#MeToo ‘मी टू’ नावाचा चक्रवात! (अग्रलेख)

metoo
metoo

गेले काही दिवस देशभरात घोंघावत असलेले ‘मी टू’ मोहिमेचे वादळ अजूनही शमलेले नाही. शमण्याची शक्‍यता दिसत नाही आणि खरे तर तसे ते शमूदेखील नये. शतकानुशतके पुरुषप्रधान संस्कृतीचे आघात निमूटपणे पचवणाऱ्या सर्वसामान्य स्त्रीला कधी नव्हे तो आपला आवाज गवसला आहे. ज्या गोष्टी खोल मनाच्या तळाशी गाडून टाकून कुढत जगावे लागते, त्या गोष्टींना वाचा फोडण्याचे बळ समाजमाध्यमांनी स्त्रियांना देऊ केले आहे. ते बळ क्षणभंगुर ठरेल, असे का मानावे? दुर्गेच्या विविध रूपांचे पूजन करण्याच्या नवरात्रीच्या उत्सवात या अमोघ अस्त्राने आपले अस्तित्व दाखवले, हाही एक आध्यात्मिक योगच म्हणायचा. कुचंबणेला सरावलेल्या भारतीय स्त्रीला आपला संतप्त बाणा दाखवण्याची संधी मिळायला हवीच होती. कारण गतानुगतिकाच्या भागधेयाप्रमाणे भारतीय स्त्रियांना पुरुषी वर्चस्वाने बुजबुजलेल्या जगात आपले पाय रोवताना किती आणि काय काय सहन करावे लागते, त्याची शेकडो उदाहरणे ‘मी टू’ मोहिमेमुळे रोजच्या रोज पुढे येताना दिसत आहेत. इंग्रजीत ‘मी टू’ म्हणजे ‘मीसुद्धा’...स्त्रियांचे लैंगिक शोषण-दमन हा जागतिक आणि संसर्गजन्य रोग आहे. पुरुषांच्या रोगट मानसिकतेचे बळी ठरलेल्या जगातील स्त्रियांना व्यक्‍त होण्यासाठी उद्युक्‍त करू पाहणाऱ्या तराना बुर्केनामक एका अमेरिकी कार्यकर्तीने २००६ मध्ये ‘मी टू’ ही संज्ञा पहिल्यांदा वापरली होती. नंतर अलिशिया मिलानो नावाच्या अभिनेत्रीने गेल्या वर्षी ऑक्‍टोबरातच ‘ट्विटर’वर ‘मी टू’चे प्रचलन केले. ‘कामाच्या ठिकाणी स्त्रियांना भोगावे लागणारे पुरुषी उपद्‌व्याप कुठल्या थराला गेले आहेत, हे लोकांना जरा कळू द्या’ असा तिचा आग्रह होता. हार्वे वेइन्सटाइन या इंग्रजी निर्मात्याने केलेल्या ‘आचरट उद्योगां’विरुद्ध काही अभिनेत्रींनी आवाज उठवला, त्यानंतर ‘मी टू’ चळवळ समाजमाध्यमांमध्ये फोफावत गेली. आज भारतात तिचे लोण सुनामीच्या लाटेसारखे विक्राळ रूप घेऊन धावत अंगावर येताना दिसते.
पुरुषसत्ताक वृत्तीने बुजबुजलेल्या आपल्या समाजात ‘मी टू’ मोहिमेने इतके उग्र रूप धारण करावे, ही निश्‍चितच स्वागतार्ह बाब मानायला हवी. कैक शतकांचा हा पुरुषी बेमुर्वतपणा चेपणारी शक्‍ती एकदाची निर्माण होते आहे. ‘मी टू’ मोहिमेच्या या तुफानी चक्रीवादळात भल्या भल्या समाजशौंडांची, पुरुषार्थ गाजवणाऱ्या सिताऱ्यांच्या अब्रूची लक्‍तरे निघत आहेत, हेदेखील पुष्कळच म्हणायचे. एरवी, अशा प्रकारची बदनामी आपल्या वाट्याला येऊन घराबाहेर पडणेही मुश्‍कील होईल, हे त्यांच्या स्वप्नातदेखील आले नसते. आपल्या सान्निध्यात आलेली कुठलीही स्त्री ही उपभोग्य वस्तूच आहे, अशा गुर्मीत जगणाऱ्या तथाकथित पुरुषांना ‘मी टू’ हा एक सणसणीत लत्ताप्रहार आहे, यात शंका नाही. मनाविरुद्ध भोगाव्या लागणाऱ्या असल्या लैंगिक शोषण-दमनामुळे पीडित स्त्रीचे अनेकदा मानसिक आरोग्यच पुरते नासून जाते. त्यातून निर्माण होणाऱ्या गंडांचे सावट घरदार, वावर आणि एकंदरीतच जगण्यावर दाट पडलेले राहते. पुरुषाच्या दृष्टीने काही मिनिटांची ही मस्ती, त्या स्त्रीला आयुष्यातून उठवते, ही जाणीव आपल्या भारतीय मानसिकतेच्या आकलनापलीकडली होती. वर्षानुवर्षे वाट्याला आलेला कटू अनुभव मनात खोल गाडून जमेल तसे करिअर करू पाहणाऱ्या महिला वर्गाला या मोहिमेने चढा सूर मिळवून दिला असला, तरी स्त्रियांबद्दलचे हे दमनचक्र आपल्या इतके पेशीपेशीत मुरलेले आहे की त्याला आता आळा बसेल, असे मानणे मात्र दुधखुळेपणाचे ठरेल. समाजमाध्यमांच्या अफाट सागरात कचराही भरपूर असतो, परंतु, ‘मी टू’ ही चळवळ मात्र त्याच सागराने दिलेले वरदान ठरावे. ‘मी टू’ मोहिमेचे पडसाद बव्हंशी चित्रपटसृष्टीत अधिक उमटले. जिथे नैतिकता ढिली असल्याचे लोकांनी गृहीत धरलेले असते, अशा चित्रसृष्टीतून येणाऱ्या या बातम्या एकेकाळी खमंग गॉसिप म्हणून खपल्या असत्या आणि गॉसिप म्हणूनच संपल्याही असत्या. परंतु, ‘मी टू’ मोहिमेने या मिटक्‍या मारत वाचण्याच्या गॉसिपखबरी नाहीत, हे फार कणखरपणे अधोरेखित केले आहे. परंतु, नोकरी करून घरदार सांभाळणाऱ्या सर्वसामान्य महिलांना अधिक बळ मिळावे आणि तसेच वळण या चक्रवाताला लागावे, असे वाटते. हा चक्रवात औटघटकेचा ठरू नये, एवढेच मागणे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com