प्रतीक आणि प्रतीक्षा

भाजपच्या पहिल्या-वाहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत मोदी यांना देशवासीयांना ‘अच्छे दिन’ नावाचे आशादायी स्वप्न दाखवले होते.
modi govt complete 9years new parliment building lok sabha poll election politics
modi govt complete 9years new parliment building lok sabha poll election politics sakal

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाने लोकसभेत प्रथमच निखळ बहुमतावर सत्ता पादाक्रांत केली त्यास नऊ वर्षे पूर्ण होत असतानाच, मोदी यांनी देशवासीयांना पुन्हा एकदा नवी आशा दाखवली आहे. निमित्त होते, अर्थातच नव्या संसद भवनाच्या अत्यंत दिमाखदार तसेच देखण्या उद्‍घाटन सोहळ्याचे!

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षांत उभी राहिलेली ही संस्मरणीय वास्तू १४२ कोटी जनतेला दिलेली भेट आहे, असे सांगताना या स्वप्नपूर्तीची वाट या नव्या संसदभवनातूनच जाणार आहे, अशी ग्वाही पंतप्रधानांनी दिली.

आपल्या नेतृत्वाखालील भाजपच्या पहिल्या-वाहिल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारमोहिमेत मोदी यांना देशवासीयांना ‘अच्छे दिन’ नावाचे आशादायी स्वप्न दाखवले होते. आता या नव्या संसदभवनाच्या उद्‍घाटन सोहळ्यात बोलताना, त्या स्वप्नांचे, त्या आश्वासनांचे काय झाले याचा आढावा घेताना त्यांनी सरकारच्या काही योजनांचा आवर्जून उल्लेखही केला.

modi govt complete 9years new parliment building lok sabha poll election politics
Pune : बारामतीत ‘सकाळ विद्या एज्युकेशन एक्स्पो’

मात्र, या नव्या वास्तूच्या निमित्ताने भाजप आणि विशेषत: मोदी यांचे राजकारण हे प्रतीकांच्या संकल्पनेतून बाहेर पडायला तयार नाही, यावर देखील शिक्कामोर्तब झाले. उद्‍घाटनाचा हा सोहळा नितांतसुंदर होता.

वेदमंत्रांच्या घोषात वास्तूपूजन होत असतानाच तेथे ११ विविध धर्म तसेच पंथ यांचे गुरूही उपस्थित होते. अर्थात, हाही प्रतीकात्मकतेचा आणखी एक नमुना होता. मोदी यांनी उद्‍घाटनापूर्वी ‘सेंगोल’ या चोल राजघराण्याच्या राजदंडाला साष्टांग प्रणिपात केला. हा राजदंडदेखील अखेरीस एक प्रतीकच आहे, हे नाकारता येणार नाही.

modi govt complete 9years new parliment building lok sabha poll election politics
PM Narendra Modi : विकसित भारतासाठी टीम म्हणून काम करा - पंतप्रधान नरेंद्र मोदी

त्यामुळेच आता या नव्या संसदभवनातून देशाच्या लोकशाहीला गती देताना प्रतीकांच्या पलीकडे काही विचार केला जाणार की नाही? सारा देश प्रतीक्षेत आहे कृतीशिलतेच्या आणि हाताला लागत आहेत फक्त प्रतीके! असे किती काळ चालणार? संसदीय लोकशाहीच्या प्रमुख असलेल्या राष्ट्रपतींच्या हस्ते हे उद्‍घाटन होत नसल्यामुळे काँग्रेससह वीस विरोधी पक्षांनी या सोहळ्यावर टाकलेल्या बहिष्काराच्या सावटाची पर्वा न करता अखेर हा सोहळा पार पडला.

तेव्हा हा देशवासीयांच्या आयुष्यातील ‘सुवर्णक्षण’ आहे, असेही मोदी यांनी नमूद केले. मात्र, सोहळ्यावर फक्त आणि फक्त नरेंद्र मोदी यांची असलेली छाप बघता ‘देशात सध्या जे काही घडत आहे, ते फक्त आणि फक्त माझ्यामुळेच’ हे दाखवून देण्याच्या मोदी यांच्या वृत्तीचे दर्शनही यावेळी संपूर्ण देशाला झाले. यावेळी तसे न घडते तर हा सोहळा अधिक संस्मरणीय झाला असता, यात शंकाच नाही.

