वैश्‍विक जाणिवेचा कवी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वैश्‍विक जाणिवेचा कवी

वैश्‍विक जाणिवेचा कवी

वैभव चाळके

स्वत्वाची ओळख आणि वंश, लैंगिकता आणि लैंगिक राजकारण, मानवी कृती आणि विचारांमधील नैतिकता हा ज्यांचा काव्यविचार आहे आणि तरीही ज्यांची कविता ही आजची आहे... वर्तमानाशी नाते सांगणारी आहे, अशा कार्ल फिलिप्स यांना यंदाचा पुलित्झर पुरस्कार लाभला आहे. सार्वकालिक महान कवींप्रमाणे कार्ल कालातीत प्रश्नांचा विचार करतात आणि तरीही आजच्या जगण्याशी जोडून राहतात. एका मुलाखतीदरम्यान त्यांनी म्हटले आहे,

‘माझ्या एका कवितेत आईच्या मृत्यूची माहिती होती, जरी त्यात तिचा स्पष्ट उल्लेख नव्हता.’ कविता अत्यंत खासगी अनुभवातून उठून वैश्विक होते, तेव्हाच ती कालातीत होऊ शकते. कार्ल यांची कविता अशी वैश्विक झाली आहे.पुलित्झर समितीने ‘देन द वॉर’चे वर्णन एक उत्कृष्ट संग्रह म्हणून करताना, ‘यातील कविता अमेरिकन संस्कृतीचे वर्णन करतात. तेथील राजकारण आणि साथरोगाच्या पार्श्वभूमीवर जीवनाचा विचार करतात. बदलत्या जागतिक स्तरावर आपले स्वत्व समजून घेण्यासाठी संघर्ष करतात,’ असे म्हटले आहे.

अशी विलक्षण कविता कशी सुचते या प्रश्नावर एकदा ते म्हणाले, ‘कविता अशी झाली पाहिजे, असे मी ती लिहिण्यापूर्वी ठरवत नाही, मी लिहितो तशी ती होत जाते.’ कार्ल फिलिप्स हे अमेरिकन लेखक-कवी आहेत. ते सेंट लुईस येथील वॉशिंग्टन विद्यापीठात इंग्रजीचे प्राध्यापक आहेत. त्यांच्या ‘देन द वाॅर अँड सिलेक्टेड पोएम’ या संग्रहाला पुलित्झर पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्यांचा जन्म १९५९मध्ये एव्हरेट, वॉशिंग्टन येथे लष्करी अधिकऱ्याच्या कुटुंबात झाला. अनेक वर्षे स्थलांतरितासारखे फिरल्यावर त्याचे कुटुंब अखेरीस केप कॉड, मॅसॅच्युसेट्स येथे स्थायिक झाले. तेथे त्यांचे शालेय शिक्षण झाले.

पुढे हार्वर्ड विद्यापीठ, मॅसॅच्युसेट्स एमहर्स्ट विद्यापीठ आणि बोस्टन विद्यापीठातून त्यांनी पदवी मिळवली. त्यांचा पहिला कवितासंग्रह ‘इन द ब्लड’ हा १९९२ मध्ये प्रकाशित झाला. त्याने सॅम्युअल फ्रेंच मोर्स काव्य पुरस्कार जिंकला. त्यानंतर आतापर्यंत त्यांचे एकूण १६ संग्रह प्रकाशित झाले. ‘देन द वाॅर अँड सिलेक्टेड पोएम’ हा त्यांचा सोळावा संग्रह आहे. त्यांच्या कविता अध्यात्म, लैंगिकता, मृत्यू आणि श्रद्धा या विषयांवर आहेत. मानवी जगण्याचा वेध घेणाऱ्या आहेत. त्यांची नॅशनल बुक ॲवॉर्डसाठी चारदा अंतिम यादीत निवड झाली होती.

२००८ ते २०१२पर्यंत अमेरिकन कवींच्या अकादमीचे ते कुलपती होते. त्यांनी समकालीन अमेरिकन कवींमध्ये मानाचे स्थान मिळले होतेच; या पुरस्काराने त्यांची दखल जागतिक कवींमध्ये घेतली जाईल. कार्ल फिलिप्स यांच्या कवितेची भाषा मोठी समृद्ध आहे. वाचकाला आश्चर्यचकित करणारी कल्पनाशक्ती आणि आत्मीयतेने साधलेला संवाद ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये असल्याचे आणि त्यांच्या अनेक कवितांचा शेवट आश्चर्यकारक आणि पूर्णपणे अनपेक्षितपणे झाल्याचे समीक्षकांनी नोंदवले आहे.

पुलित्झर पुरस्कारामुळे सारे जग आता या कवीने काय लिहिले आहे, ते उत्सुकतेने पाहते आहे. ‘काल अमर्याद आहे आणि पृथ्वी अमाप... त्यावर कोठे तरी माझा समानधर्मी म्हणजे मी काय लिहितो ते जाणणारा भेटेलच,’ अशी भारतीय साहित्य परंपरेतील लेखक-कवींची भवभुतीपासून धारणा आहे. लेखक-कवी त्या समानधर्मी रसिकाच्या प्रतीक्षेत असतात. कार्ल यांना असे ‘समानधर्मी’ आता जगभर लाभतील, यात शंका नाही.