स्वभावाला औषध नसलं तरी...

मृणालिनी चितळे
मंगळवार, 12 फेब्रुवारी 2019

बार्सिलोनातील नितांत सुंदर तळं. तळ्याकाठची निरव शांतता नि हिरवंगार गवत. आम्ही जेमतेम टेकलो नाही, तोच नीता म्हणाली, "ए, बसताय काय अशा. आपल्याला अजून कितीतरी  पाहायचं आहे.' "मला तर वाटतंय दिवसभर इथेच पडून राहावं,' स्वाती म्हणाली. "इतक्‍या लांब, एवढे पैसे खर्च करून आपण आराम करायला का आलो आहोत?' नीताकडे कुणी लक्ष दिलं नाही, तरी तिचा "उठा, उठा'चा जप संपेना. नीताचा घायकुतेपणा बघून उज्ज्वला म्हणाली, "हिच्या स्वभावाला औषध नाही.'त्यांचे संवाद ऐकताना मला "टाईप ए' व्यक्तिमत्त्व आणि "टाईप बी' व्यक्तिमत्त्व या संकल्पनेची आठवण झाली. डॉ. मेयर फ्रेडमन आणि डॉ. रे रोझमन या संकल्पनेचे जनक.

बार्सिलोनातील नितांत सुंदर तळं. तळ्याकाठची निरव शांतता नि हिरवंगार गवत. आम्ही जेमतेम टेकलो नाही, तोच नीता म्हणाली, "ए, बसताय काय अशा. आपल्याला अजून कितीतरी  पाहायचं आहे.' "मला तर वाटतंय दिवसभर इथेच पडून राहावं,' स्वाती म्हणाली. "इतक्‍या लांब, एवढे पैसे खर्च करून आपण आराम करायला का आलो आहोत?' नीताकडे कुणी लक्ष दिलं नाही, तरी तिचा "उठा, उठा'चा जप संपेना. नीताचा घायकुतेपणा बघून उज्ज्वला म्हणाली, "हिच्या स्वभावाला औषध नाही.'त्यांचे संवाद ऐकताना मला "टाईप ए' व्यक्तिमत्त्व आणि "टाईप बी' व्यक्तिमत्त्व या संकल्पनेची आठवण झाली. डॉ. मेयर फ्रेडमन आणि डॉ. रे रोझमन या संकल्पनेचे जनक. दोघंही हृदयविकारतज्ज्ञ. सतत दहा वर्षं, साडेतीन हजार व्यक्तींच्या स्वभाववैशिष्ट्यांचा अभ्यास केल्यानंतर त्यांनी माणसाच्या व्यक्तिमत्त्वांची विभागणी  "टाईप ए' आणि "टाईप बी'मध्ये केली. त्यांच्या मते "टाईप ए'ची माणसं अत्यंत चिकित्सक,  शंकेखोर नि उतावळी असतात. वेळेच्या बाबतीत अत्यंत काटेकोर. निवांत बसणं म्हणजे त्यांना वेळेचा अपव्यय वाटतो. अतिसंवेदनशील असल्यामुळे दुसऱ्यावरच नाही, तर स्वत:वरही टीका करत राहतात. स्वत:विषयी खूप बोलतात. या उलट "बी टाईप'ची माणसं स्वत:विषयी कमी बोलतात. अपराधीपणाची भावना मनात न आणता आराम करू शकतात. टीकेनं गडबडून जात नाहीत. "टाईप ए' असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकार, उच्च रक्तदाब अशा आजारांचं प्रमाण "टाईप बी'पेक्षा तिप्पट असतं. फ्रेडमन यांच्या लक्षात आलं की आपलं व्यक्तिमत्त्व "ए टाईप'चं आहे. त्यांना स्वत:ला हृदयविकाराचा झटका आल्यावर आपल्या व्यक्तिमत्त्वात बदल घडवून आणण्यासाठी त्यांनी जाणीवपूर्वक प्रयत्न केले. सकाळी घाईघाईनं आवरून क्‍लिनिकला जाण्याऐवजी हातातल्या घड्याळाकडे न पाहता प्रभातफेरी मारायला सुरवात केली. अनेक कमिट्यांवरचं काम कमी केलं.
व्यक्तिमत्त्व बदलण्यासाठी त्यांनी एक अफलातून उपाय सुचवला. "ए टाईप'च्या व्यक्तींना ट्रॅफिक सिग्नल पिवळा होताक्षणी झपकन गाडी काढण्याची सवय असते. अशाप्रकारे गाडी काढली की एक शिस्त म्हणून वा शिक्षा म्हणून पुढच्या चौकात यू टर्न घेऊन परत फिरायचं आणि तोच सिग्नल शांतपणे ओलांडायचा. फक्त वाहनाचा नाही, तर एकंदरच आयुष्याचा वेग काबूत ठेवण्यासाठीचा हा धडा. मीही आजकाल हे धडे गिरविण्याचे प्रयत्न करते. स्वभावाला औषध नसतं हे कितीही खरं असलं तरी आपल्या वागण्याला वेगवेगळे पर्याय शोधता येतात; जेणेकरून आपल्या व्यक्तिमत्त्वाची धार कमी करता येते. त्यामुळे आयुष्य फक्त सुसह्य नाही, तर सुखकर होण्याची शक्‍यता कितीतरी पटीनं वाढते. फक्त आपलंच नाही तर आपल्या सख्या-सोबत्यांबरोबरचंही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini chitale write pahatpawal in editorial