मोदी... त्यांचे हिंदुत्व आणि अमेरिकी निवडणूक!

भारतकुमार राऊत (ज्येष्ठ पत्रकार)
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2016

रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्षपदाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात "हिंदू कार्ड' खेळण्याचा प्रयत्न केला आहे. तो कितपत यशस्वी होईल, याची तेथे चर्चा सुरू आहे.

अमेरिकेतील अध्यक्षपदाची निवडणूक आता अवघ्या चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. भारताप्रमाणे इथेही प्रचाराला खरी रंगत चढते, ती शेवटच्या चरणात. लढाईत आधी विविध शस्त्रे, क्षेपणास्त्रे यांचा मारा होतो; पण शेवटी दुरून मारा करण्याएवढे अंतरच शिल्ल्क राहत नाही. मग रायफलमधील गोळ्यांऐवजी त्यावरील संगिनींचा वापर करून शत्रूला थेट भोसकण्यास सुरवात होते. तशीच स्थिती आता अमेरिकेत दिसते. डेमोक्रॅटिक पार्टीच्या हिलरी क्‍लिंटन व रिपब्लिकन पार्टीचे डोनाल्ड ट्रम्प या दोघांच्याही भात्यातील बहुतेक बाण संपत आल्यामुळे आता एकमेकांवर अशाच थेट आरोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत.

आतापर्यंत जनमत चाचणीत हिलरींनी ट्रम्प यांच्यावर आघाडी घेतली होती; पण शेवटच्या दहा दिवसांत ट्रम्प यांनी किंचितशी का होईना आघाडी मिळवली आहे. या टप्प्यात हुकमी मतदारांबरोबरच नवे मतदार शोधणे गरजेचे असते. दोघांनीही अशा नव्या "व्होट बॅंका' शोधण्यास आता सुरवात केली आहे. मूळ अमेरिकी मतदारांबरोबरच बाहेरून येऊन स्थायिक झालेल्यांना रिझवण्याचे काम आता ट्रम्प यांनी हाती घेतले आहे. मूळचे भारतीय, विशेषत: हिंदू मतदारांवर ट्रम्प यांची भिस्त दिसते. न्यू जर्सी प्रांतात एडिसन येथे बोलताना ट्रम्प म्हणाले, की मी निवडून आल्यावर भारतीय व हिंदू समाजाला व्हाइट हाउसमध्ये एक नवा व सच्चा मित्र मिळालेला असेल!

ही अशी विधाने करताना ट्रम्प यांनी तीन पद्धतींनी भारतीयांची मने जिंकण्याचा डाव टाकला. त्यांनी हिंदू म्हणजेच भारतीय अशी व्याख्या करून अमेरिकेतील हिंदूंना सुखावले. या एक कोटी 72 लाख भारतीयांत मुस्लिम, ख्रिश्‍चन, शीख व बौद्ध आहेत की नाही, हे त्यांनी उघड केले नाही. मात्र त्यांना भारतीय म्हणजे हिंदू जनसमुदायच अभिप्रेत होता; "कट्टर इस्लामिक दहशतवादाशी मुकाबला करण्याच्या भारताच्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो', असे म्हणून त्यांनी टाळ्या मिळवल्या. शिवाय, त्यांनी स्वत:ची तुलना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी केली. मोदींनी नोकरशाहीत कमालीच्या सुधारणा केल्या आहेत. "त्यांनी ज्या पद्धतीने नोकरशाहीत माणसांची कपात केली, तसेच मलाही करायचे आहे,' अशा वक्तव्यामुळे अमेरिकेतील भारतीय आपल्या बाजूला वळतील, अशी ट्रम्प यांना आशा आहे.

अमेरिकेतील काही जाणकारांच्या मते तिथले भारतीय बव्हंशी रिपब्लिकन पार्टीच्या बाजूचे नसले, तरी ट्रम्प यांनी "मोदी कार्ड' खेळल्यामुळे व मुसलमान-विरोधी सूर लावल्यामुळे अनेकांचे हृदय परिवर्तन होऊ शकते. "न्यूयॉर्क टाइम्स'ने म्हटले, की मोदी जी भाषा वापरतात, त्याच धर्तीचे भाषण केल्यामुळे यापैकी काही मतदार ट्रम्प यांच्या बाजूने झुकू शकतात.

