भाष्य : वाटचाल जागतिक ‘अव्यवस्थे’कडे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भाष्य : वाटचाल जागतिक ‘अव्यवस्थे’कडे

कोविडचा ‘ओमिक्रॉन’ हा प्रकार सुदैवाने ओसरत आहे; पण अगदी संथपणे. तिसऱ्या लाटेनंतर त्याचा कोणताही उपप्रकार न येता महासाथ संपुष्टात येईल, अशी आशा करूया.

भाष्य : वाटचाल जागतिक ‘अव्यवस्थे’कडे

- मोहन रमन्

युक्रेन युद्धाने साधनसंपत्तीवर आलेल्या प्रचंड ताणाचा सामना रशियाला करावा लागेल आणि युक्रेनला केलेल्या मोठ्या मदतीचा ताण अमेरिकेलाही सोसावा लागेल. या परिस्थितीत जागतिक नेतृत्वस्थान आपल्याकडे आणण्याच्या पवित्र्यात चीन दिसतो आहे.

येत्या काही वर्षांत आपले जग कसे असेल? कोविड महासाथीनंतर जे प्रवाह समोर दिसत आहेत, ते नीट निरखले तर काही अंदाज बांधता येतील. वर्षभरापूर्वी प्रत्येक देश आपापल्या पातळीवर संकटाला तोंड देण्यात गुंतलेला होता. या वैद्यकीय आणीबाणीतून बाहेर आल्यानंतर आता जग पूर्ववत शांत, सुरळित होत आहे, असे म्हणता येईल का? अफगाणिस्तानातून अमेरिकेने सैन्य काढून घेतल्यानंतर त्या देशातील परिस्थिती सामान्य झाली आहे, असे म्हणणे जेवढे धाडसाचे होईल, तेवढेच कोविडनंतर परिस्थिती सुरळित झाली आहे’ विधानही. खरे तर सध्याचे जगणे अधिक अवघड झाले आहे आणि आणखी उलथापालथींची शक्यता आहे. चीनला हे वास्तव नेमके समजले आहे.

कोविडचा ‘ओमिक्रॉन’ हा प्रकार सुदैवाने ओसरत आहे; पण अगदी संथपणे. तिसऱ्या लाटेनंतर त्याचा कोणताही उपप्रकार न येता महासाथ संपुष्टात येईल, अशी आशा करूया. १९१८मधील जागतिक महासाथ ज्याप्रमाणे नंतर थांबली, तसेच आता घडेल, अशी आशा आहे. लक्षात घ्यावा असा मुद्दा म्हणजे कोरोनाचा विषाणू नष्ट करण्याचा चीनचा प्रयत्न आहे, तर ऊर्वरित जगाने कोविडसह जगण्याची तयारी केली असून त्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबले जात आहेत.

कोविडच्या धक्क्यातून सावरण्यासाठी आपण प्रयत्नशील असतानाच तीव्र दुष्काळ, महापूर, जंगलातील वणवे अशा प्रकारची नैसर्गिक संकटे कोसळताहेत. त्यातच रशिया-युक्रेन युद्धाची भर. त्यात विध्वंस सुरू आहे. ऊर्जा दिवसेंदिवस महाग होत आहे आणि भविष्यात अन्नटंचाईचा धोकाही आहे. येत्या हिवाळ्यात आणखी त्रासाला सामोरे जावे लागू शकते. असे असूनही रशिया व युक्रेन युद्ध सुरू ठेवण्यावर हटून बसले आहेत. आण्विक युद्धात याची परिणती होण्याची शक्यता नाही, एवढाच दिलासा. पण युक्रेन युद्धाचा अंतिम परिणाम काहीही होवो आणि कोणत्याही वेळी होवो; एक गोष्ट निश्चित, की जगातील सत्तेची रचना यापुढे नवे स्वरूप धारण करेल.

