हिंसक उन्मादाला आवर घाला

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

गोरक्षणाच्या मुद्यावरून कायदा हातात घेण्याच्या घटना वारंवार होऊनही कठोर कारवाई होत नाही, हे स्पष्ट झाल्याने असे प्रकार पुन्हा पुन्हा होत आहेत. त्यामुळे आता पंतप्रधानांनी स्वत:च याप्रकरणी हस्तक्षेप करण्याची गरज आहे.

अमेरिका, पोर्तुगाल आणि नेदरलॅंड्‌स अशा तीन देशांच्या धावत्या दौऱ्यात भारताला आधुनिक देश बनविण्याची ग्वाही देत, पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी भारतात परतताच त्यांचे "स्वागत' झारखंडमधील एका दुर्दैवी घटनेने झाले आहे. झारखंडची राजधानी रांचीपासून सुमारे 200 किलोमीटरवरील एका खेड्यात घराबाहेर गाईचे सांगाडे आढळल्यामुळे उस्मान अन्सारी याला बेदम मारहाण करण्यात आली आणि त्याचे घर पेटवून देण्यात आले. ही घटना जितकी दुर्दैवी आहे, तितकीच ती अशा घटनांना आपण सरावत चाललो आहोत की काय, असा प्रश्‍नही उपस्थित करणारी आहे. तीन वर्षांपूर्वी मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तारूढ झाले आणि अचानक गोवंशहत्याबंदीचा विषय ऐरणीवर आला. त्यासंबंधात सरकारची भूमिका काहीही असो; तथाकथित स्वयंघोषित गोरक्षकांनीच हा विषय हातात घेतला आणि निरपराध्यांची थेट हत्या करण्यापर्यंत त्यांची मजल गेली. झारखंडमधील ताज्या घटनेने कथित गोरक्षक कसे कोणालाही जुमानत नाहीत, यावर प्रकाश पडला आहे; पण त्याहीपेक्षा दुर्दैवाची बाब म्हणजे अशा अनेक घटना घडूनही सरकार त्याकडे काणाडोळा करत आहे. झारखंडमधील ताज्या घटनेत मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केला आणि उन्मादी जमावाला पांगवण्यासाठी गोळीबार केला, त्यामुळेच उस्मानचे प्राण वाचले, पण त्याची मारहाण काही टळली नाही. पोलिस वेळीच घटनास्थळी पोचले नसते तर अशा प्रकारच्या अन्य घटनांमध्ये जे घडले, त्याप्रमाणे उस्मानचा मृत्यू अटळच होता.

मोदी सरकारने देशाची सूत्रे हाती घेताच अशा असंख्य घटना घडल्या आहेत आणि त्याची सुरवात ही दिल्लीपासून हाकेच्या अंतरावरील दादरी येथे झाली. सप्टेंबर 2015 मध्ये अखलख या नागरिकाला दगडाने ठेचून मारण्यात आले. त्याने आपल्या घरात गोमांस ठेवल्याचा या संभावित गोरक्षकांचा आरोप होता; पण त्यासंबंधात काही रीतसर चौकशी होण्याऐवजी या गोरक्षकांनी थेट कायदाच हातात घेतला आणि अखलखला ठार मारल्यानंतरच त्यांचे समाधान झाले. त्यानंतर जहीद रसूल भट हा अवघा 16 वर्षांचा विद्यार्थी उधमपूरमध्ये ट्रकमधून जात असताना, ट्रकमध्ये गाई आणि गोमांस असल्याच्या संशयावरून जमावाने ट्रकवर पेट्रोलबॉंब फेकला आणि त्यात तो जबर जखमी झाला. मात्र, या सर्वांपेक्षाही दुर्दैवी घटना ही पंधरा वर्षांच्या जुनेद खान याच्याबाबतीत नुकतीच घडली. दिल्ली-मथुरा रेल्वेगाडीने जुनेद हा ईदसाठी खरेदी करून वल्लभगड या आपल्या गावी जात होता. प्रवासात त्याच्या वेशभूषेवरून तो मुस्लिम असल्याचे स्पष्ट झाले आणि प्रथम त्याची "बीफ' खाणारा म्हणून टिंगलटवाळी सुरू झाली. अल्पावधीतच या टवाळीचे रूपांतर तीव्र विद्वेषात झाले आणि अखेर जुनेदला भोसकून ठार मारण्यात आले. गोरक्षणाच्या कारणावरून हत्या केल्यानंतरही सरकार त्याबाबत कोणतीही कारवाई करत नाही, हे आजवरच्या घटनांवरून स्पष्ट झाल्यामुळेच उन्मादी जमाव असे प्रकार बेधडकपणे वारंवार करू लागला आहे, हाच या साऱ्याचा अर्थ आहे. भाजपचा मुस्लिमद्वेष हा उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत त्यांनी मोठ्या प्रमाणावर मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या राज्यात एकही मुस्लिम उमेदवार न दिल्यामुळे स्पष्ट झालाच होता. मुस्लिमांचे एकही मत मिळाले नाही तर चालेल, अशी भाजप नेत्यांची खासगीत दर्पोक्‍ती ऐकायला मिळत असे. मुस्लिमांची मते हवी आहेत की नाहीत, हा भाजपचा पक्षांतर्गत प्रश्‍न आहे; मात्र याचा अर्थ मुस्लिमांच्या हत्येसाठी कायदा हातात घेण्याची मुभा काहींना मिळाली आहे, असा होत नाही.

खरे तर पंतप्रधान मोदी हे आज लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत आणि नोटाबंदीसारख्या काही निर्णयांचा जनतेला फटका बसूनही त्यांची लोकप्रियता अबाधित असल्याचे उत्तर प्रदेशातील निवडणूक निकालांनी दाखवून दिले आहे. सोशल मीडियावरही त्यांचे अमाप समर्थक आहेत. तेव्हा "अखलख ते जुनेद' हा देशातील काही मोजक्‍याच उन्मादी लोकांनी सुरू केलेला प्रवास ते आपल्या एकाच शब्दाने थांबवू शकतात. मात्र, ते त्याबद्दल एक शब्दही काढायला तयार नाहीत. तेव्हा हे असे विद्वेषाचे वातावरण तयार होऊ द्यावे, त्यावर काहीच न बोलता, हालचाल न करता आपसूक त्याचा लाभ मिळत असेल तर घ्यावा, या प्रकारचे राजकारण कदाचित मतांच्या झोळ्या भरणारे ठरेलही; मात्र ते देशाच्या हिताचे नाही. त्यामुळे आता पंतप्रधानांनी स्वत:च या प्रकरणी हस्तक्षेप करण्याची वेळ येऊन ठेपली आहे. शिवाय अशा घटनांमुळे देशाच्या बहुविध संस्कृतीलाही फटका बसू शकतो, हे त्यांच्या लक्षात आले असेलच!

Web Title: marathi news sakal news sakal editorial cow vigilance