बंदुक भाजपची, खांदा सदाभाऊंचा, निशाणा राजू शेट्टी! 

Representational Image
Representational Image

कृषीराज्य मंत्री सदाभाऊ खोत यांनी घटस्थापनेचा मूहूर्त साधत नव्या 'रयत क्रांती संघटने'ची घोषणा केली. खासदार राजू शेट्टी यांच्याशी मतभेदानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेत अलिकडे त्यांची घुसमट वाढली होती. नव्या संघटनेच्या घोषणेमुळे खोत यांनी पहिल्यांदा मोकळा श्‍वास घेतला आणि कार्यकर्त्यांसमोर भावनांना वाट मोकळी करुन दिली. या दोन नेत्यांमधील कुरघोडीचा 'मुक्तसंवाद' चांगलाच रंगला.

अगदी संपत्तीपासून ते चारित्र्यापर्यंत आरोप-प्रत्यारोपाचे शिंतोडे उडविले गेले. 
शमीच्या झाडाखालील शस्त्रे शोधून पुढील संघर्षाला सुरुवात करा, असे भावनिक आवाहन 'रयत क्रांती संघटने'च्या घटस्थापनेदिनी सदाभाऊ खोत यांनी सवंगड्याना केले. पण राजू शेट्टीसारख्या देशपातळीवर नाव मिळविलेल्या शेतकरी नेत्याशी द्यावी लागणारी टक्कर, संघटनेअंतर्गत झालेली पडझड, कार्यकर्त्यांची गोंधळलेली अवस्था, शेतकरी संपाच्यावेळी घेतलेली भूमिका यामुळे सदाभाऊंची यापुढील वाटचाल खडतर असणार आहे. सत्ता आणि यंत्रणा हा एकमेव 'प्लस फॅक्‍टर' त्यांच्याकडे सध्या आहे. परंतु शेतकऱ्यांच्या प्रश्‍नावर एखादी संघटना उभी करणे, असंघटित शेतकऱ्यांची एकजूट करुन त्याला एका प्रवाहात आणणे, अशी संघटना त्यांच्या प्रश्‍नासाठी चालविणे, एवढे सोपे नाही, हे सदाभाऊ यांच्यासारख्या तळातून आलेला नेता निश्‍चितच जाणत असेलच. 

ऊस दरासारख्या खदखदणाऱ्या प्रश्‍नाच्या चळवळीतून राजू शेट्टींच्या नेतृत्वाचा उदय झाला. हा प्रश्‍न ऊस उत्पादकांच्या जिव्हाळ्याचा असल्याने संघटना उभी करण्यासाठी राजू शेट्टींसमोर एक पार्श्‍वभूमी तयार होती. त्यांनी ऊस दराचा खरा ताळेबंद मांडला.

साखर कारखान्यांना शेट्टींनी उघडे पाडून चळवळ आक्रमक केली. परिणामी अगदी खोलवर, गावागावात लढवय्ये कार्यकर्ते, आंदोलकांचे जाळे तयार झाले. आज परिस्थिती बदलली आहे. सदाभाऊंना या चळवळीत पुन्हा फार मोठी फुंकर घालावी लागेल. केंद्र सरकारच्या 'एफआरपी कायद्या'नुसार ऊस दर प्रश्‍नाची धारच संपली आहे. 'एफआरपी'नुसार या हंगामात ऊस उत्पादकांना तीन हजार रुपयांपर्यंत दर मिळण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे ऊस दर प्रश्‍नापेक्षा शेती उत्पादनाला हमीभाव; तसेच शेतकऱ्यांचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्यासाठी अधिक लक्ष केंद्रित करावे लागेल. 

शेतकरी संघटनेला फुटीचे ग्रहण आहे, हे निश्‍चित. मात्र स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सध्याच्या फुटीला जातीची किनार लाभली, हे दुर्दैवाने नमूद करावे लागेल. हातकणंगले, शिरोळ भागातील राजकीय परिघावर जैन-मराठा समीकरण महत्त्वाचे मानले जाते. जातीच्या आधारावर एखाद्या संघटनेची विभागणी हे खरोखरच कोणत्याही चळवळीला मारक असते. पण राजू शेट्टींवर सातत्याने या मुद्यावरुन आरोप होत गेले. सदाभाऊ खोत आणि उल्हास पाटील यासारखे मातब्बर आणि शेट्टींचे डावे-उजवे नेते संघटनेतून बाहेर पडले. ठराविक कारखान्याच्या विरोधातच आंदोलन होत नाही, या आरोपावर समाधानकारक उत्तर मिळत नाही. आगामी काळात शेट्टींनाही या रिंगणाबाहेर जाऊन आपली प्रतिमा दुरुस्त करावी लागेल. 

खासदार राजू शेट्टी हे स्वतःला शेतकऱ्यांचे नेते मानत असले तरी त्यांच्यामध्ये एक फार मोठा राजकारणी दडला आहे. सदाभाऊंना मंत्रिपद मिळताच ज्या पद्धतीने त्यांनी त्यांच्या भोवती राजकीय फास आवळत आणला, यावरुन देखील हे लक्षात येते. त्यामुळे सदाभाऊंना त्यांच्याशी मुत्सद्दीगिरीने टक्कर द्यावी लागणार आहे. किंबहुना या सर्व गोष्टीतून राजू शेट्टी यांना अलग पाडण्याची व्यूहरचना भाजपची आहे. त्याचा फायदा सदाभाऊ कसा घेतात, हे महत्वाचे आहे. 'बंदुक भाजपची, खांदा सदाभाऊंचा आणि निशाणा राजू शेट्टी' असेच आजपर्यंतच्या राजकीय घडामोडींचे वर्णन करावे लागेल. शेट्टींच्या विरोधात माजी मंत्री विनय कोरे, मंत्री सदाभाऊ खोत, मराठा क्रांती सेनेचे सुरेशदादा पाटील, आमदार उल्हास पाटील अशी फळी उभी आहे. या सर्वांचे सहकार्य घेऊन आपला राजकीय खुंटा कसा बळकट करतात, हे यापुढे दिसून येईल. आता सदाभाऊंच्या भाषेत नांगरट करणारा एक, पेरक्‍या दुसरा, खळ्याचा मालक तिसराच, असे असताना यापुढे 'रयत क्रांती संघटने'च्या पिकाचा मालक दुसरा-तिसरा कोणी न होता, ते स्वतः झाले तरच त्यांच्या या बंडखोरीला अर्थ असेल. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com