विध्वंसाचे वाहक (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 19 ऑगस्ट 2017

जगभरात ठिकठिकाणी विनाशकारी उत्पात घडविणे हाच दहशतवाद्यांचा इरादा आहे. दहशतवादाचे नवे तंत्र लक्षात घेऊन त्याविरोधातील लढ्याची रणनीतीही बदलावी लागेल.
 

आपली राजकीय, सांप्रदायिक वा अन्य उद्दिष्टे साध्य करण्यासाठी निरपराध लोकांना वेठीस धरण्याचा, त्यांचे जीव घेण्याचा घृणास्पद खेळ थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. या वेळी स्पेनमधील बार्सिलोना येथे रस्त्यावर मोटारीच्या रूपाने मृत्यूचे थैमान मांडण्यात आले. या हल्ल्याचा हेतू काय, त्यामागे नेमक्‍या कोणत्या शक्ती आहेत, अशा अनेक गोष्टींवर सखोल तपासानंतर प्रकाश पडेल; परंतु स्पेनने हा दहशतवादी हल्ला असल्याचे जाहीर केले आहे आणि 'इस्लामिक स्टेट'ने (इसिस) या हल्ल्याची जबाबदारीही स्वीकारली. या दाव्याच्या पुष्ट्यर्थ कोणताही पुरावा 'इसिस'ने सादर केलेला नाही. त्यामुळे असे दावे करून अनायासे आपले महत्त्व नि उपद्रवमूल्य वाढविण्याची 'इसिस'ची चाल असू शकते, हे खरे असले तरी घटनेचे स्वरूप लक्षात घेतले तर हा दावा खराही असू शकतो. बॉम्ब वगैरे बनविण्याची आणि फार मोठ्या नियोजनाची गरज नसलेले हे दहशतवादी तंत्र अलीकडे वापरले जात आहे.

जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेला बार्सिलोनातील भाग दहशतवाद्यांनी मुद्दामच निवडलेला दिसतो. त्यांची गजबज असलेल्या भागात अंदाधुंद क्रौर्याचे थैमान मांडण्यात आले. मृत आणि जखमींमध्ये फ्रान्स, जर्मनी, बेल्जियम, आयर्लंड, ऑस्ट्रेलिया, चीन, ग्रीस, व्हेनेझुएला, फिलिपिन्स इत्यादी देशांचे नागरिक आहेत. म्हणजेच एखाद-दुसऱ्या हल्ल्याच्या कृत्यातून जास्तीत जास्त परिणाम घडविण्याचे डावपेच यामागे असणार.

प्रत्यक्ष रणांगणावर इराकी सैन्याकडून 'इसिस'ची पीछेहाट होत आहे. 'मोसूल' हा बालेकिल्ला ढासळल्यानंतर सीरियातील 'इसिस'ची स्वयंघोषित राजधानी रक्कावरही जोरदार हल्ले सुरू आहेत. रक्काचा जवळजवळ 45 टक्के प्रदेश 'इसिस'च्या ताब्यातून मिळविण्यात 'नाटो' सैन्याला यश आले आहे. परंतु, प्रत्यक्ष युद्धात 'इसिस'वर मात केली म्हणजे हा भस्मासुर संपेल, असे अजिबात नाही. कमीत कमी किंमत देऊन जास्तीत जास्त हानी घडविण्याचे उपद्‌व्याप ती संघटना करणार. इराकमध्ये 'इसिस'च्या सैन्याविरुद्ध 'नाटो'ची फौज उतरली आहे. स्पेनचे काही सैन्य इराकी सैन्याला प्रशिक्षण देण्यासाठी पाठविण्यात आले आहे. या सगळ्याचा सूड म्हणून हे कृत्य केल्याचे 'इसिस'ने म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लगेचच इस्लामी दहशतवाद ठेचून काढण्यासाठी आम्ही तयार आहोत, अशी 'ट्‌विट'गर्जना केली; परंतु बलाढ्य सैन्य आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांच्या बळावरदेखील दहशतवादाचा परिणामकारक मुकाबला करता येत नसतो, हे एव्हाना जागतिक दहशतवादविरोधी लढ्याची भाषा करणाऱ्या अमेरिकेला तर नक्कीच कळून चुकले असेल. तरीही या लढ्याची रणनीती नव्याने ठरविण्याची, त्याबाबतीत आत्मपरीक्षण करण्याची कोणाचीही तयारी दिसत नाही.

इस्लामी मूलतत्त्ववादाच्या माध्यमातून तरुणांचे 'ब्रेन वॉशिंग' करण्याचे 'इसिस'सारख्या संघटनांचे तंत्र आहे. ते विफल करायचे तर लढा मुख्यतः वैचारिक असायला हवा. एकीकडे 'वहाबीझम'चा प्रसार करणाऱ्या सौदी अरेबियाच्या गळ्यात गळे घालायचे आणि दुसरीकडे दहशतवादविरोधी लढ्याची भाषा करायची, हा अमेरिकी धोरणातील दुटप्पीपणा कधीच लपून राहिलेला नव्हता. विखार पेरून आणि त्याला धार्मिक मुलामा देऊन तरुणांचा शस्त्र म्हणून वापर करणे ही 'इसिस'सारख्या संघटनांची रणनीती आहे. 'अल कायदा' ही संघटनादेखील हेच करीत होती. स्पेनच्याच माद्रिदमध्ये 2004 मध्ये 'अल कायदा'ने बॉम्बस्फोट घडवून आणून 189 लोकांना ठार मारले होते. त्यानंतरच्या काळात स्पेनमध्ये अशा प्रकारचा हल्ला झाला नव्हता.

'अल कायदा'ला मागे टाकून 'इसिस'ने मूलतत्त्ववादाचा आणखी जहरी ब्रॅंड आणला असून तो विविध ठिकाणी धुमाकूळ घालत आहे. तो कसल्याच सीमा आणि धरबंद पाळत नाही. ठिकठिकाणी विनाशकारी उत्पात घडविणे हाच त्यांचा मुख्य कार्यक्रम असल्याने मानवी संस्कृतीपुढेच निर्माण झालेला हा धोका आहे. निरपराध लोकांना वाहनांखाली चिरडून मारण्याचे हे दहशतवादी तंत्र यापूर्वी फ्रान्स, बेल्जियम, जर्मनी आदी देशांतही वापरण्यात आले होते. अमेरिकेत '9/11'ला झालेला हल्ला तर थेट विमान आदळवूनच झाला होता. तेव्हा हे विनाशाचे वाहक आहेत, हे ओळखून त्यावि2रुद्ध विविध आघाड्यांवर लढण्याची सर्वंकष व्यूहरचना आखावी लागेल. त्यात शस्त्रास्त्रांच्या संहारक क्षमतेपेक्षा अधिक खुलेपणाने परस्परसहकार्य, दहशतवादी गटांचा राजकीय स्वार्थासाठी वापर कदापि न करण्याचा निश्‍चय या गोष्टींचा समावेश करावाच लागेल. अन्यथा हे विनाशाचे वाहक मोकाटच राहतील.

Web Title: marathi news marathi websites Global News Barcelona Terror Attack Spain Terror Attack