तमिळनाडूतील धर्माचार्यांच्या हस्ते पंतप्रधानांनी शनिवारीच ‘सेंगोल’चा स्वीकार केला होता. हा राजदंड हे सत्य आणि न्याय यांचे प्रतीक आहे. त्यामुळे आता या नव्या वास्तूत संसदेचे कामकाज चालवताना लोकसभा अध्यक्षांना या दोन मूल्यांचा सन्मान राखावा लागणार आहे.

मोदी पंतप्रधान झाल्यापासून संसदेत निव्वळ बहुमतशाहीच्या जोरावर कारभार सुरू होता. आता नव्या भवनात कोणते चित्र उभे राहणार, या प्रश्नाचे उत्तर काळच देणार आहे. नवे संसदभवन हे देशाच्या एकतेचे आणि लोकशाहीचे प्रतीक आहे, असा गजर करतानाच या उद्‍घाटन सोहळ्याच्या निमित्ताने राष्ट्रवादाचा जोरदार पुरस्कार केला गेला.

मात्र, राष्ट्राभिमान कितीही महत्त्वाचा असला, तरी लोकांचे दैनंदिन प्रश्न हे वेगळेच असतात. मोदी यांनी आपल्या भाषणात ‘महिलांचा सन्मान’ असाही उल्लेख केला. प्रत्यक्षात त्याच वेळी संसदभवनाबाहेर वेगळेच नाट्य सुरू होते. महिला कुस्तीगीरांचा शांततापूर्ण मोर्चा केवळ अडवण्यातच आला असे नाही, तर त्यांना जबरदस्तीने ताब्यात घेण्यात आले.

या महिलांच्या तक्रारींचा विचार करायला मोदी सरकारला वेळ नसेल, तर मग अशी भाषणे म्हणजे ‘शब्द बापुडे केवळ वारा...’ असेच म्हणावे लागेल. एकंदरित सोहळा देखणा झाला खरा; पण पुढे हे सरकार कसे वागते, विरोधक तसेच महिला यांना खरोखरच सन्मान देते काय, असे अनेक प्रश्न आहेत.

नव्या संसदभवनातील सोहळ्यापेक्षा देशातील वास्तव हे अगदीच वेगळे आहे. त्याचा विचार हे सरकार, म्हणजेच मोदी गांभीर्याने करणार नसतील, तर ही नवी वास्तूही केवळ मोदी यांच्या हट्टाग्रहाचे एक प्रतीकच ठरू शकेल.

भारताचा विकास झाला तरच जगाची प्रगती होऊ शकते, असेही मोदी यांनी यावेळी सांगितले. नवे संसदभवन भारताच्या ‘आत्मनिर्भरते’चे प्रतीक असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले. या नव्या वास्तूत मान्यता मिळवणारा प्रत्येक कायदा हा देशाला प्रगतीपथावर घेऊ जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

मात्र, लोकशाही राज्यव्यवस्थेत विरोधकांना या नव्या संसदभवनातही सन्मान मिळणार असेल आणि मुख्य म्हणजे त्यांच्याशी संवाद साधला जाणार असेल, तरच या नव्या वास्तूचे महात्म्य यापुढे जगाला सांगता येईल. बहुमतशाहीच्या जोरावर रेटून कारभार करता येऊ शकेलही, मात्र मग त्यास लोकशाही व्यवस्था म्हणता येणार नाही.

या उद्‍घाटन सोहळ्याच्या पूर्वसंध्येला झालेल्या निती आयोगाच्या बैठकीतील पंतप्रधानांचा सूर हा देशात ‘डबल इंजिन’ची म्हणजेच केंद्र आणि राज्यात फक्त भाजपचीच सरकारे असावीत, हेच सूचित करणारा होता.

लोकशाही आणि आपण राज्यघटनेने स्वीकारलेली संघराज्य व्यवस्था यांस नख लावणारीच ही प्रवृत्ती आणि मनोभूमिका आहे. नव्या संसदभवनात ही मानसिकता बदलल्याचे दर्शन घडले तरच ही वास्तू खऱ्या अर्थाने फलदायी ठरली, असे म्हणता येईल.

चांगल्या लोकांना जबाबदारीने वागा हे सांगण्यासाठी कायद्याची गरज नसते; पण वाईट लोक कायद्यातून वाटा शोधण्याचा प्रयत्न करू शकतात.

— प्लेटो, ग्रीक विचारवंत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com