खुल्या मैदानात संधी अन्‌ आव्हानेही

खुल्या मैदानात संधी अन्‌ आव्हानेही

किरकोळ व्यापार क्षेत्रातील परकी गुंतवणुकीमुळे येणाऱ्या नवीन भांडवलाचा, प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला घेता आला नाही, तर ते प्रगतीकडे पाठ फिरविण्यासारखे होईल.

आ र्थिक सुधारणांच्या मार्गाने  पुढे जाताना सरकारने परकी थेट गुंतवणुकीच्या (एफडीआय) धोरणात बदल घडवून आणला आहे. किरकोळ व्यापार क्षेत्रात (सिंगल ब्रॅंड रिटेल) परदेशी कंपन्यांना ४९ टक्के भाग स्वयंचलित मार्गाने मिळू शकतो; तर त्यापुढील १०० टक्‍क्‍यांपर्यंतची परकी थेट गुंतवणूक सरकारी मंजुरीच्या मार्गाने मिळू शकेल. परकी गुंतवणुकीमुळे ग्राहकोपयोगी वस्तूंच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर विविधता येईल.

आर्थिक मूल्यांकनाचा विचार करता जगातील पाच प्रमुख किरकोळ वस्तू बाजारांपैकी एक अशी भारताची ओळख आहे. याशिवाय सर्वांत गतिशील किरकोळ वस्तू बाजार म्हणूनही भारत प्रसिद्ध आहे. यामध्ये विशेषकरून येथील अन्न आणि किराणा मालाच्या किरकोळ वस्तू बाजाराची वाढ वेगाने होताना दिसते. सुमारे २९४ अब्ज डॉलर किमतीएवढ्या बाजाराचा राष्ट्रीय उत्पन्नातील वाटा १६ टक्के आहे. किरकोळ बाजारातील परकी गुंतवणूक आणि भारतातील अन्न आणि किराणा मालाच्या किरकोळ बाजाराबद्दल फक्त बोलायचे झाले, तर परकी गुंतवणुकीकरीता दारे उघडण्याआधी भारताने आयात केलेल्या अन्नपदार्थांची सर्वांत वेगाने वाढणारी श्रेणी ही दुग्धउत्पादनांची आहे. चीज, क्रीम, डीपस, बिस्कीट, चॉकलेट आदी उत्पादने २०१६-१७ मध्ये १४० टक्‍क्‍यांपेक्षाही जास्त वाढलेली दिसतात आणि त्याखालोखाल वाईन आणि पॅकेजयुक्त अन्न यांची नोंद होताना दिसते. १६ ते ४० या वयोगटातील तरुण भारतीय नागरिक हे या बाजाराचे लक्ष्य आहे. या वयोगटातील व्यक्ती आपल्या उत्पन्नापैकी ४० टक्के भाग या अन्नपदार्थांवर खर्च करतात. विविधता आणि चांगली चव यासाठी ते जास्त किंमत मोजण्यासही तयार असतात, असे आढळले आहे. साठ टक्‍क्‍यांपेक्षा अधिक ग्राहकांना खाद्यान्न आणि पेय यामध्ये रस आहे आणि याची वाढ प्रत्येक वर्षी ३० टक्के दराने होताना दिसते. बदलणारी जीवनशैली आणि त्यानुसार आहारातील होत असलेले बदल याचाही परिणाम बाजारपेठ विस्तारण्यात होत आहे. किरकोळ वस्तूंच्या ऑनलाइन बाजाराचीही लोकप्रियता गेल्या तीन वर्षांत वाढल्याचे दिसते. या महत्त्वाच्या महानगरांमध्ये नवनवे अनेक उद्यमी ‘ई-ग्रॉसर्स’मध्ये गुंतवणूक करीत आहेत, जे वाढीसाठी चांगले चिन्ह आहे.

