देवकी की स्वच्छंदी?

mrunalini chitale
mrunalini chitale

शाळेत असताना एक संस्कृत श्‍लोक वाचला होता. त्यात म्हटलं होतं, की कोकिळा कावळ्याच्या घरात अंडं टाकते. कावळ्याला ते कळत नाही. त्यामुळे कावळ्याची जोडी आपल्याबरोबर तिचं अंडं उबवते. पिलाला कंठ फुटल्यावर ते केकाटण्याऐवजी गायला लागतं. तेव्हा कुठे कावळ्याला कळतं, की ते पिल्लू आपलं नाही म्हणून. हा श्‍लोक वाचल्यावर कविकल्पना म्हणून सोडून दिला होता. कारण, अशा कल्पनांची संस्कृत साहित्यात बरीच रेलचेल आहे. कमळाचं पान मधे आल्यामुळे रात्रभर विरह सोसणारे चकोर किंवा कमलपुष्पात बंदिस्त झालेला भुंगा, तसंच हे कोकिळेचं बिनधास्त आईपण! परंतु, हळूहळू निसर्गातील अनेक चमत्कारांशी ओळख होत गेल्यावर या श्‍लोकात काही तथ्य आहे काय, हे जाणून घेण्यासाठी आमच्या पक्षितज्ज्ञ मित्राला गाठलं. त्याच्याशी बोलताना निसर्गातील एक ‘नवलकथा’ आमच्या पुढं उलगडली गेली. कोकिळा आपलं अंडं फक्त कावळ्याच्याच नाही; तर बुलबुल, सातभाई एवढंच नाही, तर जेमतेम चार इंच लांबीच्या शिंजीर (सनबर्ड) पक्ष्यांच्या घरट्यातसुद्धा टाकते. आपलं अंडं आपण निवडलेल्या पालकपक्ष्याच्या घरट्यात टाकण्यापूर्वी कोकिळा त्याच्या घरट्याचा पूर्णपणे अभ्यास करते.

पालकपक्ष्याच्या नकळत आपलं अंडं काही क्षणांच्या अवधीत टाकण्याचं कौशल्य कोकिळेला जन्मत:च मिळालेलं असतं. कोकिळेच्या या धूर्तपणाची इतर पक्ष्यांना कल्पना नसते असं नाही. त्यामुळे ते आपलं घरटं पानाआड दडवणं किंवा प्रवेशद्वार लहान करणं, अशी काळजी घेत असतात; तरीही कोकिळा सफाईनं आपला कार्यभाग उरकते. एवढंच नाही तर आपलं अंडं इतर अंड्यांपेक्षा आधीच उबेल अशा बेतानं टाकते. पालकपक्ष्याची पिलं जन्मण्याआधी कोकिळेचं बाळ अंड्याबाहेर येऊन अन्न खाऊन मोठं होऊ लागतं. कधीकधी तर अरेरावी करून इतर पिलांना उपाशी ठेवतं किंवा मारून टाकतं. आपण फक्त एकाच पिलाला, तेही दुसऱ्याच्या पिलाला भरवत आहोत, हे पालकपक्ष्याच्या लक्षात येत नाही. कधीकधी कोकिळेचं बाळ त्याचं पालकत्व स्वीकारलेल्या शिंजोरसारख्या चिमुकल्या पक्ष्यापेक्षा आकारानं मोठं होतं; तरीही शिंजोर पक्षी कोकिळेच्या बाळाच्या पंखात बळ येईपर्यंत इमानेइतबारे त्याला भरवत राहतो. दुसऱ्याच्या पिलांची जबाबदारी स्वीकारून आपल्या पिलांकडे दुर्लक्ष करायची वृत्ती, ही पक्ष्यांच्या निर्बुद्धपणाची खूण समजायची की एकदा जबाबदारी स्वीकारली की ती निभावून नेण्याच्या, त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना दाद द्यायची? मातृत्वाची जबाबदारी दुसऱ्यावर ढकलण्याचा कोकिळेचा जन्मजात स्वच्छंदीपणा मानून तिची हेटाळणी करायची की आपलं बाळ वाढविण्याच्या सुखापासून वंचित झालेली देवकी समजून तिच्या स्वरातील आर्तता समजून घ्यायची? अशा कोकिळाच नाही; तर अनेक कावळे, सातभाई, शिंजोर फक्त पक्ष्यांच्याच जगात नाही, तर आपल्या आसपासही वावरत असतात, असं नाही वाटत?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com