विद्यार्थी सक्षम, तर सुरक्षा भक्कम 

डॉ. मिलिंद नाईक
शनिवार, 23 सप्टेंबर 2017

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांशी संबंधित पायाभूत संरचना, व्यवस्था निर्दोष असायला हव्यातच; त्याइतकेच महत्त्वाचे असते ते विद्यार्थ्यांना सर्व अर्थाने सक्षम बनविणे. 

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने शाळांशी संबंधित पायाभूत संरचना, व्यवस्था निर्दोष असायला हव्यातच; त्याइतकेच महत्त्वाचे असते ते विद्यार्थ्यांना सर्व अर्थाने सक्षम बनविणे. 

नुकत्याच काही शाळांमध्ये घडलेल्या अनुचित प्रकारांमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न समोर आला आहे. रायन इंटरनॅशनल स्कूल, या दिल्लीतील शाळेत घडलेल्या विद्यार्थ्याच्या खुनाच्या घटनेनंतर पालकांनी शाळा व्यवस्थापनावर खटलादेखील दाखल केला आहे. या पार्श्‍वभूमीवर शाळांमधील सर्वच प्रकारच्या सुरक्षेसंबंधी जी चर्चा होत आहे, ती गरजेची असली तरी उपाय सुचविताना मूळ शैक्षणिक उद्दिष्टांना बाधा पोचविणाऱ्या सूचना आपण करीत नाही ना, याचाही विचार केला पाहिजे. या दोन्ही गोष्टींचा समतोल साधायला हवा. 

विद्यार्थिसुरक्षेच्या संदर्भात चार घटक महत्त्वाचे. घर, वाहतूक, शाळा आणि समाज. मुलांच्या सुरक्षिततेची सुरवात घरापासूनच होते. बालमनाचे घरात योग्य त्याप्रकारे संगोपन केल्याशिवाय विद्यार्थ्याचा आत्मविश्वास वाढत नाही. घरातील संस्कारांमुळे वाढलेल्या आत्मबलावरच विद्यार्थी समाजातील अनिष्ट प्रसंगांना सामोरे जात असतो. घरातल्या मोकळ्या संवादाचा चांगला उपयोग होतो. त्यासाठी पालकांचे प्रबोधन महत्त्वाचे. त्यासाठी पालकांसाठी बालमानसशास्त्राचे छोटे-छोटे वर्ग योजायला हवेत.

पण काही वेळा मुले घरातीलच हिंसाचाराला बळी पडलेली दिसतात. अशी मुले समाजातील हिंसाचाराला विरोध कशी करणार? पाश्‍चात्त्य देशांत अशा विद्यार्थ्यांसाठी अनेक मदत-केंद्रे आहेत व त्यांची मदत घेण्यासंबंधीची जागृती शाळांमधून केली जाते. हल्ली घर ते शाळा अशी विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी स्कूलबसची व्यवस्था केलेली असते. यामधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेले नियम चांगलेच आहेत.पण ते प्रामुख्याने प्रतिबंधक आहेत. तंत्रज्ञान इतके पुढे गेलेले असताना घटना घडतानाच मदत मिळावी म्हणून सूचक-घंटा (ऍलर्ट अलार्म) अथवा पोलिसांना संदेश पाठविण्याची यंत्रणा बसविता येणे शक्‍य आहे.

विद्यार्थी वाहतूक करण्यासाठी स्कूलबसची अथवा रिक्षाची तंदुरुस्ती असो, अथवा वाहतूक नियमांचे पालन निकषांप्रमाणे होते की नाही हे पाहण्यासाठी तपासयंत्रणा मात्र अधिक सक्षम हवी. 

