आश्‍चर्य 'आठवे' (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

गुजरात निवडणुकीच्या तोंडावर, ताजमहाल व टिपू सुलतान असे सर्वसामान्यांच्या जगण्याशी संबंध नसलेले निरर्थक वाद उभे करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न होत असल्याचे दिसते. 

यमुनाकाठी गेली चार शतके दिमाखाने उभा असलेला ताजमहाल हे 'बादशहाच्या अमर प्रीतीचे मंदिर एक विशाल' म्हणून कवीने गौरवलेले लेणे भारतीय संस्कृतीचे प्रतीकच नाही, असे सांगणारे उत्तर प्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 'ताजमहाल हे भारतातील एक अनमोल रत्न असून, ते आपल्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे!' असे सांगणे अखेर भाग पडले आहे.

अर्थात, त्यामुळेच या देखण्या वास्तूसंदर्भात गेल्या महिनाभरात उभ्या केलेल्या वादाचे वर्तुळ पूर्ण झाले आहे. खरे तर योगींचे हे उद्‌गार म्हणजे 'ताजमहाल हा आपल्या संस्कृतीवरील मोठाच कलंक आहे!' असे सांगत या वादाला खतपाणी घालणारे भाजपच्या तिसऱ्या-चौथ्या फळीतील नेते संगीत सोम यांना दिलेली सणसणीत चपराकच होती. मात्र, योगींच्या या गौरवोद्‌गारानंतरही ताजमहालासंबंधात हा वाद शमण्याची चिन्हे नाहीत.

योगींनी गुरुवारी जगातील सात आश्‍चर्यांपैकी एक असलेल्या या वास्तूला भेट देऊन, त्या परिसरात साफसफाई करण्याचा देखावा मोठ्या धूर्तपणे उभा केला खरा; पण त्याच वेळी आगऱ्याचेच भाजपचे आमदार जगनप्रसाद गर्ग यांनी, मंदिर पाडून या वास्तूची उभारणी झाल्याचे संघपरिवार प्रदीर्घ काळापासून वाजवत असलेले तुणतुणेच नव्याने हातात घेतले. शिवाय, रा. स्व. संघाच्या इतिहास विभागाने दर शुक्रवारी ताजमहालाच्या परिसरात होणाऱ्या नमाजावर बंदी घालण्याची मागणी केली आहे! हा वाद आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन पोचला असतानाच, तिकडे कर्नाटकातील भाजप नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री अनंतकुमार हेगडे यांनी 'टिपू सुलतान हा क्रूरकर्मा आणि महिलांवर सामूहिक बलात्कार करणारा नेता होता!' असे 'ट्‌विट' करून नवाच वाद उभा केला. मात्र, त्यांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनीच कर्नाटक विधानसभेतील आपल्या भाषणात टिपू सुलतानवर स्तुतिसुमने उधळून चपराक लगावली.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर, सर्वसामान्य माणसाच्या जगण्याशी कसलेही संबंध नसलेले हे निरर्थक वाद उभे करून धार्मिक ध्रुवीकरणाचा प्रयत्न तर भाजप नेते जाणीवपूर्वक करू पाहत नाहीत ना, अशी शंका घ्यायला जागा निर्माण झाली आहे. 

ताजमहालसंबंधातील वादाला दस्तुरखुद्द आदित्यनाथ यांनीच तोंड फोडले होते आणि पुढे उत्तर प्रदेशातील पर्यटनस्थळांच्या यादीतून ताजमहाल वगळण्यात आल्यामुळे मोठेच वादंग माजले होते. मात्र, त्यानंतर योगींना ही जी काही उपरती झाली आहे, त्याची कारणे ही अर्थातच राज्याच्या अर्थकारणात आहेत. देश-विदेशातील सर्वाधिक पर्यटकांची गर्दी खेचणाऱ्या या वास्तूला भेट देणाऱ्यांकडून फी, तसेच अन्य माध्यमांतून गेल्या तीन वर्षांत उत्तर प्रदेश सरकारच्या गंगाजळीत 75 कोटी रुपयांची भर पडली आहे. त्यामुळेच योगींना या वास्तूची तोंड फाटेतोस्तवर स्तुती करणे भाग पडले आहे.

प्रगत देश पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी सर्व शक्तिनिशी प्रयत्न करतात आणि ऐतिहासिक महत्त्व असलेल्या स्थळांच्या संवर्धनाबाबत काटेकोर प्रयत्न करीत असतात. आपण मात्र अशा स्थळाबद्दल निरर्थक वक्तव्ये करून त्याविषयी वादाचा धुरळा उडविण्यात मश्‍गुल आहोत. त्यातून नुकसानच होणार आहे, हे कळल्यानंतर योगींनी गुरुवारी ताजमहालला भेट दिली. पण त्यावर त्यांच्याच पक्षातील अनेकांनी आक्षेप घेतले होते. 'जात आणि धर्माच्या आधारावर समाजात ज्यांना दुही माजवायची आहे, असेच लोक या भेटीला आक्षेप घेत आहेत,' अशा शब्दांत योगींनी त्यांचा घेतलेला समाचार महिनाभरात त्यांनी कशी कोलांटउडी घेतली, याचीच साक्ष आहे. त्याचबरोबर ताजमहाल केव्हा, कोणी आणि कसा बांधला या इतिहासात जाण्याची आता गरज नसल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, त्याच वेळी भारतीय कामगारांच्या 'घामामधूनच' ही वास्तू उभी राहिली आहे, या सारवासारवीचा पुनरुच्चार करणेही त्यांना भाग पडले आहे. 

'ताजमहाल' आणि राष्ट्रपतींच्याच शब्दांत सांगायचे तर 'ब्रिटिशांशी झुंज देणारा लढवय्या' टिपू सुलतान या संदर्भात वेळ साधून उभ्या करण्यात आलेल्या या वादांमुळेच त्यामागच्या हेतूंबाबत शंका घेता येते. ताजमहालबाबतच्या वादाचा एकूण पोरखेळ तर 'तू मारल्यासारखे कर, मी मलमपट्टी करतो!' याच धर्तीचा होता आणि योगींच्या या वरवरच्या मलमपट्टीनंतरही हे वादंग थांबण्याची चिन्हे नाहीत. त्याचे कारण म्हणजे योगींच्या ताजभेटीच्या पार्श्‍वभूमीवरच त्या परिसरात 'शिव-चालिसा पठण' करण्याचा प्रयत्न काही हिंदुत्ववाद्यांनी केला. मात्र, हे असले निरर्थक वाद उभे करून ध्रुवीकरण साधण्याचा प्रयत्न तरी साध्य होईल काय, हाही प्रश्‍नच आहे; कारण शतकानुशतके लोक ताजमहालवर अमीट प्रेमाचे प्रतीक म्हणून प्रेम करत आले आहेत आणि पुढेही करतच राहतील.

Web Title: marathi news marathi websites Taj Mahal Yogi Adityanath BJP Uttar Pradesh Tourism