हत्तींची ये-जा, संरक्षण आणि संवर्धन यासाठी एका कृती गटाची स्थापना करून काम सुरू करतील. घोषणा तर झालीय. 

पण या सगळ्यांबरोबरच भारतीय हत्तींच्या अस्तित्वालाच धोका उत्पन्न करणारे प्रश्‍नही आहेत. आणि ते अत्यंत गंभीर आहेत. 1969 ते 1989 या कालखंडात हस्तिदंतासाठी हत्तींच्या बेसुमार शिकारी झाल्या. परिणामी, या 20 वर्षांमध्येच नर व मादी यांचे प्रमाण अत्यंत घातकरीतीने बदलून 1ः6 वरून 1ः122 इतके खालावले (चंद्रन, 1990). हस्तिदंत भारतीय हत्तींमध्ये फक्त नरालाच असल्याने अशा शिकारींमुळे हत्तींच्या नव्या पिढीतले जनुकीय वैविध्य तर घटलेच; पण त्यांच्यातली सकसता, वैपुल्य हेही कमी होत गेले - जात आहे. 

अधिवासांची अखंडता भंगणे, त्यामुळे शेतीवरील हत्तींची आक्रमणे, त्यातून उद्‌भविणारा मानव-पशू संघर्ष हाही गेल्या काही वर्षांमध्ये टोकाला जाऊ पाहत असलेला प्रश्‍न बनतो आहे. अधिकृत आकडेवारीनुसार 2013-14 ते 2016-17 या चार वर्षांमध्ये अशा संघर्षात 1465 माणसांना आपला जीव गमवावा लागला. यात खरेतर चूक माणसांचीच असली, तरी सध्याच्या आत्मकेंद्रित भवतालात, हत्तींच्या संवर्धनाला गरजेची असलेली सामाय जनतेची सहानुभूती हत्ती गमवून बसतात, की काय, असे वाटते. संपूर्ण दक्षिणेत त्यातही पश्‍चिम घाटात हत्तींच्या अवैध हत्या चालूच आहेत. 65 हजार चौरस किलोमीटरवर पसरलेले हत्तींसाठीचे 29 संरक्षित प्रदेशही या तस्करीबरोबरच अन्य आव्हानांचा सामना करत आहेत. 

आपल्या खाण्यातून, हालचालींतून आणि शेणाद्वारे बाहेर टाकून हत्ती फार मोठ्या प्रमाणात जंगली बियांची पसरण करतात. तेही 40-50 किलोमीटर अंतरापर्यंत. अशा प्रकारे जंगल संवर्धनात त्यांचा वाटा, खाऊन बिया पसरण करणाऱ्या अन्य कुणाही प्राण्या-पक्ष्यांपेक्षा अधिक लांबवर जाणारा असतो. खाल्ल्यापैकी 50 टक्केच अन्न हत्ती पचवतात. आणि बाकी बाहेर फेकतात. त्यातले पौष्टिक घटक जंगलातल्या मातीचा कस तर वाढवतातच; पण प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरीत्या इतर अनेक किडे, जीव, त्यांवर जगणारे पक्षी यांनाही जगवतात. 

हत्ती मुळात आक्रमक नसतातच. मानवी आक्रमणांमुळे ओढवलेली अन्नस्रोत आणि जमिनीसाठी वाढती स्पर्धा यामुळे ते तसे होतात. त्यांचे अधिवास अखंड, अभंग ठेवून, आंतरमार्ग (कॉरिडॉर) सुरक्षित ठेवून त्यांना शांतपणे जगू दिल्यास गजराजाच्या साम्राज्याचा विस्तार अधिक शांततेने होईल.

 

Web Title: marathi news marathi websites Elephants in India Santosh Shintre