पहाटपावलं: ऐसपैस खेळ (मृणालिनी चितळे)

मंगळवार, 14 मे 2019

अवनी, डबडा ऐसपैस...' अनयचे खणखणीत शब्द दुपारची शांतता भंग करत गेले. पाठोपाठ "धपांडी' असा जल्लोष. क्षणभर माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. मी बाहेर पाहिलं, सात-आठ मुलं-मुली "धपांडी...' असं म्हणत अनयभोवती नाचत होती. "हा खेळ कुणी शिकवला तुम्हाला?'

"अवनी, डबडा ऐसपैस...' अनयचे खणखणीत शब्द दुपारची शांतता भंग करत गेले. पाठोपाठ "धपांडी' असा जल्लोष. क्षणभर माझा माझ्या कानांवर विश्वास बसेना. मी बाहेर पाहिलं, सात-आठ मुलं-मुली "धपांडी...' असं म्हणत अनयभोवती नाचत होती. "हा खेळ कुणी शिकवला तुम्हाला?' मी विचारलं. अक्षय सुटीतल्या कॅम्पला गेला होता, तिथे शिकून आला. सुटीत कॅम्प भरविणाऱ्यांविषयी माझ्या मनात एकाएकी आदराची भावना जागी झाली. 

मुलांचा "धपांडी... अंडं... डबडं ऐसपैस...' असा दंगा ऐकताना माझं मन अलगद 40/45 वर्षं मागं पुण्यातील आमच्या सदाशिव पेठेतील वाड्यात गेलं. तेव्हाचे खेळ आणि खेळाची परिभाषा अजब असायची. "टाइम प्लीज'ऐवजी मिटलेल्या मुठीवर थुंकी लावून "थुज्ज' म्हणणं, राज्य कुणावर द्यायचं यासाठी चकायची "पचकी' पद्धत, लपंडावमधील भोज्या, दगड का माती खेळताना म्हणायचं गाणं - "कोरा कागद, निळी शाई, आम्ही कुणाला भीत नाही, दगड का माती.' ना धड यमक जुळलेला, ना अर्थाचा काही संबंध. आंधळी कोशिंबीर, अप्पारप्पी, लगोरी, खांब खांब खांबोळी असे कितीतरी खेळ. खेळताना चिडायचं, रुसायचं, भांडायचं हेही नित्याचं. 

तेवढ्यानं समाधान झालं नाही, तर मस्तपैकी मारामारी आणि संध्याकाळी गळ्यात गळे घालून फिरायचं. कुणा एकाच्या वाड्यात फार दंगा केला म्हणून तिथून हाकलून दिलं की पुढच्या वाड्यात जायचं. मुलांचा दंगा ऐकताना लहान वयातलं बरंच काही आठवलं. आठवणीतला निखळ आनंद जाणवला. त्याबरोबर एक नॉस्टाल्जिक मूड आला. अशा या नॉस्टाल्जिक मूडला नेहमीच अस्वस्थततेची झालर असते काय? नेहमीचं माहीत नाही, पण आत्ता थोडं उदास वाटलं, ते आजकालच्या मुलांचे खेळ आठवून. असा अर्वाच्च दंगा करताना ती खूप कमी दिसतात.

मोबाईल आणि संगणक यांच्याशी खेळाताना ती आपल्यातच मश्‍गुल असतात. फुटबॉलसारखा मैदानी खेळसुद्धा ती बटणं दाबून खेळतात. त्यापायी मुलांमधील तुटत चाललेला परस्परसंवाद, वाढत चाललेली एकाकीपणाची भावना, याबाबत अनेक मानसोपचारतज्ज्ञ आणि 
समाजशास्त्रज्ञ यांनी धोक्‍याचा कंदील दाखवला असूनही, मोबाईल आणि इंटरनेटचा पगडा जराही कमी झालेला नाही. आत्ताचा "डबडा ऐसपैस'चा खेळ पाहताना मला मनापासून आनंद झाला तो केवळ माझ्या लहानपणच्या आठवणी जाग्या झाल्या म्हणून नाही, तर बंद खोलीत बसून आपल्याच कोशात गुंतून पडणारी मुलं मोकळेपणी धावतपळत "ऐसपैस' खेळत आहेत हे बघून. बाहेरचा आरडाओरडा वाढला म्हणून मी खिडकीशी गेले तर मुलांमध्ये आता दोन तट पडून चिडीचा डाव कोण खेळला याबद्दल ताणाताणी 
चालली होती. उल्हसित मनानं मी त्यांच्यातील वादसंवाद ऐकत राहिले.