कॉंग्रेसने राखला गड

कॉंग्रेसने राखला गड

मराठवाड्यातील लातूरची विलासराव देशमुख यांची गढी उद्‌ध्वस्त करून, तेथील महापालिका काबीज करण्यात अलीकडेच मिळालेल्या यशानंतर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा नांदेडचा पारंपरिक गड ताब्यात घेण्याचे भारतीय जनता पक्षाचे मनसुबे तेथील जनतेने गोदावरी नदीत बुडवले आहेत. लोकसभा व विधानसभा निवडणुकांतील दारुण पराभवामुळे मरगळलेल्या कॉंग्रेससाठी नांदेड महापालिकेची निवडणूक अनेक अर्थाने महत्त्वाची होती. त्यात मिळालेल्या दणदणीत विजयामुळे कॉंग्रेस पक्षात पुन्हा जान येऊ शकते. भाजपने नांदेड महापालिका जिंकण्याचा चंग बांधून गेले दोन-अडीच महिने जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली होती. भाजपच्या नियोजनातही दोष दाखवायला जागा नव्हती. या निवडणुकीत भाजपने दीड डझन मंत्री प्रचारासाठी उतरविले होते आणि त्यांनी दोन डझनांहून अधिक सभा घेत नांदेड-वाघाळा परिसर पिंजून काढला होता. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नांदेडवर स्वारी केली होती. मात्र, या कशाचाच काहीही उपयोग झाला नाही आणि 81 सदस्यांच्या महापालिकेत पूर्ण बहुमत मिळवण्याचा दावा करणाऱ्या भाजपला दोन आकडी जागाही मिळू शकल्या नाहीत. शंकरराव चव्हाणांच्या काळापासून नांदेड हा कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणूनच प्रसिद्ध होता आणि आता शंकररावांचे चिरंजीव अशोक चव्हाण यांनी ही महापालिका एकहाती जिंकल्यामुळे त्यावर शिक्‍कामोर्तब झाले आहे.

मात्र, अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेणाऱ्या या निवडणुकीचे महत्त्व एवढ्यापुरतेच मर्यादित नाही. ओवेसी बंधूंच्या मजलिस-ए-इत्तेहाद-उल मुसलमीन म्हणजेच "एमआयएम' या पक्षाने 2012 मधील महापालिका निवडणुकीत 11 जागा जिंकून महाराष्ट्राच्या राजकारणाला एका वेगळ्याच वळणावर नेऊन उभे केले होते. "एमआयएम' हा पक्ष म्हणजे भाजपची "बी टीम' असल्याच्या चर्चाही त्यानंतर रंगल्या होता. पुढे लोकसभा व विधानसभा निवडणुकीत याच "एमआयएम'ची मते कॉंग्रेसला पराभवाच्या गर्तेत फेकण्यात बऱ्याच अंशी कारणीभूत ठरली होती. आता त्याच पक्षाला पाच वर्षांच्या अनुभवानंतर नांदेडकरांनी दूर लोटल्यामुळे कॉंग्रेसने सुटकेचा निःश्‍वास सोडला असणार. नांदेडकरांनी या निवडणुकीत केलेले मतदान हे अनेक अर्थाने लक्षात घेण्याजोगे आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे "एमआयएम'बरोबरच शिवसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची झालेली पुरती धूळधाण! अर्थात, "राष्ट्रवादी'ने ही निवडणूक फारशा गांभीर्याने घेतली नव्हती आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काही तासांपुरते नांदेडकरांना दिलेले दर्शन वगळता, त्या पक्षाचे अन्य नेते प्रचारात उतरलेच नव्हते! शिवसेनेने मात्र भाजपला खडे चारण्यासाठी प्रचाराची मोठीच राळ उडवून दिली होती. दस्तुरखुद्द उद्धव ठाकरे हेही जातीने प्रचारात सहभागी झाले होते. तरीही शिवसेनेची पुरती वाताहत झाली. याचा अर्थ स्पष्ट आहे. नांदेडकरांसाठी ही लढत कॉंग्रेस विरुद्ध भाजप एवढ्यापुरतीच होती आणि त्या लढतीत भाजपला त्यांनी पुरते नाकारले. भाजपची रणनीती या वेळी पुरती फसली यात शंकाच नाही. निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस व शिवसेनेतून उमेदवार आयात करण्याची भाजपची खेळीही यशस्वी झाली नाही. दोन दशकांपूर्वी अशोक चव्हाणांच्या जवळ असलेले आणि व्हाया "राष्ट्रवादी' शिवसेनेत जाऊन विधानसभा निवडणूक जिंकणारे कंधारचे आमदार प्रताप पाटील-चिखलीकर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी जवळीक साधून आहेत. त्यांच्या मदतीने, लातूरच्या विजयात मोलाची कामगिरी बजावणारे निलंग्याचे संभाजीराव पाटील-निलंगेकर या निवडणुकीची सूत्रे हलवत होते. पण भाजपचे सारे डावपेच नांदेडकरांनी धुळीस मिळवले आहेत. नांदेडमध्ये पराभूत झालेल्या भाजपला मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर महापालिका पोटनिवडणुकीत मात्र विजय मिळाला आहे.

नांदेडमधील विजयामुळे अशोक चव्हाण यांना मोठे बळ मिळू शकेल आणि या विजयापासून स्फूर्ती घेऊन ते धडाडीने कामाला लागले, तर पुरत्या मरगळलेल्या प्रदेश कॉंग्रेसला उभारी मिळू शकते. अर्थात, गटबाजीच्या राजकारणात बुडालेल्या कॉंग्रेसचे अन्य नेते त्यांना कितपत साथ देतात, ते बघावे लागेल. भाजपला मात्र हा दारुण पराभव जिव्हारी लागणारा आहे. अलीकडील काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी व अर्थमंत्री अरुण जेटली यांना अर्थव्यवस्थेला उभारी देण्यात आलेल्या अपयशामुळे सोशल मीडिया त्यांच्या विरोधात गेला होता. त्यामुळे या पराभवाच्या वार्ता येण्यापूर्वी मुंबई महापालिकेच्या पोटनिवडणुकीत भाजपला मिळालेल्या विजयामुळे आशिष शेलार व किरीट सोमय्या आदींनी "मोदी.. मोदी...' असा जयजयकार सुरू केला होता. मात्र, या पराभवाचे खापर भाजपच्या एका प्रवक्‍त्यांनी नांदेडमधील अशोक चव्हाणांच्या कथित गुंडगिरीवर फोडले, तेव्हा त्यांना गृहखाते सांभाळणाऱ्या मुख्यमंत्र्यांना या गुंडागर्दीस आवर घालण्यात अपयश आले आहे, असेच आपण सूचित करत आहोत, एवढेही भान उरले नव्हते. असो. आता या मोठ्या विजयामुळे राज्यातील कॉंग्रेसचे राजकारण पुन्हा काही वेग घेते काय ते बघायचे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com