नाट्यनिष्ठेचा गौरव (मर्म)

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 नोव्हेंबर 2016

"सोनेरी अक्षरांनी लिहावं, असं आयुष्यात काही घडलं नाही,'' अशी खंत आपल्या "मी एक छोटा माणूस' या आत्मचरित्रात व्यक्त करणारे अभिनेते जयंत सावरकरांना नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले आहे.

"सोनेरी अक्षरांनी लिहावं, असं आयुष्यात काही घडलं नाही,'' अशी खंत आपल्या "मी एक छोटा माणूस' या आत्मचरित्रात व्यक्त करणारे अभिनेते जयंत सावरकरांना नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद मिळाले आहे.

सावरकरांच्या नाट्य कारकिर्दीचा सन्मान त्यांच्या निवडीने झाला आहे, किंबहुना 65 वर्षे केवळ नाटकाचा ध्यास घेऊन अखंड कार्यरत राहणाऱ्या अभिनेत्याला मराठी रसिकांनी केलेला हा सोनेरी सलाम आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागरजवळील पाभरे गावातून मुंबईत दाखल झालेल्या सावरकरांच्या नाट्यनिष्ठेचा हा गौरव आहे. सावरकर मुंबईत कमानी इंजिनिअरिंग कंपनीत स्टेनोग्राफर म्हणून नोकरीला होते. नटवर्य मामा पेंडसे हे त्यांचे सासरे. जावयाने पूर्णवेळ नाटक करण्याला त्यांचा विरोध होता. आरंभीची काही वर्षे त्यांनी पडद्यामागे राहून कामे केली. पुढे मामांबरोबरच केशवराव दाते, मास्टर दत्ताराम, भालचंद्र पेंढारकर, दाजी भाटवडेकर, राम मराठे अशा दिग्गजांचा सहवास त्यांना मिळाला. रंगमंचावरच्या पाच पिढ्या पाहणारा हा कलावंत अनेक मराठी व हिंदी चित्रपटांत दिसला; मात्र त्यांचा जीव रमला तो नाटकातच. विजया मेहता, दामू केंकरे, सुधा करमरकर ते चंद्रकांत कुलकर्णी, मंगेश कदम, अद्वैत दादरकर अशा दिग्दर्शकांकडे त्यांनी भूमिका केल्या.

"तुझ आहे तुजपाशी' मधला श्‍याम, आचार्य अत्र्यांनी लिहिलेल्या "सम्राटसिंह'मधील विदूषक, "भावबंधन'मधला कामण्णा, "एकच प्याला'मधला तळीराम,"सौजन्याची ऐशीतैशी'मधला मंडलेकर, "व्यक्ती आणि वल्ली'मधला "अंतू बर्वा' या त्यांच्या भूमिका इतर अनेक भूमिकांबरोबरच संस्मरणीय ठरल्या. पडद्यामागे काम करणाऱ्या कलावंतांची परवड ठाऊक असल्याने त्यांनी आपल्या पुरस्काराची रक्कम वृद्ध कलावंत पेन्शन निधीसाठी दिली होती. भूमिका जगणे वगैरे भाकडकथांवर त्यांचा विश्‍वास नाही; पण साकारत असलेल्या पात्राची मानसिकता जाणून त्यानुसार भूमिका सादर करण्याकडे त्यांचा कल होता. सावरकरांचा चेहरा अत्यंत बोलका. त्यामुळे कोणतेही पात्र रंगवण्यासाठी त्यांना मुखवटा किंवा तत्सम उपचारांची कधी गरज भासली नाही. स्वतःचे कर्तृत्व ठाऊक असलेल्या निष्ठावान रंगकर्मीची निवड अध्यक्षपदासाठी झाली. हौशी रंगभूमीसाठी तळमळीने काम करणारे प्रवीण कुलकर्णी, बापू लिमये, प्रशांत दळवी प्रभृतींमधून त्यांची निवड झाली, त्यामुळे हौशी रंगभूमीच्या विकासासाठी सावरकर प्रयत्नशील राहतील, असा विश्‍वास वाटतो.

Web Title: marm : honor of drama