कचरा प्रश्‍नाचे ‘ये रे माझ्या मागल्या’

मृणालिनी वनारसे (पर्यावरणाच्या अभ्यासक)
शनिवार, 22 एप्रिल 2017

राज्याच्या अनेक मोठ्या शहरांत कचऱ्याचा प्रश्‍न पुन्हा तीव्र होताना दिसत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा का निघत नाही, हा प्रश्‍न कुणाच्याही मनात येईल. या प्रश्‍नाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच तपासून पाहिला तर या प्रश्‍नाचे उत्तर बहुधा सापडेल. उदाहरण म्हणून पुणे परिसराची स्थिती पाहू. येथे कचराकुंड्या ‘ओव्हरफ्लो’ होताना दिसताहेत. फुरसुंगी आणि देवाची उरळी येथील कचरा डेपोला आग लागल्याने शहरातील कचरा उचलणे काही काळ थांबविण्यात आले होते; दुसऱ्या बाजूला कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले प्रक्रिया प्रकल्पच निकामी झाल्याचे दिसते. आता या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी नेमके काय झाले, यावर चर्चा झडेल.

राज्याच्या अनेक मोठ्या शहरांत कचऱ्याचा प्रश्‍न पुन्हा तीव्र होताना दिसत आहे. त्यावर कायमस्वरूपी तोडगा का निघत नाही, हा प्रश्‍न कुणाच्याही मनात येईल. या प्रश्‍नाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच तपासून पाहिला तर या प्रश्‍नाचे उत्तर बहुधा सापडेल. उदाहरण म्हणून पुणे परिसराची स्थिती पाहू. येथे कचराकुंड्या ‘ओव्हरफ्लो’ होताना दिसताहेत. फुरसुंगी आणि देवाची उरळी येथील कचरा डेपोला आग लागल्याने शहरातील कचरा उचलणे काही काळ थांबविण्यात आले होते; दुसऱ्या बाजूला कोट्यवधींचा खर्च करून उभारलेले प्रक्रिया प्रकल्पच निकामी झाल्याचे दिसते. आता या स्थितीतून बाहेर पडण्यासाठी नेमके काय झाले, यावर चर्चा झडेल. प्रशासकीय व्यवस्थेतील त्रुटी शोधण्याचा प्रयत्न होईल. त्यावर मात करण्यासाठी नवे प्रकल्प निर्माण होतील आणि ‘पुन्हा ये रे माझ्या मागल्या’ अशी स्थिती होईल. हे असे का होते?  हलगर्जीपणा एवढेच कारण यामागे आहे काय? या प्रश्नाकडे निसर्ग-नियमांच्या दृष्टीतून पाहिले तर वेगळेच वास्तव समोर येते. 

निसर्गात कचरा असे काही नसते. म्हणजे प्रश्न आहे तो मानवनिर्मित कचऱ्याचा. कोणत्याही द्रव्यावर (द्रव्य=मॅटर) प्रक्रिया करताना कचरा उत्पन्न होतो. प्रक्रियेतील जटिलतेला अनुसरून कचरा निर्माण होणार हा निसर्गनियम. शून्य कचरा म्हणजे कोणतीही प्रक्रियाविरहित जीवनशैली. प्रचंड गुंतागुंतीचे तंत्रज्ञान असलेल्या जीवनशैलीत शून्य कचरा कसा संभवेल? आपल्याला तशी इच्छा असू शकते; पण द्रव्य आणि ऊर्जेच्या संवर्धनाचा नियम माहीत असलेला कोणीही चकचकीत गृहप्रकल्पावर असलेल्या शून्य कचऱ्याच्या जाहिरातीला भुलणार नाही. (कचरा ही गोष्ट सापेक्ष आहे हे बरोबर. आपली रद्दी हे कुणाचे तरी चरितार्थाचे साधन जरूर असू शकते; पण सर्व कचऱ्याच्या बाबतीत हे होत नाही. फार थोड्या कचऱ्यात असे आपणहून हात घालणे कोणालाही आवडते. उरलेल्यांना ते बळजबरीने करावे लागते. यंत्रे सगळे करतील हे स्वप्न आकर्षक आहे. परंतु, यंत्रे बनविणारी माणसेच असतात. जितकी अधिक आणि गुंतागुंतीची यंत्रे तितकी माणसेच अधिक कचऱ्यात ओढली जाणार.)

 आपल्याला कोणी असे म्हटले, की आम्ही आधी खूप कचरा करत होतो, पण आता आम्ही कमी कचरा करतो तर त्याचा अभ्यास मात्र जरूर करावा. तिथे काही तथ्य सापडेल. कचऱ्यातून ऊर्जा निर्मितीच्या बाबतीतले सत्य असे की कचरा हा आपल्यासाठी विखुरलेला ऊर्जास्रोत आहे. त्यातून ऊर्जा निर्मिती करायची तर आधी खनिज तेल/कोळसा वेगाने संपवावा लागणार. आपण अशी रिन्युएबल ऊर्जा निर्मिती करतो म्हणजे वेगाने ‘फॉसिल फ्युएल’ संपवतो आहोत.