अन्न आणि किराणा मालाच्या किरकोळ बाजारात होऊ घातलेल्या काही महत्त्वाच्या बदलांसाठी भारताने तयार असणे आवश्‍यक आहे. या निर्णयाचा सर्वांत मोठा फायदा शेतकऱ्यांना होण्याची चिन्हे आहेत. ग्रामीण भारतातील सरासरी जमिनीची मालकी फार मोठी नाही, यामध्ये जवळजवळ ६३ टक्के लहान आणि किरकोळ शेतकरी दिसून येतात. या लहान जमिनीच्या तुकड्यातून आधीच फारसे काही उत्पन्न नाही आणि पुरवठा साखळीअभावी (सप्लाय चेन) किंवा अपुऱ्या व्यवस्थेमुळे अन्नधान्य, भाजीपाला, फळे, दूध इत्यादी कुजून, खराब होऊन वाया जाते. अशा प्रकारे बाजारात विक्री होऊन शेतकऱ्यांना नफा देण्याच्या आधीच शेतमाल नष्ट होतो. देशाच्या अन्नधान्य, फळे आणि भाजीपाला यांच्या एकूण उत्पन्नाच्या २० टक्के आणि ४० टक्के उत्पन्नाचे विक्रीआधीच नुकसान होते. किरकोळ विक्रीतील बहुराष्ट्रीय कंपन्यांबरोबर येणारे अद्ययावत तंत्रज्ञान आणि पुरवठा साखळीच्या पद्धतींमुळे विक्रीयोग्य अन्नपदार्थांचे प्रमाण नक्की वाढेल. ज्या देशांमध्ये हे क्षेत्र परकी गुंतवणुकीदारांना खुले आहे, तेथे बहुसंख्य परकी व्यापारी स्थानिक, ताजा शेतमाल विकत घेतात, असा अनुभव आहे. विकत घेतल्या जाणाऱ्या कच्च्या मालाचा दर्जा चांगला असावा, यासाठी शेतकऱ्यांना आवश्‍यक तरतुदी या परदेशी कंपन्या करताना आढळतात. यासाठी `करार शेतीव्यवस्था’ आणली जाते. एका भागातील लहान, किरकोळ शेतकरी एकत्र येऊन शेतीचे उत्पादन करतात. याचा चांगला परिणाम शेतीच्या उत्पादनावर होतो. शिवाय परकी कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे नवे रोजगार निर्माण होतील. ही रोजगारनिर्मिती प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही प्रकारांतील असेल. बहुराष्ट्रीय कंपन्यांकडून येणारे आणखी एक महत्त्वाचे अपेक्षित परिवर्तन म्हणजे एकूण आंतरराष्ट्रीय व्यापारातील वाढ. अधिक विस्तृत खरेदी आणि वितरण जाळे तयार होणार असल्याने  व्यापारी अधिक कार्यक्षमतेने आणि मोठ्या प्रमाणावर काम करतील. याशिवाय किरकोळ वस्तूविक्रीच्या क्षेत्रातील बड्या परकी कंपन्या लहान आणि मध्यम विक्रेत्यांसोबत संयुक्त उपक्रम हाती घेण्याची शक्यता आहे. त्याद्वारे ‍या लहान आणि मध्यम व्यापाऱ्यांची आर्थिक शक्ती तर वाढेलच; पण अद्ययावत तंत्रज्ञान आणि कुशल कार्यपद्धतीमुळे ते विकासाची नवी उंची गाठू शकतील. परदेशात जाण्याचे आकर्षण असणाऱ्या लोकांना हा बदल नक्कीच सुखकर असेल. शिवाय किरकोळ व्यापार क्षेत्रातील परकी गुंतवणुकीमुळे ही आयात कमी होऊन परकी चलनाचा उपयोग महत्त्वाच्या आयातीसाठी करता येऊ शकेल. उदाहरणार्थ पेट्रोलियम उत्पादने; पण या निर्णयाचे काही प्रतिकूल परिणामही विचारात घेतले पाहिजेत.

मूळ मुद्दा असा आहे, की शेतीचे उत्पन्न भारतासारख्या विकसनशील देशात आजही मोठ्या प्रमाणावर हवामानातील बदलांवर अवलंबून आहे. त्यामुळे या क्षेत्रात अद्यापही अनिश्‍चितता दिसते. परकी व्यापारासाठी अर्थव्यवस्था खुली नसते तेव्हा बाजारभाव हाच एक प्रकारचा ‘विमा’ म्हणून इथे काम करतो. काही पिकांचे उत्पादन कमी होण्याची शक्यता लक्षात घेऊन सरकार किमान हमी भाव देते. मात्र आंतरराष्ट्रीय बाजारात शेतमालाच्या भावावर असे नियंत्रण असणार नाही. त्यामुळे उत्पादन आणि दर यांचे वरील नाते संपुष्टात येते.  हे एक मोठे आव्हान आपल्याकडच्या शेतकऱ्यांसाठी असेल आणि अर्थातच ही संधीदेखील असेल. किरकोळ व्यापार क्षेत्रातील उत्पादने आंतराष्ट्रीय बाजारात विकली जाण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तिथे किमतीत मोठी तफावत असू शकते आणि मग हा किमतीचा मोबदला खऱ्या शेतकरीवर्गाला किती मिळेल, असा प्रश्‍न आहे. याव्यतिरिक्त काही कालावधीसाठी देशातील पारंपरिक व्यापाऱ्यांचे काही प्रमाणातील नुकसानही गृहीत धरावे लागेल.

हे सगळे मुद्दे लक्षात घेऊनही किरकोळ व्यापार क्षेत्र परकी गुंतवणुकीसाठी खुले करण्याचे पाऊल योग्य आहे, असे म्हटले पाहिजे. येणाऱ्या नवीन भांडवलाचा, प्रगत तंत्रज्ञानाचा फायदा आपल्याला घेता आला नाही तर ते प्रगतीकडे पाठ फिरविण्यासारखे होईल. छोट्या काळात येणाऱ्या अडचणींपेक्षा या निर्णयापासून होणारे दीर्घकालीन फायदे लक्षात घेणे महत्वाचे आहे. हा निर्णय जोखमीचा असला तरी ती काळाची हाक आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

(लेखिका सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात अर्थशास्त्राच्या अध्यापक आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com