मोर्चा!  (एक रोमांचक वृत्तांत...) 

 Pune Edition Editorial Pune Dhig Tang Morcha
Pune Edition Editorial Pune Dhig Tang Morcha

शेतकऱ्यांचा मोर्चा रात्र पडेतोवर ठाण्याच्या टोल नाक्‍यापर्यंत पोहोचला. टोल नाक्‍याच्या अलीकडे आनंदनगर जकात नाका येतो. आनंदनगर जकात नाका हे ठाण्यातील एक ऐतिहासिक ठिकाण... इथंच एकेकाळी मोठमोठाले ट्रक स्लो होत. ट्रक-ड्रायवर रस्त्यावरील शिपायाला प्रेमभराने शेकहॅंड करीत असे. ख्यालीखुशाली विचारून ट्रक पुढे पळवत असे. सारे कसे प्रेमाचे वातावरण होते. गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी! कालौघात जकात आणि परस्परसौहार्द नष्ट झाले. जाऊ दे. 

त्याच जकात नाक्‍याच्या मैदानात मोर्चेकऱ्यांची व्यवस्था झालेली. सर्वत्र लाल टोप्यांचा महासागर पसरलेला. मोर्चेकऱ्यांच्या पायांना फोड आलेले. पाच-पाच रुग्णवाहिका घेऊन डॉक्‍टरांचे पथक आलेले. मोर्चेकऱ्यांच्या तब्बेती तपासल्या जात होत्या. डॉक्‍टरांच्या तंबूतील एक लघुसंवाद आमच्या कानी पडला. तो असा : ""काय होतंय?.. बोला!,'' डॉक्‍टर. 
""पाय दुखतात फार!,'' पेशंट. 
""मोर्चात एवढं चाललं की दुखणारच पाय...'' डॉक्‍टर. 
""छे, मोर्चा कुठे? मी हितंच मुलुंडला ऱ्हातो...'' पेशंट. 
डॉक्‍टर शेजारी एखादी जाडसर टणक वस्तू मिळते का, ते शोधू लागले. तोवर पेशंट पसार झाला. हे असं असतं शहरी लोकांचं. परिस्थितीनं गांजलेले शेतकरी 180 किलोमीटर चालत आलेले आणि ह्यांना... जाऊ दे. 

पत्रकारांचे तांडे आसपास फिरत होते. क्‍यामेरे घेऊन च्यानलवाले शूटिंग घेत होते. क्‍यामेरा बघून एका स्थानिक कार्यकर्त्याने हळूचकन झारा घेऊन भाताच्या ढिगात घालून पोज दिली. च्यानलवाल्याने दुसरीकडे मोहरा वळवला. जाऊ दे. 

...आसपास फिरती शौचालयं. पाण्याचे टॅंकर. थंड पाण्याच्या बाटल्यांची खोकी. भाताचे ढीग, चपातीभाजीचं जेवण... सारा जामानिमा व्यवस्थित होता. एक दाढीधारी गृहस्थ करड्या नजरेनं सारी व्यवस्था बघत होते. मोर्चेकऱ्यांची व्यवस्था ह्याच दाढीधारी सद्‌गृहस्थानं केली होती, असे कळले. काही नवख्या पत्रकारांनी त्यांनाच डॉ. अजित नवले समजून प्रश्‍न विचारायला सुरवात केली; पण "साहेब म्हणतील तसं होईल' असं त्याने सांगताच पत्रकारांना कळले की हे शेतकऱ्यांचे नेते नसून, स्थानिक मावळ्यांचे नेते आहेत! अर्थात त्या सद्‌गृहस्थाने सुरू केलेली मेहनत बघून एका वृद्ध शेतकऱ्यानं त्या गृहस्थाला तोंड भरून आशीर्वाद दिला :

"लेकरा, मुख्येमंत्री व्हशील!' तो सद्‌गृहस्थ लगबगीने त्या वृद्ध शेतकऱ्याच्या (दुसऱ्यांदा) पाया पडला. ते बघून आणखी एका वृद्ध शेतकऱ्यानं तसाच आशीर्वाद दिला. सद्‌गृहस्थ पुन्हा वाकला... असं अनेकदा घडलं. वाकवाकून कमरेचा काटा ढिला झाल्यानंतर त्या सद्‌गृहस्थाला सरळ उभं राहता येईना. शेवटी आम्हीच त्यांना पाणी नेऊन दिलं. जाऊ दे. 

""माझ्या बांधवांनो, आमचे साहेब हे कायम शेतकऱ्यांच्या बाजूने ठामपणाने उभे आहेत, हे तुम्हाला माहीत आहे. साऱ्या जगाला माहीत आहे! शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य व्हाव्यात ह्यासाठी शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही सोबत राहू... तुम्ही जेऊन घ्या. उद्या सकाळी मंत्रालयावर आपण मोर्चा नेऊ! जय महाराष्ट्र!'' 
""...पण आपण मंत्री आहात ना?'' कुणीतरी त्यांना विचारलं. विचारणाऱ्याच्या बगलेत दोघांनी हात घालून त्याचा झोळणा करून त्याला मैदानाबाहेर नेलं. 

""...आमच्या सायबांनी दिलंय हं!,'' पाण्याची बाटली वाटताना सद्‌गृहस्थ न चुकता सांगत होते. तेवढ्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या साहेबांनीही सक्रिय पाठिंबा जाहीर केला असून, शेतकऱ्यांच्या स्वागताला ते स्वत: उपस्थित राहतील, असा निरोप आल्याने आनंदाची लहर मैदानात पसरली. पाठोपाठ शेतकऱ्यांच्या बाबतीत सरकार संवेदनशील असून, त्यांच्या पाठीमागे सतत उभे राहण्याचंच सत्ताधारी कमळ पक्षाचं धोरण असल्यानं खुद्द मुख्यमंत्रीच शेतकऱ्यांना भेटण्यासाठी अर्ध्या रस्त्यात येणार आहेत, असंही कळलं.

विरोधी पक्षाचे नेते तर पाठिंब्यासाठी उतावीळच होते. मैदानात उत्साह पसरला... 
त्या आनंदक्षणाच्या प्रसंगीच एका वृद्ध शेतकऱ्याने दुज्या मोर्चेबांधवाला विचारले, ते मात्र अनाकलनीय होते. तो म्हणाला, ""समद्यांचाच पाठिंबा हाय, तर आपुन मोर्चा घिऊन हितपोत्तर आलो कशापायी?'' 
जाऊ दे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com