कावेरीचा राजकीय भोवरा

कावेरीचा राजकीय भोवरा

कावेरी नदीच्या पाणीवाटप प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निवाड्याने देशातील एक दीर्घकालीन जलसंघर्ष निर्णायक वळणावर पोचला आहे. नद्यांचे पाणी ही राष्ट्रीय संपत्ती आहे, असे स्पष्टपणे बजावून न्यायालयाने या विषयावरून संकुचित राजकारण करणाऱ्यांना चपराक दिली, हे बरे झाले. दिशादर्शक म्हणून या निर्णयाचे मोल मोठे आहे. कावेरी ही गोदावरी, कृष्णेनंतरची दक्षिणेतील तिसरी मोठी नदी.

तिच्या काठी विकसित झालेल्या लोकसंस्कृतीचा इतिहास मोठा आहे. आजही वापरात असलेले जगातले चौथ्या व भारतातले पहिल्या क्रमांकाचे धरण, ज्याला कल्लनई डॅम किंवा ग्रॅण्ड अनिकट म्हटले जाते, ते चोल राजाने इसवी सनाच्या दुसऱ्या शतकात कावेरी नदीवर बांधले. ही जलसमृद्धी जितकी जुनी, तितकेच कावेरीच्या पाण्यावरील हक्‍काचे भांडणही जुने. 

साठच्या दशकातील पाणीवाटप लवादांमध्येही कावेरी तंटा प्रमुख होता. कावेरीच्या ऐतिहासिक जलसमृद्धीला अलीकडे ओहोटी लागली. गेल्या दशकात आधी कर्नाटक, नंतर तमिळनाडूत दुष्काळ पडले. गेल्या वर्षीचा तमिळनाडूचा दुष्काळ दीडशे वर्षांतला सर्वाधिक भीषण होता. उपासमार, शेतकरी आत्महत्यांचा उद्रेक झाला. राज्य व केंद्र सरकारला साकडे घालण्यासाठी तिथले शेतकरी दिल्लीत पोचले. अक्षरश: उंदीर खाण्याचे, मलमूत्र प्राशनाचे आंदोलन त्यांनी केले. तरी सत्ताधाऱ्यांना दया आली नाही. या पृष्ठभूमीवर, देशातल्या सर्वोच्च न्यायासनाने पाणीवाटपाचा निवाडा देताना दहा वर्षांपूर्वीच्या लवादाच्या पाणीवाटपात थोडाफार बदल करून पुढच्या पंधरा वर्षांसाठी पाणीवाटपाचे सूत्र ठरवून दिले आहे. ते अमलात आणण्यासाठी सहा आठवड्यांत कावेरी जलव्यवस्थापन मंडळ स्थापन करण्याचे निर्देश आहेत. 

कर्नाटक व तमिळनाडू या दोन्ही राज्यांचे उत्तर-दक्षिण विभाजन करणाऱ्या 802 किलोमीटर लांबीच्या कावेरीचे पाणलोट क्षेत्र जवळपास 81 हजार पाचशे चौरस किलोमीटरचे. त्यात तमिळनाडू व पुदुचेरी मिळून वाटा 44 हजार व कर्नाटकचा 34 हजार चौरस किलोमीटरचा. तथापि पश्‍चिम घाटात पाऊस अधिक असल्याने 50 टक्‍के विश्‍वासार्हतेला उपलब्ध 740 टीएमसी म्हणजे अब्ज घनफूट पाण्यापैकी 54 टक्‍के, अर्थात सव्वाचारशे टीएमसी पाणी कर्नाटकात, तर 32 टक्‍के, 252 टीएमसी पाणी तमिळनाडूमध्ये उपलब्ध आहे. उर्वरित चौदा टक्‍के म्हणजे 113 टीएमसी पाणी केरळमधून मिळते. 2007 मध्ये लवादाने तमिळनाडूला सर्वाधिक 419 टीएमसी, कर्नाटकला 270 टीएमसी व केरळला तीस व पुदुचेरीला सात टीएमसी पाणी वाटून दिले होते. लवादाच्या निवाड्याविरुद्ध तिन्ही राज्ये सर्वोच्च न्यायालयात गेली.

आता सर्वोच्च न्यायालयाने तमिळनाडूच्या वाट्याचे 14.75 टीएमसी पाणी कमी करून तेवढे कर्नाटकला वाढवून दिले आहे. त्या बदल्यात भूगर्भातील दहा टीएमसी पाणी वापरण्याची मुभा तमिळनाडूला देण्यात आली आहे. साधारण पर्जन्यमान व पाणी उपलब्धतेच्या वर्षात तमिळनाडूला किमान 192 टीएमसी पाणी सोडण्याची आधीची अट आता 177.25 टीएमसी अशी शिथिल करण्यात आली आहे. कर्नाटकला मिळालेल्या अतिरिक्‍त पाण्यापैकी पावणेपाच टीएमसी पाणी आयटी हब बेंगळुरूची तहान भागविण्यासाठी वापरायचे आहे. 

सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने कावेरी पाणीवाटपाचा अंतिम निवाडा दिल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद अधिक उमटले आहेत. एकतर कर्नाटक विधानसभेची निवडणूक तोंडावर आहे. कॉंग्रेसच्या ताब्यातील ते अखेरचे मोठे राज्य ताब्यात घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाची कसोटी आहे. ताज्या निवाड्यात कर्नाटकच्या वाट्याला थोडे का होईना अधिक पाणी आल्यामुळे त्याचा राजकीय फायदा उचलण्यासाठी कॉंग्रेस पक्ष सरसावला आहे.

याउलट जयललितांच्या मृत्यूनंतर तमिळनाडू राज्य राजकीय अस्थिरतेच्या भोवऱ्यात आहे. मुख्यमंत्री पलानीस्वामी, उपमुख्यमंत्री पनीरसेल्वम यांना एकाच वेळी पक्षांतर्गत व बाह्य विरोधकांचा सामना करावा लागत आहे. अण्णा द्रमुक पक्षातून तुरुंगात असलेल्या शशिकला व त्यांचा भाचा दिनकरन यांचे दोघांपुढे मोठे आव्हान आहे. 

स्टॅलिनच्या नेतृत्वातील द्रविड मुनेत्र कळघम हा विरोधी पक्ष आक्रमक बनला आहे. रजनीकांत व कमल हसन या अभिनेत्यांच्या महत्त्वाकांक्षांना धुमारे फुटले आहेत. राजकीय वातावरण ढवळून निघण्यामागील हे बहुआयामी राजकीय कंगोरे वगळता सर्वोच्च न्यायालयाचा निवाडा एकंदरीत सर्वसामान्यांना, कावेरीच्या पाण्यावर जगणे-मरणे अवलंबून असलेल्यांना दिलासा देणारा आहे.

कमी पाणलोटात अधिक पाणी उपलब्ध असणे म्हणजे त्या पाण्यावर विशिष्ट राज्याचा हक्‍क ठरत नाही, हा न्यायालयाचा निष्कर्ष अधिक महत्त्वाचा आहे. प्रत्येक प्रश्‍नाचे भांडवल करणाऱ्या राजकीय नेत्यांपेक्षा दुष्काळात होरपळणाऱ्या तमिळनाडूतल्या शेतकऱ्यांनी त्याचे स्वागत केले ते याच कारणाने. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com