बुलेट ट्रेन ते बार्सिलोना (श्रीमंत माने)

सोमवार, 2 ऑक्टोबर 2017

परळ ते एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानके जोडणाऱ्या पादचारी पुलावर मुंबईनं परवा 'ब्लॅक फ्रायडे' अनुभवला. चेंगराचेंगरीत तेवीस हकनाक बळी गेले. चाकरमान्यांच्या जुन्याच जखमांवरची खपली निघाली. पुन्हा वेदनांची असह्य ठसठस. मुंबईकरांच्या रागाचा केंद्रबिंदू आहे प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन. देशाचं चाळीस टक्‍के करउत्पन्न देणाऱ्या मुंबईतल्या लोकलची, तिच्या प्रवासाच्या नरकयातना भोगणाऱ्या मुंबईकरांची चिंता करण्याऐवजी बुलेट ट्रेनचा सण ऋण काढून कशासाठी, हा सवाल विचारला जातोय. या वेदना समृद्धीच्या, संपन्नतेच्या आहेत. एक राष्ट्र म्हणून संपन्न प्रांतांनी थोडा त्याग करायचा असतो, थोडं सोसायचं असतं.

परळ ते एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानके जोडणाऱ्या पादचारी पुलावर मुंबईनं परवा 'ब्लॅक फ्रायडे' अनुभवला. चेंगराचेंगरीत तेवीस हकनाक बळी गेले. चाकरमान्यांच्या जुन्याच जखमांवरची खपली निघाली. पुन्हा वेदनांची असह्य ठसठस. मुंबईकरांच्या रागाचा केंद्रबिंदू आहे प्रस्तावित मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन. देशाचं चाळीस टक्‍के करउत्पन्न देणाऱ्या मुंबईतल्या लोकलची, तिच्या प्रवासाच्या नरकयातना भोगणाऱ्या मुंबईकरांची चिंता करण्याऐवजी बुलेट ट्रेनचा सण ऋण काढून कशासाठी, हा सवाल विचारला जातोय. या वेदना समृद्धीच्या, संपन्नतेच्या आहेत. एक राष्ट्र म्हणून संपन्न प्रांतांनी थोडा त्याग करायचा असतो, थोडं सोसायचं असतं. दुबळ्या प्रांतांना मदत करायची असते, हे खरं; पण, ते कुठंपर्यंत हा प्रश्‍न कधी ना कधी विचारला जातोच. सध्या लोकल 'रेल्वे इन्फ्रास्ट्रक्‍चर'च्या निमित्तानं मुंबई तो विचारतेय. 

तिकडे युरोपात असाच एक प्रांत, जगभरातील पर्यटकांचं आवडतं 'डेस्टिनेशन' असलेली त्याची समृद्ध राजधानी मुंबईसारख्याच वेदना भोगतेय. बार्सिलोना हे त्या समृद्ध शहराचं नाव. ते ज्याची राजधानी त्या प्रांताचं नाव कॅटालोनिया. स्पेनच्या सतरा स्वायत्त प्रांतांपैकी एक. सर्वाधिक संपन्न. आर्थिक ताकद पोर्तुगाल देशाएवढी. स्पेनमधले सोळा टक्‍के लोक कॅटालोनिया प्रांतात राहतात; पण ते देशाचं एकोणीस टक्‍के सकल उत्पन्न देतात. निर्यातीतला जवळपास सव्वीस टक्‍के वाटा कॅटालोनियाचा अन्‌ देशातल्या एकूण परकी गुंतवणुकीपैकी 21 टक्‍के गुंतवणूक या प्रांतात होते. अर्थातच, अन्य प्रांतांसाठी थोडं सोसायचं कॅटालोनियाच्या वाट्याला आलंय. विशेषत: पाच वर्षांपूर्वीच्या आर्थिक मंदीच्या काळात. आता त्या जाचातून सुटकेसाठी राष्ट्रनिर्मितीची, स्वातंत्र्याची ऊर्मी तिथं दाटून आलीय. ब्रिटिशांच्या 'ब्रेक्‍झीट'च्या निर्णयामुळे दुभंगणाऱ्या, जर्मनीची सत्ता पुन्हा मिळवली तरी राजकीय आव्हानांसाठी अँजेला मर्केलची चर्चा करणाऱ्या युरोपमध्ये एक नवं राष्ट्र निर्माण होऊ पाहतेय. किमान तसा दावा तरी केला जातोय. रविवारी त्यासाठी जनमत चाचणी होतेय. कार्लस पुजीमोंट यांच्या नेतृत्त्वातलं संपूर्ण स्वातंत्र्याच्या बाजूचं स्थानिक सरकार व जनमतचाचणीला विरोध करणारं स्पेन सरकार असा संघर्ष आहे.

