न गोठणारी इच्छाशक्ती

संजय जाधव  
सोमवार, 19 मार्च 2018

जगातील सर्वांत निर्जन स्थळी तिच्या सोबतीला होते अनोळखी 22 पुरुष. ही महिला म्हणजे मंगला मणी. अंटार्क्‍टिकावर वर्षभरापेक्षा अधिक वास्तव करणाऱ्या "इस्रो'च्या त्या पहिल्या महिला संशोधक ठरल्या आहेत. कायम नवीन काही तरी शोधण्याची धडपड आणि जिद्द हे मंगला मणी यांचे वैशिष्ट्य.

हाडे गोठविणारी थंडी आणि क्षितिजापर्यंत पसरलेला बर्फ अशा वातावरणात वर्षभरापेक्षा अधिक काळ राहणे आव्हानात्मकच. यातही आयुष्यात कधीही बर्फवृष्टी न पाहिलेली एक 56 वर्षीय संशोधक महिला अशा ठिकाणी तब्बल 403 दिवस राहिली. जगातील सर्वांत निर्जन स्थळी तिच्या सोबतीला होते अनोळखी 22 पुरुष. ही महिला म्हणजे मंगला मणी. अंटार्क्‍टिकावर वर्षभरापेक्षा अधिक वास्तव करणाऱ्या "इस्रो'च्या त्या पहिल्या महिला संशोधक ठरल्या आहेत. कायम नवीन काही तरी शोधण्याची धडपड आणि जिद्द हे मंगला मणी यांचे वैशिष्ट्य. 

"इस्रो'च्या 23 संशोधकांच्या पथकामध्ये त्यांचा समावेश होता. अंटार्क्‍टिकावरील भारती या संशोधन केंद्रात हे पथक नोव्हेंबर 2016पासून वास्तव्यास होते. गेल्या वर्षी डिसेंबरात मोहीम पूर्ण झाली. या पथकाकडे उपग्रहांद्वारे मिळणारी माहिती संकलित करण्याचे काम होते. आपल्या येथून उपग्रहाच्या केवळ तीन ते चार कक्षा दिसू शकतात. अंटार्क्‍टिकावरून मात्र 14 कक्षा दिसतात. तेथील केंद्रात उपग्रहाद्वारे मिळालेली प्रचंड प्रमाणात माहिती जमा केली जाते आणि ती दळणवळण उपग्रहाद्वारे हैदराबाद येथील केंद्राला पाठविली जाते. 
मंगला या केवळ भारती केंद्रातच नव्हे, तर त्या परिसरात असलेल्या एकट्याच महिला होत्या. अशी निवड होणे हे यश साधेसुधे नाही. अत्यंत कठोर अशा शारीरिक, बौद्धिक चाचण्यानंतरच मोहिमेसाठी निवड होते. या चाचण्यांना त्या पुरेपूर उतरल्या. जड बॅकपॅक वाहून नेत गिर्यारोहण करणे यासारख्या दमसास आणि तंदुरुस्तीचा कस पाहणाऱ्या चाचण्या त्यांनी पार केल्या. 

तरीही पुरुषांच्या शक्तीच्या तुलनेत स्त्रियांची शारीरिक शक्ती कमी असते, असे त्या नमूद करतात. पण त्यांचा पुढचा मुद्दा महत्त्वाचा आहे. महिला या भावनिकदृष्ट्या सक्षम असतात. या सामर्थ्याच्या जोरावर त्या अगदी अवघड वाटणारे यशही संपादू शकतात, असे मंगलाताईंना वाटते. त्यांनी ते स्वतःच्या उदाहरणावरून सिद्धही केले. प्रत्येक महिलेने स्वत:वर विश्‍वास ठेवावा आणि कायम आपल्यात असलेल्या चांगल्या गुणांना वाव द्यावा, हे त्यांचे सांगणे त्यामुळेच अनेक महिलांसाठी प्रेरणादायी आहे. 

Web Title: Marathi News Pune Edition Pune Editorial Nammudra Article by Sanjay Jadhav