दुसऱ्या महायुद्धानंतर शीतयुद्ध सुरू झाले. जगावर प्रभुत्व मिळविण्यासाठी अमेरिका व सोव्हिएत संघराज्य एकमेकांच्या विरोधात झगडत होते. आपापल्या मित्रदेशांना बरोबर घेत महासत्ता या संघर्षात गुंतल्या होत्या. सोव्हिएत संघराज्याचा अस्त झाल्यानंतर त्या ऱ्हासातून हळुहळू रशिया सावरत आहे. परंतु युक्रेनचे भडकलेले युद्ध अगदी रशियाने जिंकले, असे गृहित धरले तरी रशियावर या युद्धाचा होणारा परिणाम वाईटच असणार. रशियाची स्वतःला सावरण्याची जी प्रक्रिया सुरू होती, तिला खीळ बसेल. दुसरीकडे या युद्धात प्रत्यक्ष न पडता मोठ्या प्रमाणावर युक्रेनला आर्थिक व लष्करी मदत पुरविणाऱ्या अमेरिकेलाही आर्थिक फटका जाणवल्याशिवाय राहणार नाही. आर्थिकदृष्ट्या अमेरिकी महासत्तेला कमकुवत करणारे हे युद्ध आहे. या परिस्थितीत एकच शक्ती लक्ष वेधून घेते, ती म्हणजे चीन.

चेअरमन माओ यांच्या निधनानंतर चीनने या शतकाच्या मध्यापर्यंत (२०५०)अमेरिकेला मागे टाकण्याचे उद्दिष्ट ठरवले होते. या वाटचालीत सध्या तरी रशिया हा चीनचा कनिष्ठ भागीदार असेल. चीनचा महासत्ता बनण्याकडे आणि अमेरिकेच्या बरोबरीने स्थान मिळविण्याकडे प्रयास सुरू आहे. दुसऱ्या महायुद्धात केवळ शेवटच्या टप्प्यात अमेरिका सक्रिय झाली आणि तिने युद्धाचे पारडे मित्रदेशांच्या ( ब्रिटन, फ्रान्स) बाजूने फिरवले. हे युद्ध संपले, तसे अमेरिकी महासत्तेने जगावर प्रभुत्व स्थापन केले. इतर स्पर्धक देश मागे पडण्याचे कारण म्हणजे युद्धामुळे ते थकले होते. साधनसंपत्तीवर प्रचंड ताण पडला होता. आता तशीच स्थिती दिसते. संघर्षापासून दूर राहिलेल्या चीनला आता संधी दिसत आहे.

ड्रॅगनचे जाळे

१८२३च्या ‘मन्रो डॉक्ट्रिन’मुळे अमेरिकी जागतिक महासत्तेचा पाया रचला गेला. तत्कालिन अध्यक्ष जेम्स मन्रो यांनी पश्चिम गोलार्धात युरोपचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही, असे त्यावेळी स्पष्ट केले होते. याच सिद्धान्तामुळे अमेरिकेने दक्षिण अमेरिकेचा भाग प्रभावाखाली आणला. आता ‘बीआरआय’च्या (बेल्ट ॲंड रोड इनिशिएटिव्ह) माध्यमातून चीनचेही हेच चालू आहे. अनेक छोटे देश चीनच्या अंकित झाले आहेत. अल्प उत्पन्न गटातील चाळीस देश आणि मध्यम उत्पन्न गटातील काही देशांच्या बाबतीत हे म्हणता येईल. आर्थिक आघाडीवरील ताण त्या देशांना भेडसावत आहेत. ‘दक्षिण आशियाई विभागीय सहकार्य परिषदे’तील (सार्क) भारत वगळता सर्व देशांचा यात समावेश आहे. मध्यम उत्पन्न गटातील श्रीलंका कोलमडला आहे. अनेक देशांना चीनने मदत देऊन मिंधे बनवले आहे. चीनवरील अवलंबित्वाच्या छायेतून बाहेर पडणे या देशांना कठीण झाले आहे.

