कोरोना पोहोचला गावात: पण डॅाक्टर कुठे आहेत?

मृणालिनी नानिवडेकर
Monday, 21 September 2020

कोरोना खेड्यापाड्यात पसरतोय. लस हाच त्यावरचा रामबाण उपाय. पण, त्यावर अद्याप संशोधन सुरू आहे. गणेशविसर्जनानंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत३०ते४०टक्के वाढ झाली आहे. रुग्णांसाठी खाटा पुरेशा उपलब्ध नाहीत.

राज्यात गणेशविसर्जनानंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. रुग्णखाटा मिळत नाहीत, डॉक्‍टर अत्यवस्थ होताहेत अन् तरीही स्वयंशिस्तीची जाण नसलेले नागरिक मुखपट्टी न लावता हिंडताहेत. शहरी सुशिक्षितांनाच सवयी बदलता येत नाहीत, तिथे ग्रामस्थांचे काय?

गुरुवर्य रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीतला प्रसंग. अस्ताचलाला पोहोचलेला सूर्य म्हणतो : माझे प्रकाशदानाचे काम आता कोण करेल? देवळात मिणमिणणारी पणती म्हणते, हे प्रभो माझ्यात ऊर्जा आहे तोवर तुमचे हे काम माझ्यापरीने मी करेन. आज प्रत्येकानेच ही पणती होण्याची वेळ आली आहे.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोना खेड्यापाड्यात पसरतोय. लस हाच त्यावरचा रामबाण उपाय. पण, त्यावर अद्याप संशोधन सुरू आहे. गणेशविसर्जनानंतर कोरोनाग्रस्तांच्या संख्येत ३० ते ४० टक्के वाढ झाली आहे. रुग्णांसाठी खाटा पुरेशा उपलब्ध नाहीत. डॉक्‍टर अत्यवस्थ होताहेत अन् तरीही स्वयंशिस्तीची जाण नसलेले नागरिक मुखपट्टी न लावता हिंडताहेत. शहरी सुशिक्षितांनाच सवयी बदलता येत नाहीत, तिथे ग्रामस्थांचे काय? सार्वजनिक स्वच्छतेत महाराष्ट्रातील कित्येक गावे पुढे आहेत; पण व्यक्तिगत पथ्ये पाळणे माहीत नसल्याने कोरोनाचा गावाकडचा फैलाव मोठी डोकेदुखी ठरणार आहे. 

कोरोना संक्रमणाच्या उपचारासाठी आवश्‍यक असणारा प्राणवायू अपुरा पडत होता, त्याचे उत्पादन आता सुरळीत सुरू करण्यात आले आहे; पण ग्रामीण भागात अगदी तहसील मुख्यालयातही अशी आरोग्यसुविधा अप्राप्य आहे. व्हेंटिलेटर तर चैन असणार. सरकारी प्रयत्न अपुरे पडताहेत. तीन पक्षांचे सरकार असल्याने एकवाक्‍यतेचाही अभाव आहे. राज्यात एक हजार ३६५ रुग्णांमागे एक डॉक्‍टर आहे. हे प्रमाण जगाच्या तुलनेत अल्पच. पण, रस्ता त्यातूनच काढायचा आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

डॉक्‍टरांनो, खेड्यांकडे चला!
सरकारी महाविद्यालयांतून वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्यांनी आरोग्यव्यवस्थेला सेवा द्यावी, यासाठी बॉण्ड लिहून घेण्याचा नियम आहे. करदात्यांचा निधी रुग्णालयांवर खर्च होतो, तेथे शिकणाऱ्यांनी परतफेड करण्यासाठी किमान एक वर्ष सरकारला सेवा देण्याची सक्ती. ती पाळली नाही, तर मोठी रक्कम बंधनातून मोकळे होण्यासाठी द्यावी लागते. गेल्या कित्येक वर्षांत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर कुणी डॉक्‍टरने सेवाशर्तींचे पालन केलेले नाही. ‘निर्माण’ या स्वयंसेवी अभियानाचे प्रणेते डॉ. अमृत बंग या विषयाचा पाठपुरावा करीत आहेत. जागतिक बॅंकेने दिलेल्या अनुदानामुळे राज्यात ‘ग्रामीण हेल्थ मिशन’ योजनेअंतर्गत रुग्णालयाच्या इमारती तर बांधल्या गेल्या. पण, तिथे ना डॉक्‍टर पोहोचले ना औषधे. मध्यंतरी प्रत्येक जिल्हा रुग्णालयात ‘क्ष’ किरण यंत्र बसवावे, असे ठरले, शल्यचिकित्सकांची पदे भरायचे ठरले; पण अजगरासारख्या सुस्त पडलेल्या या व्यवस्थेत बदल फारसा झाला नाही. आता साथीला सात महिने उलटल्यानंतर तब्बल १२०० बॉण्डधारक तरुण डॉक्‍टरांच्या सेवा सक्तीच्या करण्यात आल्या आहेत.