इमारतीतील रचनांमुळे होणाऱ्या अपघातांपासून ते मानवी दोषांपर्यंत सर्वच बाबतींत दक्षता घ्यायला हवी. उंच इमारतीत सुरक्षा कठडे असणे, खिडक्‍यांना सुरक्षा जाळ्या बसविणे, दोनपेक्षा अधिक मजले असल्यास आडवी संरक्षक जाळी बसविणे गरजेचे आहे. विजेच्या तारा व जोड सुरक्षितरीत्या बसविले गेले पाहिजेत. महत्त्वाच्या ठिकाणी अग्निशमनाची साधने बसविावीत. 'स्मोक डिक्‍टेटर'चाही उपयोग होतो.

अलीकडच्या काळात नव्याने सुरू झालेली समस्या म्हणजे सायबर सुरक्षा. शाळेतील संगणकांना अँटिव्हायरस बरोबरच, फायरवॉल्स बसवून घेणे गरजेचे असते.

विद्यार्थ्यांना सामाजिक माध्यमांचा वापर शाळेच्या संगणकावरून करू देणे शक्‍यतो टाळावे. अध्यापकांना यावर व्यक्तिगत लक्ष ठेवणे शक्‍य नसल्याने यातून अनेक नको त्या गोष्टी घडण्याची शक्‍यता असते. क्रीडांगणावरील व प्रयोगशाळेतील सुरक्षा ही आणखी एक काळजीची बाब. खेळूच न देणे अथवा प्रयोग करू न देणे, हा त्यावरचा उपाय नाही. त्याने शिक्षणावरच परिणाम होईल. प्रयोगशाळेतील सुरक्षा-नियमांची ओळख विद्यार्थ्यांना करून द्यायला हवी.

खेळाचे मैदान असो की प्रयोगशाळा, शिक्षकाला काही प्रमाणात धोका पत्करावा लागतो. तो पत्करला पाहिजे. दुखापत होईल म्हणून खेळणेच नको किंवा प्रयोगच नको असे म्हटल्यास विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व विकसन अर्धवट राहील. सुरक्षा-नियमांचा जाच निर्माण झाल्यास शिक्षकही अनावश्‍यक सावध भूमिका घेऊन काही गोष्टी टाळू लागतील. म्हणून पालकांनीही तारतम्य ठेवायला हवे. 

काही वेळा कुणाची चूक नसतानाही अपघात होतात. मध्यंतरी एका शाळेतील वर्गात दोन तासांच्या मधल्या वेळेत मारामारी झाली व विद्यार्थ्याचे डोके आपटून दुखापत झाली. पालकांनी शाळा प्रशासनाला जबाबदार धरले. खरेतर या प्रसंगी शाळेतील कोणत्याही व्यक्तीची विशेष चूक नव्हती. पालकांनी शाळा प्रशासनाला सतत धारेवर धरले, तर शिक्षक कोणताच धोका पत्करायला तयार होणार नाहीत. असाच एक आणखी प्रसंग म्हणजे घोडेस्वारी शिकत असताना घोडा उधळला व विद्यार्थी त्यावरून पडला. दुखापत झाली. या प्रसंगी कोणाला चूक मानायचे? प्रशिक्षकाला, विद्यार्थ्याला की घोड्याला? अशा वेळी शिक्षकावर कारवाई करण्यात आल्यास पुढीलवेळी कोणताच शिक्षक प्रशिक्षण देण्यास तयार होणार नाही. पालक व शिक्षकांनी एकमेकांच्या भूमिकांत जाऊन विचार करायला हवा. 

विद्यार्थ्यांनी एकमेकांना एकट्याने अथवा गटाने त्रास देणे, दादागिरी करणे हीही एक वारंवार जाणवणारी समस्या. पण या गोष्टी शिक्षेपेक्षा समुपदेशनानेच सुटू शकतात. त्यासाठी शाळेत समुपदेशक नियुक्त केलेला हवा. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शाळेतील वातावरण मोकळे हवे. विद्यार्थ्याला समस्या दडवून न ठेवता मोकळेपणाने बोलता येईल अशी जागा हवी. त्याने पुष्कळशा समस्या कमी होतात. त्यासाठी शिक्षक-विद्यार्थ्यांचे नाते सहज व मोकळे असायला हवे. तक्रारपेटीची व्यवस्थाही काही प्रमाणात विद्यार्थ्यांना मोकळेपणाने व्यक्त व्हावयास मदत करते. 