अमेरिकेने सुरवातीच्या काळात अंतर्गत बंडाळ्या मोडून काढल्या होत्या. त्याचप्रमाणे चीननेही `तिआन आन मेन’ चौकातील बंड मोडून काढले होते. तिबेट, झिनझियांग या प्रांतातही विरोध कठोरपणे चिरडला गेला. या काळात दोन महासत्ता झुंजत असताना चीनने बाजूला राहून औद्योगिक विकासावर लक्ष केंद्रित केले. अत्याधुनिक तंत्रज्ञान आत्मसात केले. याबाबत आपली आधीची चूक दुरुस्त केली. आता चीन जगाचे नेतृत्व करू शकतो, असे त्या देशाला वाटते आहे. ‘बीआरआय’च्या माध्यमातून चीनने सभोवतालच्या देशांवर आर्थिक मार्गाने वर्चस्व निर्माण केले आहे. १५ व्या शतकापर्यंत ज्या बंदरांवर चिनी लोक फक्त भेटी देत होते, तिथे आज त्या देशाच्या नौदलाचे तळ उभे राहिले आहेत. चेअरमन माओ यांनी ज्या पद्धतीने पुढे जाण्याचा मार्ग सांगितला होता, त्याच्याशी सुसंगत कार्यक्रम आखला जात आहे आणि आचरला जात आहे. ‘शेकडो फुले फुलू देत’ हे माओचेच वचन. विविध कल्पना, विचार, मग ते एकमेकांना विरोध करणारे का असेनात, पुढे यावेत आणि ते मांडणाऱ्यांनी वर्तमान प्रश्नांवर मंथन करावे, अशी माओंची अपेक्षा होती. चीनने पुढे डेंग यांच्या काळात जो आर्थिक उदारमतवादी कार्यक्रम राबवला, त्याला माओंचे हे वचन व त्या‍मागची भूमिका सहाय्यभूत म्हणता येईल. त्यानंतरच्या काळात चीनने औद्योगिक पुनर्रचनेला हात घातला. पुढे सांस्कृतिक क्रांतीच्या माध्यमातून पुन्हा विचारसरणीच्या मुळांकडे जाण्याची मोहीम हाती घेण्यात आली होती. आताच्या घडीला जेव्हा जगात अव्यवस्था निर्माण होत आहे, त्यावेळी ‘चिनी शहाणपण’च जगाला तारेल, असे त्या देशाचे नेते सांगू पाहात आहेत.

राष्ट्रीय समझोते, करार यापेक्षा द्विपक्षीय संबंधांवर चीन भर देतो. पूर्वीही आणि आताही. या वाटाघाटींत सीमा निश्चित झाल्या तरी बेकायदा रीतीने दुसऱ्याच्या हद्दीत वस्त्या उभारल्या जातात. त्यांच्यापुढे याबाबत शरणागती न पत्करल्यास लष्करी ताकदीचे प्रदर्शन केले जाते. तैवानमध्ये हेच दिसले. हिमालयाच्या कुशीत आणि दक्षिण चीन समुद्रातही चीनने असेच वर्तन केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर ज्या राष्ट्रांच्या संघटनांमधून चीनला वगळण्यात येते, त्या संघटनांना हरेक मार्गाने चीन विरोध करतो. एकीकडे आंतरराष्ट्रीय पातळीवर असे धोरण आणि चीनला काही जागतिक शक्ती पाण्यात पाहतात, असा प्रचार करून देशांतर्गत पातळीवर लोकमत संघटित केले जाते आणि पाठिंबा एकवटला जातो. कोरोनाची हाताळणी, आर्थिक मंदी, पुरवठा आणि मागणी यांच्यातील तफावतीची समस्या, हवामान बदलाच्या परिणामुळे होणारी टंचाई, या सर्वच प्रश्नांच्या संदर्भात चीनला कशारीतीने लक्ष्य केले जात आहे, असा सूर आळवला जातो. त्यायोगे राष्ट्रीय एकात्मतेचे हाकारे घातले जातात आणि लोकांचा पाठिंबाही मिळवला जातो.

या परिस्थितीत ऑक्टोबरमध्ये चीनच्या कम्युनिस्ट पक्षाचे अधिवेशन भरत आहे. जगाच्या भवितव्याच्या दृष्टीने त्यात काय घडते, हे पाहाणे महत्त्वाचे ठरेल. आपले जग उदार, बहुविध आणि सहिष्णू असे अपेक्षित असेल तर चिनी आव्हानाला तोंड देऊन ते उद्दिष्ट कसे साध्य केले जाणार आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.त्याचा विचार गांभीर्याने आणि प्राधान्याने करावा लागेल.

(लेखक निवृत्त ॲडमिरल आहेत.)

Web Title: Mohan Raman Writes Global Economy Covid Sickness War Ukrain Russia America China

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..