सेवाभावी डॉक्‍टरांचे जाळे
वैद्यकीय शिक्षण खात्याला सौरभ विजय हे नवे सचिव लाभल्यानंतर मंत्री अमित देशमुख यांनी हा निर्णय घेतलेला दिसतो. राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांत पाच हजारांहून अधिक वैद्यकीय शिक्षक असावेत. ते रुग्णसेवेत दिसलेच नाहीत. महिना लाख रुपये वेतन असलेली ही फौज डॉक्‍टरांची चणचण भासत असताना सक्रिय झाली, तर ते मानवजातीवर उपकार ठरतील. आरोग्य शिक्षण विभाग हे महाराष्ट्रातले मोठे प्रकरण. डॉ. तात्याराव लहानेंसारखे लोकाभिमुख वैद्यक अधिकारी या विभागाचे प्रमुख. पण, १४ हजार रिक्त पदांचा प्रश्न तसाच प्रलंबित. खासगी क्षेत्रातील डॉक्‍टरांनी सेवा द्याव्यातच; पण सरकारी सेवेत काही जण अहोरात्र काम करत असताना बाकीच्यांनी हातावर हात ठेवून बसू नये. किनवटसारख्या आदिवासी भागात काम करणाऱ्या डॉ. अशोक बेलखोडे यांनी पोलिस भरतीप्रमाणेच डॉक्‍टर भरती मोहीम राबवा, असे पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. केरळातील चमू आली तर येऊ दे; पण गेल्या चार-पाच वर्षांत डॉक्‍टर झालेल्या तरुणांना कामाला लावणे शक्‍य आहे. राज्यात सेवाभावी डॉक्‍टरांचे जाळे आहे. पाच हजारांच्या लोकसंख्येमागे एक आरोग्य उपकेंद्र स्थापन करण्याचे उद्दिष्ट आपण पूर्ण केलेय. दर ३० हजारांमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र आहे. जागतिक निधीतून उभ्या झालेल्या या सांगाड्यांनी पांढऱ्या हत्तीचे रूप न घेता सुरू होणे, सेवारत होणे गरजेचे आहे.

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

उपाय शोधावे लागतील
 ग्रामीण भागात सुमारे १४ हजार कुटीर दवाखाने आणि १९०० प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. जिल्हा रुग्णालयेही उभी आहेत, पण तेथे डॉक्‍टर नसल्याने रुग्ण नाहीत. या प्रदेशात डॉक्‍टर पोहोचले तर संकटातल्या संधीकडे आपण पाहिले, असे म्हणता येईल. आज व्हेंटिलेटर नाहीत, प्राणवायूपुरवठा यंत्रे नाहीत; पण माणसे पोहोचली तर यंत्रे मागोमाग जातीलच.  रत्नागिरी जिल्ह्यात कुणीही डॉक्‍टर नोकरी करण्यास जात नाही, असे सरकारने न्यायालयात अगतिक होऊन सांगितले. हे बदलायची वेळ आली आहे. हेमलकसा  निबीड अरण्यात उभे राहू शकते, तर अन्य गावे तर फारच उजवी आहेत की! कोरोनाबरोबर जगणे भाग असेलच, तर त्यावर उपायही शोधायलाच हवेत.

आकडे बोलतात

३०,००० - लोकसंख्येसाठी एक प्राथमिक आरोग्य केंद्र
१३६५ - रुग्णांमागे एक डॉक्‍टर
१२०० - तरुण डॉक्‍टरांना सेवा सक्तीची केली
१४००० - आरोग्य शिक्षण विभागातील रिक्त पदे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mrinalini naniwadekar writes article Corona is spreading in the villages