फेक न्यूज अन्‌ सत्य एका रांगेत (श्रीमंत माने)

फेक न्यूज अन्‌ सत्य एका रांगेत (श्रीमंत माने)

वाऱ्याच्या वेगानं व आगीच्या दाहकतेनं पसरणाऱ्या खोटेपणाच्या गतीचं वर्णन करणारी एक म्हण आहे, ''सत्य बाहेर निघण्यासाठी पायात चप्पल घालून तयार होईपर्यंत असत्य गावभर हिंडून आलेलं असतं.'' हे केवळ गल्ली-गावातल्या चहाड्या अन्‌ कागाळ्यांपुरतंच नसतं. सोशल मीडियानं खोटेपणाला नवा अवतार बहाल केलाय. वर्ष सरत आलं अन्‌ नव्या वर्षाचे वेध लागले, की जगभरातले तज्ज्ञ व त्यांच्या संस्था नानाविध प्रकारांचा अभ्यास करतात. मावळत्या वर्षात सर्वाधिक वापरलेला शब्द, वाक्‍प्रचार कोणता, चर्चेतली व्यक्‍ती कोण वगैरेचा असाच अभ्यास शब्दकोश व भाषांच्या तज्ज्ञांनी केलाय. त्यांनी काढलेला निष्कर्षही, या सामूहिक शहाणपणाच्या गोष्टीला बळ देतो. वेगवेगळ्या नामांकित शब्दकोशांनी घटना, घडामोडींमधील व्यक्‍ती, प्रकृती, मनोवस्थांचा विचार करून प्रामुख्याने पाच शब्द, 'वर्ड ऑफ द इअर' ठरवलेत. त्यापैकी दोन, 'फेक न्यूज' अन्‌ 'सत्य' हे वर उल्लेख केलेल्या म्हणीत फिट्ट बसतात. 'यूथक्‍वेक', 'कॉम्प्लीसिट' व 'फेमिनिझम' हे अन्य तीन शब्द वर्षभरातल्या घडामोडींची दिशा दर्शवणारे आहेत. 

फॅशन व लाइफस्टाइलवर बेतलेल्या, अमेरिकेतल्या सव्वाशे वर्ष जुन्या 'व्हॉग' मासिकाच्या माजी मुख्य संपादिका डायना रिलॅंड यांनी 1965 मध्ये सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील युवकांच्या प्रभावासाठी 'यूथक्‍वेक' असा नवा शब्द वापरला. मावळत्या वर्षातल्या अशा सगळ्याच घडामोडींवर तरुणाईचा इतका प्रभाव राहिला, की 'ऑक्‍सफर्ड डिक्‍शनरी'नं त्याला 'वर्ड ऑफ द इअर' बहुमान बहाल केला. 2016 च्या तुलनेत यंदा युवकांचा प्रभाव पाचपटीनं वाढला, असा 'ऑक्‍सफर्ड'चा निष्कर्ष आहे. 

'डिक्‍शनरी डॉट कॉम'नं 'कॉम्प्लीसिट' म्हणजे सहअपराध हा 'वर्ड ऑफ द इअर' ठरवलाय. बेकायदा वा प्रश्‍नांकित मुद्द्यांवरचं जागतिक स्तरावरच्या कर्त्याधर्त्यांचं वर्तन व भूमिका हा यंदा जगभर चर्चेचा विषय राहिला. त्यामुळं हा शब्द ठसठशीतपणे पुढे आला असावा. 'मेरियम वेबस्टर'नं 'फेमिनिझम' म्हणजे स्त्रीवाद पहिल्या क्रमांकावर गृहीत धरलाय. डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनल्या बनल्या गेल्या जानेवारीत राजधानी वॉशिंग्टनमध्ये निघालेला 'वूमेन मार्च' ते वर्षाच्या उत्तरार्धात गाजलेला 'मीटू हॅशटॅग', त्याची ठिणगी टाकणारी हॉलिवूडची अभिनेत्री अलिसा मिलानो हिच्या आरोपांमुळे अडचणीत आलेले निर्माते-दिग्दर्शक हार्वे वाइनस्टेन, पाठोपाठ बड्या मंडळींवर झालेले आरोप, भारतासारख्या देशात महिलांवरचे वाढते अत्याचार आदींची 'फेमिनिझम'ला पृष्ठभूमी आहे. 

'कोलिन्स डिक्‍शनरी' म्हणते, की बातमीदारांच्या आविर्भावात खोटी, तथ्यहीन, सनसनाटी, बुद्धिभेद करणारी माहिती प्रसारित करणाऱ्या 'फेक न्यूज'चं प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा 365 टक्‍क्‍यांनी वाढलं. निवडणुका जिंकण्यासाठी अन्‌ मिळालेली सत्ता टिकविण्यासाठी बड्या राजकीय नेत्यांनी व पक्षांनीच सोशल मीडियाचा 'फेक न्यूज'साठी वापर केला, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. हे प्रकार भयावह पद्धतीनं वाढत असताना किंवा त्यामुळंच समाधानाची बाब इतकीच, की 'ट्रूथ' म्हणजे सत्य हा 'वर्ड ऑफ द इअर' असल्याचं 'ग्लोबल लॅंग्वेज मॉनिटर'नं म्हटलंय. त्याचा वापर वाढला की कमी झाला, यापेक्षा सत्याचं महत्त्व जगाला कळायला लागलं हे अधिक महत्त्वाचं! 

प्रभाव 'जनरेशन झेड'चा 
तसं पाहता प्रत्येकच मावळतं वर्ष जगाला, जगातल्या प्रत्येक माणसाला नवा अनुभव, त्यांच्या जगण्याला नवं वळण देणारं ठरतं. साऱ्याचाच अंदाज बांधता येतो असं नाही. बहुतेक प्रसंग अनपेक्षित, अनाहूत असतात. तरीही, येणारं 2018 वर्ष किमान सोशल मीडियाबाबत, तंत्रज्ञानाच्या पुढच्या टप्प्याच्या दृष्टीने कसं असेल, यावर खल सुरू आहे. त्यात प्रामुख्याने 'ऑगमेंटेड रिऍलिटी' (संवर्धित वास्तविकता), 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' (कृत्रीम विद्वत्ता) या दोन तंत्रांचा विचार केला जातोय. स्नॅपचॅट व इन्स्टाग्रामवर येत्या वर्षात प्रत्यक्ष सोबत नसलेले मित्र, झालंच तर सेलेब्रिटींसोबतचे 'सेल्फी' दिसले तर नवल वाटायला नको. 'इन्स्टाग्राम स्टोरीज' वाढतील. लिंक्‍डइन, फेसबुक व इन्स्टाग्रामच्या स्पर्धेत ट्विटर मागे पडल्याचा अनुभव 2017 नं घेतला. त्यामुळं काही नवी 'फीचर्स' ट्विटरवर येऊ शकतील. ... अन्‌ सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर जन्मलेल्या 'जनरेशन झेड'कडून 'यूथक्‍वेक'ची नवी आवृत्ती साकारली जाईल. या पिढीचं सरासरी वय आता वीसच्या पुढं गेलंय. ही पिढी कमवायला लागलीय. त्या कमावतेपणाचा प्रभाव केवळ सोशल मीडियाच नव्हे तर एकूणच बाजारपेठेवर दिसायला लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com