परंतु अमेरिकेतील भारतीय, विशेषत: हिंदू मतदारांच्या राजकीय प्राधान्यक्रमाचा इतिहास तपासला, तर मुस्लिमविरोधाचा त्यांच्यावर फार परिणाम आतापर्यंत झालेला दिसत नाही. गेल्या ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये 2016चा राष्ट्रीय आशियाई-अमेरिकन पाहणीचा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात केवळ सात टक्के भारतीयांनीच प्राथमिक मतदानात ट्रम्प यांच्या बाजूने मतदान केले व अध्यक्ष निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानातही तितकेच लोक त्यांना मत देतील, असे दर्शवण्यात आले आहे. गेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या एका सर्वेक्षणानुसार 16 टक्के भारतीयांनी रिपब्लिकन उमेदवार मिट रॉमनी यांना मते दिली. पण या आकड्यात जर का थोडा जरी फरक पडला व ट्रम्प यांना मिळालेली भारतीय, विशेषत: हिंदू मते वाढली, तर त्यांचा मोठा परिणाम अंतिम निकालावर होऊ शकतो.

अर्थात, या सर्वेक्षणात राजकीय प्राधान्यक्रमाची धर्मवार आकडेवारी नाही. पण 2016च्या आशियाई-अमेरिकनांच्या सर्वेक्षणात 54 टक्के मतदार हिंदू होते. म्हणजेच ज्या सर्वच्या सर्व सात टक्के मतदारांनी ट्रम्प यांच्या बाजूने प्राथमिक फेरीत मतदान केले, ते हिंदू होते, असे गृहीत धरले, तरी हिंदूंचे प्रचंड बहुमत ट्रम्प यांच्या बाजूने नाही. या उलट मोदींना इथल्या भारतीयांचा, विशेषत: हिंदूंचा प्रचंड पाठिंबा असल्याचे न्यूयॉर्कमधील मॅडिसन स्क्वेअर गार्डनमधील भाषणाच्या वेळी जमलेल्या भारतीयांच्या गर्दीवरून दिसून आले होते.

मोदींचा राष्ट्रवाद व मुस्लिम कट्टरतावाद्यांना असलेला विरोध यांचे भारतात कौतुक असले, तरी अमेरिकेत भारतीय हिंदूंखेरीज त्यांना फारसे कुणी पाठीराखे नाहीत. त्यामुळेच हिलरी त्यांचा फारसा उल्लेख करत नाहीत. अशा वेळी ट्रम्प यांनी मोदींवर स्तुतिसुमने उधळून अमेरिकेतील हिंदूंना अन्य समाजापासून अलग करून आपल्या कवेत घेण्याचा तर प्रयत्न चालवलेला नाही? सर्वत्र असे दिसते, की जेव्हा एखादा धार्मिक गट पुढे येऊ लागतो, तेव्हा ही मंडळी कुणा तरी एका व्यक्तीला वा गटाला "शत्रू' मानून त्याच्याविरुद्ध हल्लाबोल करतात. पण इथे मात्र ट्रम्प यांनी एकाच वेळी अनेक आघाड्यांवर "शत्रू' तयार केले आहेत. ते आफ्रिकन अमेरिकन्स, हिस्पानिक, मुस्लिम, मेक्‍सिकन या सर्व प्रांत व धर्मसमूहांच्या विरुद्ध हिरिरीने बोलतात व त्यांना हद्दपार करण्याची भाषा वापरतात. ही आक्रमक भाषा सामान्य मूळ अमेरिकन लोकांना त्यांच्या भाबडेपणामुळे आवडतेसुद्धा, पण त्याचे दूरगामी परिणाम काय होणार?
अमेरिकेत केवळ सात टक्के हिंदू भारतीय असले, तरी त्यांचा निर्णायक परिणाम निकालावर होऊ शकतो. निवडणूकपूर्व सर्वेक्षणांत हिलरींना ट्रम्प यांच्यापेक्षा केवळ 5 टक्‍क्‍यांचे निश्‍चित बहुमत आहे. सात टक्के भारतीय हिंदूंनी एकगठ्ठा ट्रम्प यांना मतदान केले, तर त्यात निकाल फिरवण्याची ताकद आहे. त्यातच गेल्या रविवारच्या जनमत चाचणीत ट्रम्प यांनी हिलरींवर बाजी मारून अधिक लोकप्रियता मिळवल्याचे दिसून आले. ओबामा यांच्या दोन्ही निवडणुकांत भारतीयांनी त्यांनाच साथ दिली होती. या वेळी त्यांची बाजू बदलली, तर मात्र व्हाइट हाउसमध्ये पुन्हा राहायला जाण्याचे हिलरींचे स्वप्न अधुरेच राहील.

Web Title: Modi, hinduism and US elections