भिंत नव्हे, मैत्रीचा सेतू हवा

मेल्बी प्रिआ  (मेक्‍सिकोच्या भारतातील राजदूत) 
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करताना परस्परांशी मैत्रीचे संबंध ठेवण्यावर मेक्‍सिकोचा विश्‍वास आहे. अमेरिकेबरोबरच्या आर्थिक-व्यापारी संबंधांचे स्वरूप लक्षात घेतले, तर त्याचा फायदा उभयपक्षी होतो आहे, हे लक्षात येईल. 

-मेल्बी प्रिआ 
(मेक्‍सिकोच्या भारतातील राजदूत) 

आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यवहार करताना परस्परांशी मैत्रीचे संबंध ठेवण्यावर मेक्‍सिकोचा विश्‍वास आहे. अमेरिकेबरोबरच्या आर्थिक-व्यापारी संबंधांचे स्वरूप लक्षात घेतले, तर त्याचा फायदा उभयपक्षी होतो आहे, हे लक्षात येईल.

अमेरिका व मेक्‍सिको यांच्या सीमेवर भिंत बांधण्याची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भले केलेली असो; परंतु दोन्ही देशांतील पूर्वापार संबंधांकडे पाहता भिंत उभारण्याचा निर्णय अव्यवहार्य आहे, हे दिसते. आमचा विश्‍वास भिंत उभारण्यावर नाही, तर मैत्रीचे सेतू बांधण्यावर आहे. 

आमच्यातील दुतर्फा व्यापाराचे प्रमाण 2015 मध्ये 583.6 अब्ज डॉलर इतके प्रचंड आहे. याचा अर्थ, दर मिनिटास दहा लाख डॉलर अथवा दिवसाकाठी 1.5 अब्ज डॉलरचा व्यवहार होतो. मेक्‍सिको अमेरिकेकडून 267.2 अब्ज डॉलर मालाची आयात व 316.4 अब्ज डॉलरच्या मालाची निर्यात अमेरिकेत करतो. हे प्रमाण अमेरिकेच्या जर्मनी, दक्षिण कोरिया व जपान या तिन्ही देशांशी असलेल्या एकूण उलाढालीपेक्षा (प्रतिवर्ष 483 अब्ज डॉलर) अधिक आहे. याचा अर्थ, जपान व चीनपेक्षाही मेक्‍सिको अमेरिकी मालाची अधिक आयात करतो. अमेरिकेसाठी मेक्‍सिको दुसऱ्या क्रमांकाची बाजारपेठ आहे.

अमेरिकेतील राज्यांकडे पाहाल, तर एकट्या टेक्‍सास राज्याबरोबर वार्षिक व्यापार 92 अब्ज डॉलरचा आहे. दोन्ही देश एकमेकांवर किती अवलंबून आहेत, हे त्यावरून ध्यानात येईल. त्यामुळे संबंध तणावग्रस्त झाले, तर त्याचा फटका दोघांनाही बसेल. 
मेक्‍सिकोतून गुन्हेगार आदी स्थलांतर करीत आहेत, असा युक्तिवाद अमेरिकी निवडणुकीत होत होता. मेक्‍सिकोहून अमेरिकेत स्थलांतर करणाऱ्यांत केवळ मेक्‍सिकन नाहीत, तर दक्षिण अमेरिकेतील ग्वाटेमाला, इक्वेडोर, कोस्टारिका आदी देशांतील लोकही मेक्‍सिकोमार्गे अमेरिकेत प्रवेश करतात. ग्वाटेमालातून युद्धकाळात आलेले लोक आता मेक्‍सिकोचे नागरिक आहेत. सीमा ओलांडणारा एकही मेक्‍सिकन दहशतवादी नाही. उलट मेक्‍सिकन लोकांनी अमेरिकेत जाऊन त्यांच्या अर्थ व समाजव्यवस्थेला मोठा हातभार लावला आहे. अमेरिकेत स्थायिक झालेल्या मेक्‍सिकन लोकांची संख्या तीन कोटी 40 लाख असून, त्यापैकी दोन तृतीयांश अमेरिकेत जन्मले आहेत. तेथील अनेक क्षेत्रांत ते काम करीत आहेत. मेक्‍सिकन लोकांच्या किमान तीन पिढ्या तेथे स्थायिक झाल्यात. शिवाय, आधी म्हटल्याप्रमाणे, पूर्वापार संबंधांचा विचार अमेरिकी नेतृत्वाला करावा लागेल. केवळ एक सरकार बदलले म्हणून आमचे संबंध कायमचे दुरावतील, असे नाही. वाटाघाटींच्या प्रक्रियेवर आमचा विश्‍वास आहे. त्या उद्देशाने उच्च पातळीवर चर्चा सुरू असून, अलीकडे दोन्ही देशांच्या संरक्षणमंत्र्यांची दूरध्वनीवरून बोलणी झाली. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्‍स टिलरसन मेक्‍सिकोला भेट देण्याची शक्‍यता आहे. तथापि, भिंत उभारण्याच्या मुद्यांवरून झालेल्या मतभेदानंतर मेक्‍सिकोचे अध्यक्ष एन्रिक पेना नेटो यांची अमेरिका भेट नजीकच्या भविष्यकाळात होण्याची शक्‍यता नाही. मेक्‍सिको हा सार्वभौम देश आहे. मेक्‍सिको व मेक्‍सिकन लोकांचे हितसंबंध ध्यानात ठेवूनच बोलणी होतील. दोन्ही देशांचे मूलभूत संबंध आहेत, याची जाणीव अमेरिकी नेत्यांना ठेवावी लागेल. मेक्‍सिकोचे माजी अध्यक्ष बेनितो जुआरेझ गार्सिया यांचे वाक्‍य म्हणूनच महत्त्वाचे ठरते. ते म्हणाले होते, ""अमंग इंडिव्हिज्युअल्स, ऍज अमंग नेशन्स, रिस्पेक्‍ट फॉर द राइट्‌स ऑफ अदर्स इज पीस.'' 

