मर्म : उंच झोक्‍याचे वास्तव 

मंगळवार, 21 मे 2019

लोकसभा निवडणूक निकालांची सर्वाधिक उत्सुकता नेहमीच देशातील उद्योगक्षेत्राला असते आणि त्याचे प्रतिबिंब शेअर बाजारात उमटत असते. केंद्रात पुन्हा नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) बहुमत मिळेल, असा अंदाज मतदानोत्तर कल चाचण्यांनी व्यक्त केल्यानंतर त्याचे खणखणीत पडसाद शेअर बाजारात सोमवारी उमटले. केवळ कल पाहून अन्‌ ऐकून आज बाजारात धूमशान झाले.

मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक- "सेन्सेक्‍स' तब्बल 1421 अंशांची, तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक- "निफ्टी' 421 अंशांची सलामी देऊन गेला. 10 सप्टेंबर 2013 नंतर प्रथमच बाजाराने एका दिवसातील सर्वोच्च तेजी दाखवली आणि त्यामुळे उद्योगजगताबरोबरच तमाम गुंतवणूकदारवर्ग खूष झाला. डॉलरच्या तुलनेत रुपयाही पुन्हा गोजिरवाणा दिसू लागला. 

प्रत्यक्ष निकाल जाहीर व्हायला अजून दोन दिवसांचा अवधी आहे. तोपर्यंत तरी बाजार "एक्‍झिट पोल'च्या अंदाजांच्या हिंदोळ्यावरच झुलणार, हे निश्‍चित आहे. पण... यातील "पण' खूप महत्त्वाचा आहे, कारण मोदी सरकार येऊ शकते, हा अंदाज आहे, प्रत्यक्ष अंतिम निकाल नाही. ते सर्व 23 मेनंतरच समजणार आहे, हे लक्षात घ्यायला हवे. कारण "एक्‍झिट पोल' हे नेहमी खरे ठरतात, असे नाही.

गेल्या आठवड्यातील ऑस्ट्रेलियातील उदाहरण सर्वांनाचा धक्का देणारे होते. कल किंवा अंदाजांप्रमाणेच निकाल लागले, तर बाजाराला आणखी बळ मिळेल, तो आजवरचा विक्रमही मोडेल, यात शंका नाही. मात्र, 23 तारखेला काहीसे वेगळे चित्र समोर आले, तर याच बाजारात उलथापालथ होऊ शकते, हेही लक्षात घेतले पाहिजे. शेअर बाजारातील चढ-उतारांना कोणतेही कारण पुरेसे ठरताना दिसते. त्यासाठी प्रत्येक वेळी ठोस घटना-घडामोड घडावीच लागते, असे नाही. अंदाज आणि शक्‍यतांच्या लाटांवरही हा बाजार स्वार होत असतो. बऱ्याचदा "फंडामेंटल'कडे दुर्लक्ष करून भावनांच्या आहारी गेलेला बाजार अनेकदा अनुभवायला आलेला आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांनी आजच्या तेजीला हुरळून न जाता वस्तुस्थितीला आणि पर्यायाने वास्तवाला सामोरे जाण्याची हुशारी दाखवली पाहिजे.