या जगण्यावर... : आपल्यासारखे आपणच... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

या जगण्यावर... : आपल्यासारखे आपणच...
या जगण्यावर... : आपल्यासारखे आपणच...

या जगण्यावर... : आपल्यासारखे आपणच...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

- मुक्ता बाम

काही दिवसांपूर्वीच नेटफ्लिक्सवर ’मीनाक्षी सुंदरेश्वर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यातील एका प्रसंगात मीनाक्षी म्हणते, "मला वाटतंय माझं दुःखी असणं वाया चाललं आहे". नव्या पिढीतील कोणालाही पटकन समजू शकेल, असा हा संवाद.एखादी आपल्याला वाटणारी भावना वाया जाते आहे, असं वाटणं म्हणजे काय? भावना मनात निर्माण होते, तेव्हाच तिचं काम संपलेलं असतं ना? फारतर ती व्यक्त न करता आल्याने घुसमट झाली म्हणता येईल. पण भावना वाया जाते आहे, वाटणं ही खास आत्ताच्या समाजमाध्यमांची आपल्याला मिळालेली देणगी आहे. प्रेम, आनंद, दुःख, अभिमान, चीड हे सगळं कोणाला तरी दाखवावंस वाटणं, आणि कोणाला तरी म्हणजे आपल्या जवळच्या चार-पाच व्यक्ती नव्हेत,तर अख्ख्या मित्रवर्तुळाला दाखवावं वाटणं, हे न सुटणारं व्यसन होऊन बसलं आहे.

‘काय? तुला डिस्टिंक्शन मिळालं? स्टोरी नाही टाकलीस?’

‘वा! पहिलं बक्षिस मिळालं तुला, काय करणार आता?’

‘सगळ्यांना टॅग करुन पोस्ट टाकणार’

हे रोजचे संवाद. आनंदापेक्षा सोहळा मोठा अशी स्थिती. "felt cute, might delete later" म्हणजे आत्ता लोकांचं लक्ष वेधून घ्यावं वाटतंय, मिळाले भरपूर लाईक्स तर फोटो ठेवेन नाहीतर डिलीट करेन!

लोकांनी सतत इन्स्टाग्रामवर दिसत राहिलं पाहिजे, ते नाही दिसले की त्यांचं काहीतरी खरंच चांगलं चालू आहे, असं वाटू लागतं, ही एकाची यावरची प्रतिक्रिया खरंच सध्याचं वास्तव टिपणारी आहे. आशादायक गोष्ट म्हणजे हळूहळू लोक सजगतेने ह्या विळख्यातून बाहेर पडायचे मार्ग शोधू लागले आहेत. आपल्या मोबाईल वापरावर टाईमर लावणं, काही दिवस जाणीवपूर्वक ही अ‍ॅप्स न वापरणं हे काही उपाय झाले. पण बऱ्या‍याचदा कलाकारांचं, इन्फ्लुएन्सर्सचं कामच समाझमाध्यमांवर अवलंबून असतं. मग काय करायचं? कोणतीही पोस्ट/ स्टोरी टाकण्यापूर्वी स्वतःला विचारायचं की हे मी का करत आहे? ‘केलेलं काम/अनुभव पोहोचेल, वाचणाऱ्यांना/बघणाऱ्यांना काहीतरी मिळेल, आपल्या व इतरांच्या कामाला मदत होईल’ ह्यातलं काहीतरी त्यात असेल तरच स्टोरी टाकावी.

आपण आपल्यावरच काही मर्यादा घालून घेतल्या, तर आपोआप माध्यमाने आपल्याला वापरुन घेण्यापेक्षा आपण माध्यमाला वापरुन घेऊ शकतो. कारण स्टोरी २४ तासांनी संपते, पोस्ट २ दिवसांनी फक्त आपल्या प्रोफाईलवर उरते; पण अनुभव आपल्यासोबत रहातो. स्टोरी आधी जगावी, मग वेळ मिळाला तर टाकावी! कारण अत्यंत स्वस्त डेटा वापरुन, १५ सेकंदात तुमचं आयुष्य पाहून (बऱ्याचदा) तुमच्यातले दोष काढणारे महत्त्वाचे नसतात. त्या क्षणी तुमच्यासोबत असणारी माणसं महत्त्वाची असतात! सुंदर अनुभव कायमचा आठवणीत रहावा म्हणून त्याची एक डिजिटल नोंद करणं वेगळं आणि डिजिटल नोंद व्हावी म्हणून अनुभव घेणं वेगळं. दर Sunday हा funday असेलच असं नाही.

कचकड्यांचं खोटं खोटं परिपूर्ण जगण्यापेक्षा ह्या अपुरेपणासह जगण्यात किती मजा आहे! कितीतरी फिल्टर लावून ‘लाईक्स’ मिळवण्यापेक्षा साधं रहाण्यात मजा आहे. रणरणत्या उन्हात कधीतरी अचानक डोक्यावर सावली येते, सुंदर बहावा आणि लालजर्द गुलमोहोराच्या फांद्या एकमेकांत मिसळलेल्या दिसतात. ढग गडगडतात, झाडं हलू लागतात, पाऊस बरसतो. फोन ओला होईल म्हणून आतल्या कप्प्यात जातो आणि नकळत धारा झेलायला हात पुढे होतो. कडाक्याच्या थंडीत, उबदार गोधडीत गुरफटून एखादं पुस्तक वाचताना जगाचा विसर पडतो. जॉन ग्रीन म्हणतो, "पुस्तकं ही इतकी खास, जवळची असतात की त्यांच्यावरच्या प्रेमाची जाहिरात करणं हा विश्वासघात वाटतो." तसंच अनुभवांचं असतं. या अनुभवांची जाहिरात करता येत नाही, ह्यांना कोणत्याच लेन्समधे पकडता येत नाही. जगलेल्या गोष्टींनी कोणालाही न दिसणारी ‘प्रायव्हेट प्रोफाईल’ तयार होते, जिला ‘ब्ल्यू टिक’ची गरज नसते.याचे कारण आपल्यासारखे फक्त आपणच आहोत, हे आपल्याला पक्कं माहीत असतं... आणि असायला हवंच.

loading image
go to top