मुळात विद्यार्थ्यालाच सक्षम बनविणे हाच सुरक्षेचा सर्वांत महत्त्वाचा उपाय. लसीकरण करणे हा रोग न होण्यासाठी जसा खात्रीचा मार्ग आहे; तसेच या बाबतीतही आहे. त्यासाठी त्यांचे सर्वांगीण प्रशिक्षण करावे. प्रयोगशाळेतील सुरक्षा-नियमांची ओळख, अनोळखी व्यक्तीबरोबर न जाणे, अनोळखी व्यक्तीकडून काहीही न स्वीकारणे, चुकीचा स्पर्श ओळखणे, संकट ओळखणे, संकटसमयी मदत मागणे व वेळप्रसंगी मदत देणे इत्यादी गोष्टींचे प्रशिक्षण अगदी 'प्राथमिक'च्या टप्प्यापासून द्यावे. कारण तांत्रिक व्यवस्था कितीही चांगल्या केल्या, तरी त्या प्रत्येक वेळी मदतीला येतीलच असे नाही. अशावेळी विद्यार्थ्याचा आत्मविश्वास व प्रसंगावधानच कामी येते. ते वाढविण्यासाठी प्रसंगनाट्यासारख्या साधनांचा वापर करता येईल. स्व-संरक्षण करण्यासाठी; वेळप्रसंगी योग्य प्रकारे प्रतिसाद देता यावा यासाठी कराटे, मुष्टियुद्धही शिकवावे. याने मनोबल वाढते. विद्यार्थ्यांना तातडीच्या वेळी कुठे दूरभाष करायचा हेही सांगून ठेवले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शाळेतून कसे बाहेर पडायचे, यासाठी त्याच्या रंगीत तालमी घ्यायला हव्यात. प्रथमोपचाराचे प्रशिक्षणसुद्धा शिक्षक-कर्मचारी-विद्यार्थी यांना द्यायला हवे. त्यानेही संकटसमयी कसे वागायचे याचे अवधान येते.

काही पालक आपल्या पाल्याला तळहातावरच्या फोडाप्रमाणे जपतात. असे पालक पाल्याला कोणतेच काम स्वत:चे स्वत:ला करू देत नाही. घराबाहेर अगदी सोसायटीत खेळायला अथवा जवळच्या दुकानात काही खरेदी करायलासुद्धा पाठवत नाहीत. याला मानसशास्त्राच्या भाषेत 'हेलिकॉप्टर पेरेंटिंग' असे म्हणतात. अशाने मुले दुबळी बनतात. स्वत:चे स्वत: कोणतेच निर्णय घेऊ शकत नाहीत. मग अशी मुले संकट काळात धैर्याने कशी सामोरी जाणार? आपण आपल्या पाल्याला अतिसुरक्षित वातावरणाची सवय तर लावत नाही आहोत ना? पाल्याला समाजातील सर्व प्रकारच्या वृत्तींना सामोरे जावयाचे आहे हे लक्षात ठेवूया. त्यांना समर्थ करूया.
विद्यार्थ्यांच्याभोवती कुंपण घालून संरक्षण देण्याबरोबरच त्यांचे सक्षमीकरण करून ताकद वाढविणे हाच अधिक योग्य उपाय होय. अशा अर्थानेच उपाययोजनांपेक्षा लसीकरण महत्त्वाचे नाही का? 

(लेखक ज्ञान प्रबोधिनी प्रशालेत प्राचार्य आहेत) 

Web Title: marathi news marathi websites Mumbai news pune news school security Milind Naik