भ्रष्टाचाराची उड्डाणे? (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 डिसेंबर 2016

पाकिस्तानबरोबरील १९६५ मधील युद्ध आणि १९७१ मधील बांगलादेश मुक्तिसंग्राम यांत हवाई दलाचे लढाऊ वैमानिक म्हणून सहभागी झालेले माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांनी आपल्या अटकेनंतर ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराशी थेट पंतप्रधान कार्यालयाचे ‘नाते’ जोडल्यामुळे खळबळ माजणे साहजिकच आहे. त्यागी हे २००४ ते ०७ या काळात हवाई दलाचे प्रमुख होते. भ्रष्टाचारप्रकरणी अटक होणारे हवाई, नौदल वा लष्कर यापैकी कोणत्याही दलाचे ते पहिले प्रमुख ठरले आहेत.

पाकिस्तानबरोबरील १९६५ मधील युद्ध आणि १९७१ मधील बांगलादेश मुक्तिसंग्राम यांत हवाई दलाचे लढाऊ वैमानिक म्हणून सहभागी झालेले माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी यांनी आपल्या अटकेनंतर ऑगस्टा वेस्टलॅंड हेलिकॉप्टर खरेदी व्यवहाराशी थेट पंतप्रधान कार्यालयाचे ‘नाते’ जोडल्यामुळे खळबळ माजणे साहजिकच आहे. त्यागी हे २००४ ते ०७ या काळात हवाई दलाचे प्रमुख होते. भ्रष्टाचारप्रकरणी अटक होणारे हवाई, नौदल वा लष्कर यापैकी कोणत्याही दलाचे ते पहिले प्रमुख ठरले आहेत. त्यांच्याच कारकिर्दीत राष्ट्रपती, पंतप्रधान, तसेच अन्य ‘व्हीव्हीआयपी’ व्यक्‍तींसाठी ऑगस्टा वेस्टलॅंड कंपनीकडून तीन हजार ७६७ कोटींची १२ हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा हा व्यवहार होऊ घातला होता. या प्रकरणी स्वत: त्यागी, त्यांचे पुतणे संजीव त्यागी, तसेच त्यांचे वकील गौतम खेतान यांनी मिळून ४५० कोटींची लाच घेतल्याचे आरोप झाल्यापासून गेली पाच वर्षे ‘सीबीआय’ त्यांची चौकशी करत होते; मात्र आरोपांच्या या धुराळ्यानंतर यूपीए’ सरकारने हा व्यवहार रद्द केला होता.

‘ऑगस्टा’ची मूळ मातृकंपनी इटालियन असल्यामुळे या प्रकरणास एक वेगळीच झालर प्राप्त झाली असून, त्यामुळे राजीव गांधी यांच्या काळात गाजलेल्या ‘बोफोर्स’ तोफा खरेदी प्रकरणाची आठवण होणे स्वाभाविक आहे. तेव्हाही त्या प्रकरणातील दलाल ऑटोव्हियो क्‍वात्रोची हा इटालियन असल्यामुळेच विरोधी पक्ष त्याचा संबंध थेट सोनिया गांधी यांच्याशी जोडून मोकळे झाले होते. त्यात अटकेनंतर त्यागी यांनी तत्कालीन पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या कार्यालयास या प्रकरणात ओढल्यामुळे हे प्रकरण आता रंगत जाणार, यात शंका नाही; मात्र भारतीय जनता पक्षाने या प्रकरणाचे राजकारण सुरू केलेले दिसते. ‘यूपीए’ सरकारच्या काळात ‘सीबीआय’ पिंजऱ्यातील पोपट बनला आहे, या सर्वोच्च न्यायालयाच्या शेऱ्याचा आधार घेऊन आता ‘सीबीआय’ पिंजऱ्यातून मुक्‍त झाल्याचे भाजपचे टीव्हीवरील बोलके पोपट सांगू लागले आहेत! ऑगस्टा वेस्टलॅंडकडूनच ही हेलिकॉप्टर खरेदी करता यावीत, म्हणून त्यागी यांनी त्यांच्या उड्डाण क्षमतेच्या निकषांमध्ये काही सोयीस्कर बदल केले आणि त्याबदल्यात लाच’ घेतली, असा त्यांच्यावर मुख्य आरोप आहे. आता त्यागी यांच्या म्हणण्यानुसार हा पंतप्रधान कार्यालयासह सर्वांचा एकत्रित निर्णय होता, म्हणे! चौकशीत काय ते सत्य बाहेर येईलच; मात्र तोपावेतो कसोटी आहे, ती ‘सीबीआय’चीच!

Web Title: marm article