मनी की बात! (ढिंग टांग)

मनी की बात!
मनी की बात!

प्रात:स्मरणीय श्रीमान नमोजी ह्यांस, एका अनामिक आमदाराचा शतप्रतिशत प्रणाम. सध्याच्या काळात आपल्याला शेकडो निनावी पत्रे येत असतील, ह्याची मला खात्री आहे. त्या सर्व पत्रांकडे आपण दुर्लक्ष करत असाल, ह्याचीही खात्री आहे. लोकांना आपल्याबद्दल नेमके काय वाटते, ह्याचे खरेखुरे प्रतिबिंब निनावी पत्रांमध्ये असते; पण साहेब, माझ्या पत्राखाली नाव नसले, तरी भावना भयंकर प्रामाणिक असून, माझी ही ‘मनी की बात’ आपल्या सुप्रसिद्ध ‘मन की बात’मध्ये वाचून दाखवावी, ही कळकळीची विनंती.

गेली अडीच वर्षे फुले वेचली, तिथे आठ नव्हेंबरनंतर आम्हाला गोवऱ्या वेचायला लागत आहेत, ह्याची आपल्याला कल्पना आहे का, साहेब? कमळ फुलल्याचा आनंद व्यक्‍त करावा की चिखलातील आयुष्य वाट्याला आले, ह्याचे दु:ख? काही कळेनासे झाले आहे.  साहेब, गेल्या आठ नव्हेंबर रोजी आठ वाजता आपण नोटबंदीचा निर्णय जाहीर करून समस्त काळा बाजारवाल्यांच्या घड्याळात बारा वाजवले. त्या वेळी आमच्याही छातीत छोटीशी कळ उमटली. (खोटे का बोला?)

मूळव्याधीचा त्रास होणाऱ्या माणसास तीन तास हसवणारे प्रहसन दाखविले तरी कसनुसे हसण्यापलीकडे तो फार काही करू शकत नाही. अगदी तस्से आमचे झाले आहे. त्याच न्यायाने चेहरा हसतमुख ठेवून आम्ही ‘नोटबंदीमुळे अच्छे दिन येणारेयत,’ असेच सगळ्यांना (उभ्यानेच!) सांगत होतो. सगळे निस्तरून जरा कुठे सुस्कारा टाकतो, तो काल आपला आदेश मिळाला आणि नशिबावर कुऱ्हाड कोसळली! किती भयानक आदेश!! म्हणे, पक्षाच्या सर्व आमदार-खासदारांनी आठ नव्हेंबरनंतर आपल्या खात्यात किती रक्‍कम टाकली किंवा काढली, त्याचा हिशेब पक्षाध्यक्षांना सादर करावा! कुठल्या खात्याचा हिशेब सादर करू? सोबत माझ्या बचत खात्याच्या पासबुकची फोटोप्रत जोडीत आहे...आठ नव्हेंबरला माझ्या खात्यात रुपये पाचशे बेचाळीस इतके होते. तीस तारखेला ती रक्‍कम तेवढीच आहे. पाचशेच्या खाली आकडा गेला, तर मिनिमम ब्यालंस न ठेवल्याबद्दल ब्यांक दंड करत्ये!! पाचशे बेचाळीस रुपये ज्या अकौंटमध्ये आहेत, त्या अकौंटचा अभिमान बाळगावा की लाज, हे आपणच आता सांगावे.

...पुढारी माणूस फार्चुनरमधून फिरतो. मागेपुढे गाड्यांचे ताफे असतात. हेलिकॉप्टरमधून घुमतो. विमानातून प्रवास करतो. मोठमोठ्या हाटेलीत जातो; पण हमेशा लोकांच्या कोंडाळ्यात फिरणाऱ्या कुठल्याही पक्षाच्या आमदार-खासदाराच्या खिश्‍यात पाचशेची नोट तरी असते का? शोधून दाखवावी. पुढाऱ्यांना पैसे ठेवावे अथवा बचत करावे लागत नाहीत, हे आपल्या लोकशाहीतील एक रोकडे सत्य आहे. अर्थात आपल्या खिश्‍यात मजबूत पैका आहे, असा चेहरा ठेवण्यानेही लोकशाहीत बरीच कामे होतात, हे मी सांगायला नको. कारण साधासिंपल दिसणारा पुढारी कोट्यधीश असणार, ही लोकांना खात्रीच असते आणि त्यांची त्याला हरकतही असत नाही.
बचत खात्यात पैसे नसल्याने कार्ड वापरण्याचा प्रश्न येत नाही. क्‍याशची तर वानवाच आहे. आठ नव्हेंबरपासून मी मंत्रालयाच्या क्‍यांटिनमधून चहासुद्धा मागविलेला नाही. खिशातली शंभराची नोट मोडताना जीव तीळ तीळ तुटतो!! तरीही आम्ही नोटबंदीमुळे काहीही अडले नसून विरोधक नुसतीच कोल्हेकुई करताहेत, अशा आवया एकदिलाने आणि एकमुखाने उठवत होतो; पण बचत खात्याची अवस्था जाहीर करण्याचा आदेश देउन आपण आमची उरलीसुरलीही अब्रू धुळीला मिळवण्याचा घाट घातला आहे, असे वाटते. आमची सत्ता हे आता निव्वळ शेरडाचे शेपूट उरले आहे. ना लाज झाकते, ना माश्‍या वारते!!

अशा परिस्थितीत किती काळ आमदारकी ‘भोगणार’? तेव्हा आपल्या नेतृत्वाखाली पक्ष उत्तरोत्तर बहरत जावो, ह्या शुभेच्छेसह मी आपल्या सर्वांना अखेरचा ‘जय महाराष्ट्र’ करीत आहे. मी राजकारणातून निवृत्ती घेत असून, माझ्याच घराच्या नाक्‍यावर वडापावची गाडी टाकायची जुळवाजुळव करीत आहे. जमल्यास या, वडापाव खायला. (सोबत क्रेडिट कार्ड आणावे ही विनंती.) बाकी काय लिहू? शब्द आणि पैसे दोन्ही संपले!! आपला. एक अज्ञात आमदार.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com