साधकांसाठी होळीचे चार धडे

holi
holi

उत्सवाला पावित्र्याची जोड मिळते, तेव्हा ते खऱ्या अर्थाने परिपूर्ण होते. हे फक्त शरीर आणि मनाच्या स्तरावरच नाही, तर आत्म्याचाही उत्सव होतो. उत्सव उत्स्फूर्तपणे बाहेरच नव्हे, तर जीवन हे रंगांचे उसळणारे कारंजे होते. होळीचा पवित्र सण फक्त बाहेरचा उत्सव नाही, तर आतील बुद्धिमत्तेला चालना देणारा आहे, याकडे आपल्याला लक्ष द्यायचे आहे. तुम्ही ज्ञानात असता तेव्हा तुमच्या जीवनातील सर्व रंग शांतिपूर्ण सहअस्तित्वात असतात. विविधतेचे सामंजस्य जीवनाला सळसळणारे, प्रसन्न आणि अधिक रंगीबिरंगी करते.

होळीचा एक संदेश आहे, शत्रूंनादेखील मित्र करा. कोणी शत्रू राहायलाच नको. उदाहरणार्थ, युधिष्ठिर. युधिष्ठिर हे अजातशत्रू होते. म्हणजे, त्यांचा कोणी कधी शत्रूच नव्हता. शत्रू उत्पन्न कसा होतो? आपल्या आत वैरभाव उत्पन्न होतो, तेव्हा शत्रू उत्पन्न होतो. आपल्यात वैरभावच नसेल, तर दुसरा कोणी आपला शत्रू होणार नाही, हे ध्यानात असू द्या. इतर कोणी स्वतःला आपला शत्रू समजू शकतो. पण, आपल्याकडून वैरभाव असणार नाही.

जीवन रंगांनी परिपूर्ण आहे आणि प्रत्येक रंगाचे वेगवेगळे दिसणे आणि आनंद घेणे, याला अर्थ आहे. सर्व रंग पांढऱ्या रंगापासून तयार होतात आणि परत एकत्र केले, तर काळा रंग होतो. तसेच, जीवनात आपणाला वेगवेगळ्या भूमिका शांतिपूर्ण आणि शालीनतेने अंगात  बाणायला हव्यात. उदाहरणार्थ ः पित्याची भूमिका आपण आपल्या कार्यालयातही करू लागलो, तर गोष्टीमध्ये बिघाड होण्याचीच शक्‍यता आहे. मन स्वच्छ आणि चेतना शुद्ध, शांतिपूर्ण प्रसन्न आणि ध्यानपूर्ण असेल, त्या वेळी सर्व रंगांचा आणि भूमिकांचा उदय होतो. आपल्याला प्रत्येक भूमिका चांगल्या प्रकारे वठविण्याची शक्ती मिळते. आपल्याला यासाठी आपल्या चेतनेत वेळोवेळी परत डुंबता आले पाहिजे. आपल्या सर्व भूमिका नीट वठविण्यासाठी गाढ विश्रांती घेता आली पाहिजे. आता सर्वांत मोठी अडचण विश्रांतीची गरज आहे. गरज म्हणजे तणाव. चांगल्या गरजादेखील मोठा तणाव उत्पन्न करतात. खरेतर उच्च लक्ष्य तुलनात्मकदृष्ट्या कमी त्रास देतात. इच्छा कधी कधी मनाला फार व्यथित करतात. मग कोणी काय करावे?

आपल्या इच्छेवर लक्ष केंद्रित करणे आणि समर्पित होणे, हा एकच मार्ग आहे. जाणीवपूर्वक आपल्या मनावर दृष्टी ठेवणे म्हणजे कामाक्षी. जागृतीमुळे कामनेची मनावरील पकड कमी होते आणि समर्पण संभवते आणि त्यातून अमृत वाहू लागते. चित्रात देवी कामाक्षीला बघितले तर तिने एका हातात ऊस आणि दुसऱ्या हातात फूल घेतलेले असते. उसाचा दांडा कणखर असतो आणि मधुरतेच्या प्राप्तीसाठी त्याला पिळावे लागते. फूल कोमल असते आणि त्यात अमृत असते. हेच जीवनाचे खरे वर्णन आहे. थोडे-थोडे दोन्ही. बाहेरील जगतातून सुखप्राप्तीपेक्षा ज्याला अधिक श्रम लागतात, त्याचा आनंद आतूनच घेणे जास्त सोपे आहे.

पार्वती तप करीत होती आणि शिव समाधीत होते, त्या वेळची गोष्ट एका विद्वानाने सांगितली. या दोघांना एकत्र करण्याच्या प्रयत्नात कामदेव-प्रेमाची देवता भस्म झाली आणि शिव आपल्या समाधीतून पार्वतीला भेटण्यासाठी आले. पर्व म्हणजे उत्सव आणि पार्वती म्हणजे उत्सवातून उत्पन्न. कामदेव भस्म झाल्यानंतरचा उत्सव. सर्व देव चिंतेत होते, की आता चांगले किंवा वाईट काही असो; पण कामनेशिवाय विश्व कसे चालेल? म्हणून शिवांनी परत सत्काम निर्माण केला. एक चांगला आणि परोपकारी काम आणि याचा उत्सव करण्यासाठी लोक रंगांनी खेळू लागले. त्यांचे निरस जीवन नव्या रंगांनी आणि कामनांनी उजळून निघाले. कामना करणे म्हणजे समस्या नाही. पण, कामनांना तुमचे रूप होऊ देऊ नका. कामना उत्पन्न होतील तेव्हा फक्त पाहा, की त्या तुमच्यासाठी फायदेशीर आहेत किंवा नाहीत.

निसर्गात सर्व रंग आहेत आणि तसेच तुमच्या मनातदेखील. तुम्ही प्रसन्न होता, खिन्न होता, क्रोधित, करुणापूर्ण, उदार होता. भावनांच्या या विविध छटा तुमच्यात येतात. मन नेहमी एकसारखे नसते. पण, जेव्हा तुम्ही जाणता फक्त हेच तुम्ही नाही, रंगछटा म्हणजे तुम्ही नाही, मनःस्थिती म्हणजे तुम्ही नाही, तेव्हा तुम्ही या रंगांचा खरा आनंद घेता. मनाच्या खेळाचे तुम्ही साक्षीदार होता आणि आपल्या आत प्रवेश करता. तुम्हाला जीवनात खरा त्रास इतर काही नसून, तुमचे मन आहे. तुम्ही स्वतःला या भावनांच्या रूपात ओळखत असता, तुम्हाला वाटते, हे तुम्हीच आहात तेव्हा तुम्हाला त्रास होतो. ध्यान हा आपल्या आत जाण्याचा मार्ग आहे. होळीचा हा संदेश आहे. जा, सर्वांना भेटा आणि प्रत्येकाला रंगवून टाका. नम्र व्हा, सर्वांचा आदर करा आणि प्रेमाचा प्रसार करा. होळीच्या उत्सवात प्रेमाचे रंग चोहोकडे पसरवा आणि जीवन रंगीत, आनंदी करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com