अमेरिका, कॅनडा व मेक्‍सिको या तीन देशांनी एकमेकांशी स्पर्धा करीत सर्वांगीण विकास साधला. म्हणूनच परस्परसहकार्याच्या दृष्टीने नॅफ्टाकडे (द नॉर्थ अमेरिकन फ्री ट्रेड ऍग्रीमेन्ट) पाहावे लागेल. 1994 मध्ये हा करार झाल्यानंतर अमेरिका - मेक्‍सिको दरम्यानचा व्यापार सहापट वाढून 81 अब्ज डॉलरवरून 583.6 अब्ज डॉलरवर पोचला. त्यावर अवलंबून असलेल्या अमेरिकेतील रोजगाराचे प्रमाण सात लाखांवरून 50 लाखांवर गेले. अमेरिकन चेंबर ऑफ कॉमर्सच्या आकडेवारीनुसार, आज त्या देशातील साठ लाख रोजगार या व्यापारावर अवलंबून आहेत, तर "नॅफ्टा'च्या उलाढालींचे 1993 मधील प्रमाण 290 अब्ज डॉलरवरून 2016 मध्ये तब्बल 19 महापद्म डॉलर (ट्रिलियन) झाले. "नॅफ्टा'च्या अतिरिक्त व्यापारामुळे अमेरिका प्रतिवर्ष 127 अब्ज डॉलरने सधन होत आहे. अमेरिकेत मेक्‍सिकोने 17.6 अब्ज डॉलर गुंतवणूक केली आहे. तसेच, मेक्‍सिकन पर्यटकांकडूनही अमेरिकेला उत्पन्न मिळते. 2015 मध्ये एक कोटी 84 लाख मेक्‍सिकन लोकांनी अमेरिकेत पर्यटन केले. मेक्‍सिकोच्या 50 वकिलाती अमेरिकेत आहेत. कोणत्याही देशांच्या वकिलातींची संख्या एवढी मोठी नाही. ही आकडेवारी अमेरिकेतील निरनिराळ्या खात्यांनी संकलित केली आहे. त्याकडे अमेरिकेला दुर्लक्ष करता येईल काय? ""आय विन, यू लूज,'' हे तत्त्व आम्हाला मान्य नाही. 

भारत व मेक्‍सिको संबंध सौहार्दपूर्ण असून, निरनिराळ्या क्षेत्रांत त्यांची वाढ होत आहे. हिला मी "प्लॅटॉनिक रिलेशनशिप' म्हणते. अशा संबंधांनंतर केवळ विवाहच काय तो बाकी उरतो! दुतर्फा व्यापाराचे प्रमाण 16 अब्ज डॉलर आहे. ब्राझीलपेक्षा मेक्‍सिकोच्या भारताशी होणाऱ्या व्यापाराचे प्रमाण अधिक आहे. भारत अत्यंत प्रगतिशील देश आहे. अवकाश संशोधन क्षेत्रात त्याने मोठी भरारी मारली आहे. अलीकडे लॅटिन अमेरिकन व्यापार संघटनेने भारतातील कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीजची (सीआयआय) भागीदार म्हणून निवड केली व मेक्‍सिकोत परिषद झाली. मेक्‍सिको व भारतादरम्यान, जलसंधारण, सौरऊर्जा, अवकाश संशोधन, जैवतंत्रज्ञान आदी क्षेत्रांत सहकार्य आहे.

गेल्या वर्षी जूनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेक्‍सिकोला भेट दिली. या वर्षी मेक्‍सिकन संसद सदस्य भारताला भेट देतील. ""भारताला अणुपुरवठा गटाचे (एनएसजी) सदस्यत्व मिळण्यास मेक्‍सिकोचा पाठिंबा आहे. तथापि, संयुक्त राष्ट्रसंघातील सुरक्षा समितीत राष्ट्रांना नव्याने कायमस्वरूपी सदस्यत्व मिळण्यास विरोध आहे. आमचा पाठिंबा आहे, तो हंगामी सदस्यत्वाला. "कायम सदस्य' राष्ट्रांची संख्या जास्त झाली, की विशेषाधिकाराचा कोण व कसा वापर करील, हे सांगणे कठीण. मात्र सुरक्षा समितीचा विस्तार व राष्ट्रसंघात सुधारणा झाल्या पाहिजेत. 

Web Title: Melbi Pria write about USA, Mexico wall issue