तुतारीचे बोल (अग्रलेख)

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 4 फेब्रुवारी 2017

प्रत्येक साहित्य संमेलन आपापला असा एक रंग घेऊन येते. कधी साहित्यबाह्य कारणांनी झालेल्या वादांनीच त्या रंगाचे रसायन तयार होते, कधी स्थानिक परिसराचा माहौल नि गुणवैशिष्ट्ये संमेलनांना व्यापून राहतात, तर कधी अध्यक्षाचे व्यक्तिमत्त्व आणि वलयच सारा उत्सव भारून टाकणारे ठरते.

प्रत्येक साहित्य संमेलन आपापला असा एक रंग घेऊन येते. कधी साहित्यबाह्य कारणांनी झालेल्या वादांनीच त्या रंगाचे रसायन तयार होते, कधी स्थानिक परिसराचा माहौल नि गुणवैशिष्ट्ये संमेलनांना व्यापून राहतात, तर कधी अध्यक्षाचे व्यक्तिमत्त्व आणि वलयच सारा उत्सव भारून टाकणारे ठरते.

कुठल्याच वादाची फोडणी न मिळाल्याने ठाय लयीतच सुरू झालेल्या डोंबिवलीतील साहित्य संमेलनात कोणते रंग भरले जातात, हे दोन दिवसांत आपल्याला उलगडेलच; परंतु साहित्यिक, समीक्षक आणि प्राध्यापक अक्षयकुमार काळे यांच्या अध्यक्षीय भाषणाचा आधार घेतला, तर मराठी भाषा-भाषक आणि त्यांची संस्कृती यांच्या अस्तित्वाच्या, विकासाच्या प्रश्‍नांची गडद छाया त्यावर पडली आहे, हे स्पष्ट होते. डॉ. काळे यांनी मराठी भाषकांच्या एकूणच दुभंगलेपणाचे वर्णन केले आहे आणि मायभूमीतच मराठी भाषाशिक्षणाचे जे मातेरे करण्याचे उद्योग चालले आहेत, त्याबद्दल चीड व्यक्त केली आहे. ती रास्तही आहे. केवळ अभिधेपुरती उरली, फक्त दळणवळणाचे साधन म्हणून शिल्लक राहिली, तर तर तो मराठी भाषेचाच नाही, तर संस्कृतीचाच विनाश ठरेल हे खरेच; परंतु आता वेळ आली आहे, ती धोक्‍याचे बावटे दाखविण्याऐवजी कृतीचा मार्ग दाखविण्याची. मराठी वाङ्‌मयाचा कस वाढावा, त्याने जागतिक संस्कृतीत आपली नाममुद्रा ठसठशीतपणे उमटवावी, त्यासाठी काय केले पाहिजे, याचे दिग्दर्शन करण्याचा अध्यक्षांचा प्रयत्न दिसतो.

वैश्‍विकतेची दृष्टी हे खरे तर साहित्याचे प्राणतत्त्वच; परंतु जाती, वर्ग, प्रांत, लिंगभेदांमुळे ती दृष्टीच हरविली आहे की काय, अशी स्थिती निर्माण झाल्याची चिंता ते व्यक्त करतात. पण भेदाभेदांनी चिरफाळलेल्या समाजाचे प्रतिबिंब साहित्याच्या क्षेत्रातही पडणार यात नवल ते काय? ते वास्तव बदलण्याचा प्रयत्न किती होतो? हा केवळ साहित्याचा प्रश्‍न नसून समाजापुढीलच मूलभूत प्रश्‍न आहे आणि ज्या आर्थिक-सामाजिक आणि जागतिक पर्यावरणातून ते प्रश्‍न अधिक तीव्र स्वरूप धारण करताहेत, त्यांचाही विचार करावा लागतो. आपले साहित्य आणि साहित्यिक हे सगळं वास्तव कवेत घेण्याच्या प्रयत्नांत उणे पडत तर नाहीत ना, याचा धांडोळा घेण्याची निकड आहे. 

साहित्यिक, समीक्षक, धोरणकर्ते अशी अनेक घटकांना डॉ. काळे यांनी आवाहन केले आहे. हे सगळे घटक महत्त्वाचे आहेतच; परंतु मराठी भाषेच्या दिमाखदार वैभवाकडे जाण्यासाठी सर्वसामान्य मराठीजनांमध्ये प्रेरेणेचे स्फुल्लिंग फुलविण्याची गरज आहे. केवळ समीक्षकी, प्राध्यापकी थाटाच्या विवेचनातून ते होऊ शकत नाही. आपल्या अकादमिक वर्तुळातून बाहेर पडून आम जनतेशी व्यापक संवाद साधण्यासाठी साहित्यिक, समीक्षक तळमळीने मैदानात उतरले तरच हे चित्र बदलू शकते. पण तशी असोशी दिसत नाही आणि मग अध्यक्षांनीच वर्णने केलेले वेगवेगळ्या तऱ्हांचे विसंवाद धुमाकूळ घालत राहतात. त्यामुळेच "एक तरी ओवी अनुभवावी' या धर्तीवर "एक तरी कार्यक्रम द्यावा,' ही खरे तर मराठी साहित्य संमेलनांकडून अपेक्षा आहे. मग तो विकिपीडियावर मराठी नोंदी लिहिण्याचा कार्यक्रम असू शकेल, तरुण पिढीच्या हातातील अत्याधुनिक संपर्कमाध्यमांवर मराठी संवाद वाढविण्याची धडपड असेल किंवा भाषाशिक्षणाचा कस वाढविण्यासाठी शिक्षकांचा प्रशिक्षण कार्यक्रम असेल. 

साहित्य संमेलनाध्यक्षांचे भाषण ऐकल्यानंतर आजवरच्या अध्यक्षांनी मराठी भाषेच्या स्थिती-गतीविषयी मांडलेल्या समस्या आणि वेदनांचे पडसादच पुन्हा कानात घुमताहेत, असा अनुभव येतो. मराठी भाषा, साहित्याचा उत्सव साजरा करीत असताना निर्मळ आनंदाची कारंजी उसळण्याऐवजी त्यात दीर्घकाळ ठुसठुसणाऱ्या दुखण्याची आठवण का निघावी, हा खरे तर एक व्यथित करणारा प्रश्‍न. काही कामे अशी असतात, की त्यांचे प्रयोजन संपण्यातच त्यांची फलश्रुती असते; परंतु मराठीच्या अस्तित्वाविषयी, विकासाविषयी पडणारे प्रश्‍न जर वर्षानुवषे आपल्याला छळत असतील, तर मुळातच काहीतरी चुकते आहे खास. खरे तर आता वेळ आली आहे, त्या चुकांचा शोध घेण्याची. त्यांचे समूळ उच्चाटन करीत नवा मार्ग दाखविण्याची आणि त्या दिशेने जाण्यासाठी चळवळ उभारण्याची. "व्यथा-समस्यांची वर्णने फार झाली; प्रश्‍न आहे तो मराठीची दुरवस्था बदलण्याचा' अशी गर्जना करीत सगळी मरगळ झटकून टाकण्याची तमाम भाषाप्रेमींना तहान आहे. संमेलनांमधून उसळणाऱ्या गर्दीतील अनेक चेहरे तेच तर सांगू पाहत असतात. म्हणूनच प्रतीक्षा आहे ती तशी तुतारी फुंकली जाण्याची. त्यात स्वप्राण ओतण्याची. तसे झाले नाही तर त्याच त्या व्यथा-वेदनांची ब्रासबॅंडकीच फक्त उरेल. 

Web Title: marathi sahitya sammelan editorial