मर्म : प्रवासी भारत!

मर्म : प्रवासी भारत!

अवघ्या काही दशकांपूर्वीपर्यंत चारधाम यात्रा कोणी करून आल्याचे कळले, की आपणच धन्य व्हायचो! मग परदेशगमनाची तर बातच सोडा. मात्र, गेल्या काही वर्षांत प्रवासाचे भलतेच वेड भारतीयांना लागले असल्याचे दिसते. भारतातील 17 टक्‍के कुटुंबे महिनाकाठी एकदा तरी दोन दिवसांसाठी कोठे ना कोठे जातातच, असे एका राष्ट्रीय पाहणीतून निष्पन्न झाले आहे. हे भारतीय अर्थातच विविध कारणांसाठी घराबाहेर नव्हे, तर गावाबाहेर पडतात आणि त्यापैकी 86 टक्‍के सहली या सामाजिक संबंधातून उभे राहिलेले नाते दृढ करण्यासाठी असतात. गेल्या वर्षभरात पाच कोटी 63 लाख भारतीय या ना त्या कारणांनी सहलीवर गेले होते! अर्थातच केंद्र सरकारने त्यासाठी "अमूल्य भारत!‘ -इनक्रेडिबल इंडिया- या शीर्षकाखाली हाती घेतलेल्या आणि गेली अनेक वर्षे सुरू असलेल्या मोहिमेचा हातभार मोठा आहे. 


गेल्या वर्षभरात घराबाहेर पडलेल्या या पाच कोटींहून अधिक नागरिकांपैकी 65 टक्‍के लोक उपचारांसाठी अन्यत्र गेल्याचे आढळून आले आहे, ही बाब मात्र आपल्या देशातील एकूणच आरोग्यव्यवस्थेवर बोट ठेवणारी आहे. या आकडेवारीचा स्पष्ट अर्थ आपल्याच गावातील आरोग्यसेवेवर जनता विश्‍वास ठेवण्यास तयार नाही, असा निघू शकतो. मात्र, त्यात ग्रामीण भागातील जनतेने अत्याधुनिक उपचारांसाठी शहरांकडे धाव घेतलेली असू शकते, हे गृहीत धरायला हवे. तरीही गेल्या सात-आठ वर्षांत म्हणजे 2008-09 नंतर उत्तम आरोग्यसेवेसाठी गावाबाहेर गेलेल्यांच्या संख्येत झालेली चौपट वाढ नेमके काय सूचित करते, याचाही सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा.
याच पाच कोटींमध्ये निव्वळ सहल आणि मौजमजा यासाठी बाहेर पडलेल्यांची संख्या 34 टक्‍के म्हणजे एक कोटीहून अधिक आहे. मात्र, हे लोक दुसऱ्या गावांत गेल्यावर कोठे राहतात? ग्रामीण भागातील 26 टक्‍के लोक नातेवाईक वा मित्रांकडेच राहतात. यापैकी निव्वळ खरेदीसाठी बाहेर पडले होते अवघा एक टक्का लोक! तरीही 1991 मध्ये भारताने आर्थिक सुधारणा अमलात आणल्या आणि समाजातील एका मोठ्या गटाच्या हातात चांगला पैसा खुळखुळू लागला. त्याचीच ही अपरिहार्य अशी परिणती आहे. एकुणात काय? कारणे कोणतीही असली, तरी देश आता "प्रवासी भारत‘ बनला आहे, हेच खरे! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com