प्रश्न असा आहे, की मग शहरांनी करायचे काय? आपल्यापैकी जे परदेशी जाऊन येतात आणि तिथली स्वच्छ शहरे बघतात, त्यांना तर आपले अस्वच्छ शहर म्हणजे ‘केवळ हलगर्जीपणा दुसरे काही नाही,’ असे वाटते. त्या स्वच्छ शहरांमध्ये कचरा तर भरमसाठ तयार होतो; पण झाकपाक करण्याची त्यांची कला आणि तंत्रज्ञान आपल्यापेक्षा प्रभावी आहे. त्याला ऊर्जा प्रचंड लागते. या सगळ्याचीच वानवा असेल तर काय करणार? ‘पुलं’चा अंतू बर्वा म्हणायचा, ‘अहो, रत्नांग्रीस उकडायचंच. रत्नांग्रीस थंड हवा असती तर शिमला म्हणाले नसते काय आमच्या गावाला? पण उकाड्याचा तुमच्या सड्यावर अधिक त्रास! दुपारच्या वेळी मारा सायकलीवर टांग आणि थेट या आमच्या पोफळीच्या बागेत झोपायला. पोफळीची बाग म्हणजे एअरकंडिशन हो!’ आता रत्नांग्रीस ‘डेझर्ट एसी’ मिळतात आणि चांगले खपतात. अंतु बर्व्याच्याच भाषेत सांगायचं झालं, तर ‘ हे बदल झाले नसते तर मनुष्य म्हंटले असते काय कोणी आम्हाला?’ पोफळीच्या बागेचे एअरकंडिशन फुकट आहे. ते सोडून, एसी-यंत्रे तयार करायची, वापरायची, त्यातून कचरा आणि अधिक उष्मा निर्माण करायचा आणि मग कचरामुक्ती आणि ग्लोबल वॉर्मिंगची चर्चा करायची. हे आमचे भागधेय नाही का? संगणकीय भाषेत हा आपला ‘प्रोग्रॅम’ आहे असे एव्हाना स्पष्ट होऊ लागलेय. ही प्रक्रिया थांबवणे तर सोडाच, तिची गती कमी करणेदेखील अवघड आहे. ते आपल्याच प्रोग्रॅमच्या विरुद्ध गेल्यासारखे होईल. एसी तर वापरायचा; पण ‘क्‍लीन एनर्जी’स्रोतावर चालणारा मिळाला तर अधिक चांगला असे आपल्याला वाटते. प्रक्रियेदरम्यान कचरा तयारच होऊ नये आणि झालाच तर त्याचे लगेच रिसायकलिंग व्हावे, असे आपल्याला वाटते. परवा माझ्या वर्गातला एक छोटा मुलगा सचिंत चेहऱ्याने माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘आपण जगातली सगळी माणसं रोज श्वासोच्छवास करतो त्याने किती कार्बनडायऑक्‍साईड तयार करतो माहितीये? तीन अब्ज टन..’ त्याला त्याच्या ‘डेली सायंटिफिक फॅक्‍टस’ने हे ‘ज्ञान’ पुरवले होते. ‘आता कसं कमी होणार ग्लोबल वॉर्मिंग; आणि मग झिरो एमिशनचं काय? कुणीच हे कमी नाही का करू शकणार?’

मला असे वाटले, की त्या छोट्या मुलाच्या निमित्ताने निसर्गनियमांची उजळणी आवश्‍यक आहे. त्यांचा आपल्यावर कोणता परिणाम होतो त्याची चर्चा आवश्‍यक आहे. अन्यथा पुढची पिढी गोंधळून जाणार नक्की. कोळसा आणि खनिज तेल हे जसे दुष्प्राप्य होत जातील, तसतसे चहू बाजूंनी हातपाय मारून बघण्याला ऊत येईल. निसर्गनियमांच्या कसोटीवर यातले काय उतरते, काय नाही आणि आपल्याला काय मानवते, याची ओळख करून देण्याची जबाबदारी कोणता अभ्यासक्रम घेतो? निसर्गनियम जाणून घेऊन आपले जगणे त्याच्याशी जुळवले तर जगण्यातील कष्ट आणि धोके कमी होतात. या काही तत्त्वांना आधारभूत मानून आजच्या जगण्याच्या शैलीची चिकित्सा तर करायला हवी. न जाणो, आपल्या ‘प्रोग्रॅम’मध्येही हळूहळू बदल होऊ लागतील. भावी पिढीसाठी एवढी तरतूद करता आली, तर आपण खरोखर त्यांच्यासाठी काही केले, असे होईल.

Web Title: Mrinalini Vanarsi article