esakal | कायापालट
sakal

बोलून बातमी शोधा

mrunalini chitale

कायापालट

sakal_logo
By
मृणालिनी चितळे

लाल चुटुक रंगाचा शालू. हातात, गळ्यात, कानात माणकाचे अलंकार. नथीतील डाळिंबी खडा लांबूनही उठून दिसणारा. केसात लाल गुलाब. "या, सुमाताईच ना?' मी विचारलं. माझा प्रश्न ऐकून सत्तरी ओलांडलेल्या सुमाताई छानपैकी लाजल्या. आज आमच्या संस्थेच्या वृद्धाश्रमात एकाच रंगाची आभूषणं वापरून नटण्याची स्पर्धा होती. सुमाताईंकडे पाहताना ७-८ महिन्यांपूर्वी वृद्धाश्रमात प्रवेश मिळावा म्हणून आपल्या भावाला घेऊन आलेल्या सुमाताई आठवल्या. मुलाखतीसाठी जिना चढून आल्यामुळे त्यांना दम लागला होता. मणक्‍याची शस्त्रक्रिया झाल्यामुळे चालताना त्रास होत होता. त्यांच्या पेहरावावरून त्या सुखवस्तू घरातल्या आहेत, हे जाणवत होतं. वृद्धाश्रमात येऊन राहण्याचं कारण म्हटलं, तर तसं नेहमीचं होतं. मुला-सुनेशी न पटणं. त्यामुळे भरल्या घरात जाणवणारं एकाकीपण. त्यांची शारीरिक अवस्था बघता त्यांना स्वतंत्रपणे राहणं अवघड आहे हे कळत होतं. शिवाय रिकामी झालेली खोली वरच्या मजल्यावर होती. जिन्याची चढउतार त्यांना झेपण्यासारखी नव्हती. हे त्यांना समजावून सांगायला लागल्यावर त्या म्हणाल्या, "अहो, एकदा मी माझ्या खोलीत गेल्यावर जिना उतरायचा प्रश्नच येणार नाही. मी डबा लावणार आहे. प्लीज, नाही म्हणू नका.' "पण तुमची तब्येत?'

"मला माहीत आहे माझे फार दिवस राहिलेले नाहीत. पण आहेत ते मला स्वतंत्रपणे घालवायचे आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर मी लिहून देते, की इथे आल्यावर माझा आजार बळावला तर माझी जबाबदारी संस्थेवर राहणार नाही. तुम्ही सांगाल तेवढं डिपॉझिट ठेवायची माझी तयारी आहे. पण नाही म्हणू नका,' बोलताना त्यांचा स्वर कातर झाला. त्यांचा भाऊही त्यांच्या आजारपणात जबाबदारी घ्यायला तयार असल्याचं हमीपत्र लिहून द्यायला तयार होता. तेव्हा सर्वानुमते त्यांना प्रवेश द्यायचं ठरलं.  वृद्धाश्रमात आल्यावर खरोखरच पहिले चार महिने त्या जिना उतरल्या नाहीत; परंतु त्यांच्या गप्पिष्ट स्वभावामुळे त्यांनी मैत्रिणी जोडल्या. त्यांना गाण्याची जाण होती. रात्रीच्या जेवणानंतर अधूनमधून त्यांच्या खोलीत गाण्याची मैफील रंगू लागली. हळूहळू सकाळच्या वेळी अंगणातील कोवळ्या उन्हात येऊन बसणं हे त्यांचं नित्यकर्म झालं. त्यांच्या चेहऱ्यावर तजेला येऊ लागला. सगळं आयुष्य बंगल्यात व्यतीत केलेल्या सुमाताईंची वृद्धाश्रमातील एक खोली वा जेवणाचा डबा या कशाहीबद्दल तक्रार नसायची. आजचं त्यांचं रूप तर थक्क करणारं होतं. चपलांपासून टिकलीपर्यंत लाल रंगाच्या एकूण अठरा गोष्टी त्यांनी परिधान केल्या होत्या. पहिल्या नंबरचं बक्षीस स्वीकारताना त्यांच्या चेहऱ्यावर फुललेले गुलाब पाहिले आणि वाटलं कृतनिश्‍चय केला की तो प्रत्यक्षात उतरवायला वयाचं बंधन नसतं. शिवाय मैत्रिणींच्या सान्निध्यात कायापालट करायची किमया असते ती वेगळीच.

loading image