चाचणीच्या बाजूने शुक्रवारी शेतकऱ्यांनी ट्रॅक्‍टरचा ताफा बार्सिलोनाच्या रस्त्यांवर उतरवून शक्तिप्रदर्शन केलं. 

अर्थात, विसाव्या शतकात हुकूमशहा फ्रान्सिस्को फ्रॅंकोच्या जुलमी राजवटीचे चटके भोगलेल्या स्पेनमध्ये कॅटालोनियाच्या फुटीरतेविरुद्ध भावना तीव्र आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही स्पेन एकसंध राहायला हवा, असं वाटतं. स्पेनच्या सर्वोच्च कॉन्स्टिट्युशनल कोर्टानं जनमत चाचणी बेकायदा ठरवलीय. स्पेनचे पंतप्रधान मारियानो राजोय आक्रमक आहेत. राजधानी माद्रिदमधून पोलिसांच्या तुकड्या बार्सिलोनाला पाठवण्यात आल्या आहेत. बळाचा वापर सुरू आहे. लोकांनी दोन दिवस आधीच मतदान होणाऱ्या शाळा ताब्यात घेतल्या. मोठ्या संख्येनं लोक मत नोंदविण्यासाठी बाहेर पडले. 'विकिलिक्‍स'चा संस्थापक ज्युलिअन असांजे यानं पोलिसांच्या दंडुकेशाहीचे व्हीडिओ सोशल मीडियावर टाकलेत. लढ्याचं नेतृत्व अर्थातच तरुणांकडे आहे. खास वेबसाइट्‌स व सोशल मीडिया ही साधने वापरली जाताहेत. 'युनिव्हर्सिटीज फॉर अ रिपब्लिक' नावाची विद्यार्थ्यांची संघटना त्यासाठी आघाडीवर आहे. हा मजकूर प्रकाशित होईपर्यंत जनमताचा कल व कौल स्पष्ट झालेला असेल. 

ऑलिंपिक, पर्यटन व समृद्धी 
स्पेनच्या ईशान्य व फ्रान्सच्या दक्षिण दिशेचा कॅटालोनिया भूभाग चार उपप्रांताचा. सत्तर टक्‍के लोकसंख्या सामावणारा बार्सिलोना त्यातला मोठा उपप्रांत. परिणामी, जगातल्या बहुतेकांना कॅटालोनिया कमी अन्‌ बार्सिलोना अधिक माहिती आहे. पंचवीस वर्षांपूर्वी, 1992 मध्ये ऑलिंपिक स्पर्धेचं यजमानपद बार्सिलोनानं भूषवलं. त्यासाठी अगदी जुन्या इमारती पाडून समुद्र किनारे सुंदर बनवले गेले. परिणामी, कॅटालोनियाला भूमध्य समुद्राचा देखणा किनारा लाभला. तिथं पर्यटन व्यवसाय फुलला.

पंचाहत्तर लाख लोकसंख्येच्या कॅटालोनियामध्ये गेल्या वर्षी मुक्‍कामी आलेल्या पर्यटकांची संख्या होती ऐंशी लाख. कॅटालोनियाला स्वत:चा इतिहास, संस्कृती व भाषा वगैरे सारे काही आहे. म्हणूनच त्या प्रांताला स्पेननं बऱ्यापैकी स्वायत्तता दिलीय. 11 सप्टेंबर हा राष्ट्रीय दिवस साजरा केला जातो. अठराव्या शतकात, 1714 मध्ये स्पेनचा राजा पाचवा फिलीप यानं बार्सिलोना ताब्यात घेतलं, तो हा दिवस. 'स्पॅनिश सिव्हिल वॉर'मधून एक राष्ट्र उभं राहण्यात कॅटालन जनतेचं योगदान मोठं आहे.

Web Title: marathi news marathi websites Mumbai News Elphinstone Mumbai Stampede Shrimant Mane