व्रतस्थ 'स्वरसम्राज्ञी' 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 एप्रिल 2018

वयाच्या अठराव्या वर्षी "स्वयंवर' नाटकातली रुक्‍मिणी साकारताना त्यांनी अधिक पद्धतशीरपणे अभ्यास केला. अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी त्या मा. दत्ताराम यांच्याकडे गेल्या. नाटकावरच्या समीक्षांचा अभ्यास केला. कॉलेजमधील प्रोफेसर वि. वि. पटवर्धन यांच्याकडून पदांचे अर्थ समजून घेतले.

98व्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा म्हणून कीर्ती शिलेदार यांची निवड झाली आणि बरोब्बर 15 वर्षांपूर्वीची आठवण जागी झाली. 83व्या नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा होत्या जयमाला शिलेदार. एकाच घरातील मायलेकी नाट्यसंमेलनाच्या अध्यक्षा होण्याचा दुर्मिळ योग. संगीत नाटकांची गंधर्व परंपरा सातत्याने जपणाऱ्या शिलेदार कुटुंबासाठीही हा गौरव आनंदाचा आहे. वयाच्या 10व्या वर्षांपासून सतत 50 वर्षे संगीत रंगभूमीवर कार्यरत राहणाऱ्या कीर्ती शिलेदार यांना बालवयातच संगीताभिनयाचे धडे मिळाले. 

1962 मध्ये "तीन शिलेदारांचे सौभद्र' हा नावीन्यपूर्ण प्रयोग त्यांना करायला मिळाला. वयाच्या दहाव्या वर्षी वर्षभर तालमी होऊन, संवाद आणि सूर यांचं नातं जपण्याचा संगीत नाटकाचा संस्कार, त्यांना आई - वडिलांकडून मिळाला. "सौभद्रा'त त्यांना 8 भूमिका करायला, पुरुषी भूमिकेचा आक्रमक रुबाब आणि स्त्री भूमिकेचे लोभस मार्दव, कसे व्यक्त करावे, याचे पद्धतशीर शिक्षण त्यांना मिळाले. योग्य वयात योग्य भूमिका हे त्यांचे पहिले वैशिष्ट्य. 14व्या वर्षी "शारदा' नाटक करताना, गद्याप्रमाणे पद्यातूनही शारदेचे कारुण्य दाखवताना, मुद्रेवरचा भाव कसा राखावा, हे त्यांना सहजगत्या उमजत गेले. 

वयाच्या अठराव्या वर्षी "स्वयंवर' नाटकातली रुक्‍मिणी साकारताना त्यांनी अधिक पद्धतशीरपणे अभ्यास केला. अभिनयाच्या प्रशिक्षणासाठी त्या मा. दत्ताराम यांच्याकडे गेल्या. नाटकावरच्या समीक्षांचा अभ्यास केला. कॉलेजमधील प्रोफेसर वि. वि. पटवर्धन यांच्याकडून पदांचे अर्थ समजून घेतले. 72 मध्ये त्यांच्यासाठी विद्याधर गोखले यांनी "स्वरसम्राज्ञी' हे नाटक लिहिले. या वेळी त्यांना नीलकंठबुवा अभ्यंकरांची गुरुकृपा लाभली. आई-वडिलांकडून मिळालेली नजर अधिक डोळस बनली. अशी घडण होत असताना त्यांनी 20 नाटकांतून भूमिका केल्या. त्या नाटकांचे महाराष्ट्रभर आणि बाहेर चार हजारांहून अधिक प्रयोग झाले. संगीत नाटकाची जादू म्हणजे त्यातील वातावरणनिर्मिती. त्या वातावरणाच्या चैतन्याचा स्पर्श इतरांनाही देण्यासाठी त्यांनी स्पर्धा भरवल्या, नाट्यशिबिरे घेतली. 

"दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा'मध्ये सप्रयोग व्याख्याने दिली. शास्त्रीय संगीतात "सूर ताल शब्द संगती' या विषयावर शोधनिबंध लिहिण्यासाठी त्यांना "शशांक लालचंद शिष्यवृत्ती' मिळाली. संस्कृत मराठी विषय घेऊन त्या पुणे विद्यापीठाच्या पदवीधर आहेत. शाकुंतल, सौभद्र, मानापमान, स्वयंवर, संशयकल्लोळ, कान्होपात्रा अशा वेगवेगळ्या नाटकांतून त्यांची वैशिष्ट्यपूर्ण ओळख निर्माण झाली. दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीमध्ये, जनरल कॉन्सिलच्या सदस्या म्हणून त्यांनी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले आहे. संगीत रंगभूमीच्या समृद्ध परंपरेची जपणूक करणाऱ्या व्रतस्थ स्वरसम्राज्ञी म्हणजे कीर्ती शिलेदार. 
 

Web Title: Marathi Pune Edition Article Editorial Vratstha Swarsamradny