मनाचे ऋतू (परिमळ)

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 डिसेंबर 2016

तापमानाच्या खोडकरपणाचा अनुभव आपण सारेच सध्या घेत आहोत. त्यानं किती लहरी असावं, याला काही सीमाच उरली नाही. पारा जेवढा अचपळ, तेवढाच धीटही. सगळीकडचं तापमान एकसारखं बदलतं आहे. उन्हाळ्यात उच्चांकी, अंग भाजून काढणारं; आणि आता थंडीत नीचांकी, अंगावर शहारे आणणारं. दोन्हींच्या मध्यात कोसळणारा पावसाळाही असाच बेबंद. कसाही, कुठंही धुवाधार अवतार धारण करून त्रेधा उडवून देणारा. कुठं थेंबही पोचवणार नाही; तर कुठं थेंबभर निवाराही ठेवणार नाही. सारे ऋतूंचे खेळ. हवेसे वाटणारे. भंडावून सोडणारे. आनंद देणारे. थरकाप उडविणारे. आठवणींत साठवून ठेवावेसे वाटणारे; आणि कधी कधी तर आठवणीसुद्धा नकोशा वाटणारे. 

या सृष्टिचमत्कारांना आपण चांगलेच सरावलेले आहोत. ऋतूंच्या येण्या-जाण्याचं चक्रही आपल्याला ठाऊक झालं आहे. त्या त्या वेळच्या बातम्याही जणू आपल्या वाचनवळणी पडल्या आहेत. माणसांच्या दुर्लक्षामुळं ऋतूही आता बेशिस्तीचा मुक्तपणा अंगी बाणवू लागले आहेत. आपलं हवामान खातं तरीही त्याच्यावर नजर ठेवून असतं. वाऱ्यावादळाचं, पाऊसपाण्याचं, थंडीच्या किंवा उष्म्याच्या लाटेचं अनुमान हे खातं सांगत असतं. इशारे देत असतं. धोक्‍यांपासून कित्येकांना वाचवीत असतं. अंदाजांवरून केले जाणारे विनोद मनावर न घेता हवामानशास्त्रज्ञ आपापलं काम बजावीत असतात. 
आपल्या मनाच्या सृष्टीतही ऋतूंच्या येरझारा सारख्या सुरू असतात, हे ठाऊक आहे तुम्हाला? एखादी गोष्ट मनासारखी झाली, की तिथं आनंदाच्या श्रावणसरी नाचू लागतात; आणि मनाविरुद्ध घडलं, की तिथं भाजून काढणारा रागाचा उन्हाळा अवतरतो. कुणाचा उत्कर्ष सहन झाला नाही, की मनात मत्सराची वादळं भरारत राहतात. ध्येय हाताशी आलं, की समाधानाचं पीक फुलून येतं. अपयश आलं म्हणजे मनाच्या दाही दिशा काजळून जातात. कधी सकाळची कोवळी उन्हं मनात उतरून येतात; आणि कधी अमावास्येच्या कभिन्न रात्रीत मन बुडून जातं. मनात कधी चवथीची चंद्रकोर उगवते आणि कधी पौर्णिमा बहरते. मोहानं मनाच्या दिशा अंधारतात. लोभानं त्या सैरभैर होतात. अप्रामाणिक वर्तनानं मनाचे कोपरे आजारतात. गैरकृत्यांनी मन स्वतःच स्वतःचा कडेलोट करून घेतं; आणि इतरांचं भलं करण्याच्या कृत्यांनी ते सात्त्विक आनंदाचं निधान होतं. सहकार्याचा हात देऊन मन तृप्त होतं. इतरांची सेवा करून कृतार्थतेचा अनुभव घेतं. 

ऋतूंच्या हालचालींचं अनुमान सांगणारं हवामान खातं आहे; तसं मनाच्या अंतरंगातील खळबळीतून अवतरणाऱ्या ऋतूंचे अंदाज कोण सांगणार? तशी काही व्यवस्था आहे का? होय, तशी व्यवस्था आहे; आणि ती अगदी चोख आहे. ती व्यवस्था म्हणजे आपलं मनच आहे. एका मनाचे व्यवहार कठोरपणे न्याहाळणारं. न्यायनिष्ठुर. तेच मन, जे कधी बेभान होतं. चिडतं. रागावतं. भांडतं. हसतं आणि रडतंही. या मनात एक कप्पा हे अनुमान दर क्षणी मांडत असतो. धावपळीत आपण त्यालाही म्हणतो ः हवामान खात्याचे अंदाज फार मनावर घ्यायचे असतात थोडेच? - आणि इथंच चुकतं.

Web Title: mind seasons