कासंडीतले कालिया

Milk
Milk

लाखो सामान्यांच्या नशिबात विषाचा डंख झालेले भेसळयुक्त दूधच आहे. त्याचे प्रमाण किती आहे याची एक छोटीशी झलक परवाच्या कारवाईतून दिसली. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईच्या प्रवेशद्वारांवर केलेली ती कारवाई हे अर्थातच हिमनगाचे छोटेसे टोक आहे.

मुंबईच्या वेशीवर पकडण्यात आलेल्या दुधाच्या टॅंकरमधील सुमारे तीन लाख लिटर दूध भेसळयुक्त निघावे, ही बाब केवळ काही गुन्हेगारांचे कृत्य म्हणून सोडून देता येणार नाही. ते गुन्हेगारी स्वरूपाचेच कृत्य आहे; पण तो साधा गुन्हा नव्हे. अद्याप या गुन्ह्याला आपण कडक शासन देऊ शकलो नाही, हा भाग वेगळा. दुधात भेसळ करणाऱ्यांना जन्मठेपेचे तरतूद असलेला कायदा संमत करा, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले, त्यालाही आता पाच वर्षे होत आली आहेत. त्यावर आपल्या राज्य सरकारने केले काय, तर दूधभेसळखोरांना तीन वर्षांपर्यंत शिक्षा करण्याचा कायदा लवकरच करू अशी घोषणा. अर्थात तेही काही कमी नाही. यापूर्वी या भेसळखोरांना केवळ सहा महिन्यांच्या शिक्षेचीच तरतूद होती. त्यात तत्काळ जामीनही मिळत असे. थोडक्‍यात, ती शिक्षा असून नसल्यासारखीच. त्यामुळेच किमान तीन वर्षे शिक्षेचा कायदा करण्याची घोषणा आपले तडफदार अन्नमंत्री गिरीश बापट यांनी केली. त्यालाही आता सात महिने होत आले असून, तो कायदा म्हणे केंद्रात अडकला आहे. थोडक्‍यात काय, तर भेसळखोरांना आयुष्यभराचा धडा मिळेल, अशी शिक्षा आपले सरकार देऊ शकत नाही. परिणामी राज्यातील लाखो सामान्यांच्या नशिबात विषाचा डंख झालेले भेसळयुक्त दूधच आहे. त्याचे प्रमाण किती आहे याची एक छोटीशी झलक परवाच्या कारवाईतून दिसली. अन्न व औषध प्रशासनाने मुंबईच्या प्रवेशद्वारांवर केलेली ती कारवाई हे अर्थातच हिमनगाचे छोटेसे टोक आहे.

एकेकाळी दुधासाठी दूध केंद्रांवर लांबलचक रांगा लागत असत, त्या या देशात आज दुधाचे विक्रमी उत्पादन होते. आजमितीला संपूर्ण देशातील रोजचे दूधउत्पादन सुमारे १४ कोटी ६८ लाख लिटर आहे. या श्वेतक्रांतीचे कौतुकच केले पाहिजे; परंतु त्यात अडचण एकच आहे, की या एवढ्या दुधापैकी केवळ ११ टक्के दूध सेवन करण्याच्या योग्यतेचे आहे. ८९ टक्के दुधात या ना त्या पदार्थाची भेसळ आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाची ही आकडेवारी कोणाही सुजाण व्यक्तीच्या अंगावर काटा आणल्याशिवाय राहणार नाही. ही भेसळ कसलीही असू शकते. ती पाण्याची असू शकते. ती एकवेळ परवडली असे म्हणावे, तर हे भेसळखोर असे राक्षस की ते ज्याची भेसळ करतात ते पाणीही भेसळयुक्त असते. याहून भयानक म्हणजे युरिया, अमोनियम सल्फेट यांसारखी घातक रसायने दुधात मिसळली जातात. फार काय, हल्ली केवळ रसायनांचेच दूध तयार करण्याचे कारखाने निघाले आहेत.

नगरसारख्या साखर-दुधाने समृद्ध असलेल्या जिल्ह्यात असा एक कारखाना सापडावा, हे महाराष्ट्राचे दुर्दैवच म्हणावे लागेल. याचा साधा अर्थ एवढाच आहे, की अमृत म्हणून, पूर्णान्न म्हणून आपण प्राशन करतो ते दूध या ना त्या प्रकारे आपल्या आरोग्याशी खेळ करणारे आहे. हा खेळ आजचा नाही. तो अपरिचितही नाही.

दूधभेसळीच्या या गोरखधंद्यात केवळ काही गुन्हेगारी प्रवृत्तीचे समाजकंटक आहेत, झोपडपट्ट्यातून तसे प्रकार चालतात असे आपण मानणार असू तर त्या अंधत्वाला तोड नाही, असेच म्हणावे लागेल. अत्यंत व्यापक आणि विस्तृत प्रमाणावर हा काळाधंदा आहे. गायी-म्हशींनी अधिक दूध द्यावे म्हणून त्यांना हार्मोन्सची इंजेक्‍शने दिली जातात. त्यांना दिल्या जाणाऱ्या काही औषधांचे अंश दुधात उतरतात. ते प्रमाणाबाहेर गेल्यास मानवी आरोग्यास घातक ठरू शकतात, हे अमेरिकेच्या अन्न-औषध प्रशासनाने दाखवून दिले आहे. म्हणजे तेथपासून ते आपल्या दारात येणाऱ्या दूधपिशव्यांमध्ये इंजेक्‍शनच्या सुयांद्वारे भरलेले पाणी येथपर्यंत विविध टप्प्यांवर हा काळाधंदा सुरू असतो. ‘डिग्री लागावी’ म्हणून दुधात स्टार्च वा युरिया घालणारे दूधउत्पादक शेतकरी, दूध अधिक काळ टिकावे म्हणून त्यात सोडियम हैड्रॉक्‍साईड वा सोडियम कार्बोनेट मिसळणारे डेअरीवाले, अधिक नफ्याच्या हव्यासापोटी दुधाच्या पिशव्या फोडून त्यात सांडपाणी मिसळणाऱ्या टोळ्या असे सगळेच घटक त्यात सहभागी असतात आणि हे सगळे सुखेनैव चालते याचे कारण त्यांना सरकार आणि प्रशासन यांचे आशीर्वाद असतात.

म्हणूनच अधुनमधून सुरू झालेल्या भेसळविरोधी मोहिमांनी फार हुरळून जाण्याचे कारण नाही. या अशा मोहिमांनी दुधाच्या कासंड्यांमध्ये किती प्रकारचे कालिया सर्प दडलेले आहेत याचेच तेवढे दर्शन होते. बाकी मग फक्त बातम्या येऊन जातात. परिस्थिती जैसे थेच राहते. ती बदलावी, किमान पुढची पिढी तरी कर्करोगग्रस्त निपजू नये यासाठी कासंडीतील हे कालिया कायमचे ठेचणे हाच उपाय आहे. तो दीर्घकालीन आहे हे खरे. पण त्याची सुरुवात कडक कायद्याने तरी व्हावी, हीच अपेक्षा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com