गेट वे ऑफ इंडियावरील ‘गर्म हवा’

दीपा कदम
Wednesday, 8 January 2020

पाहता पाहता आंदोलनासाठी तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत गेली. पहिल्यांदाच मुंबईनं असा माहोल अनुभवला. तरुणाईच्या या सळसळणाऱ्या चैतन्याला ‘गेट वे’च्या रूपानं समुद्राच्या साक्षीनं उधाण आलं...

मुंबईला बऱ्याच प्रतीक्षेनंतर थंडीची चाहूल लागली आहे; पण म्हणून मुंबईतील तरुणाई चहाचे घुटके घेत दुलईत विसावलेली नाही. जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) हल्ल्याचे वृत्त रविवारी सायंकाळी मुंबईत धडकले आणि काही तासांतच, रात्री अकराच्या सुमारास गेट वे ऑफ इंडियाच्या प्रांगणात पंधरा-वीस विद्यार्थी जमा झाले. त्यांनी घोषणा दिल्या. मेणबत्या लावून ‘जेएनयू’वरील हल्ल्याचा निषेध केला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्या मेणबत्त्या विझल्या की ही मुले आपापल्या घरी जातील, असा पोलिसांचा कयास होता; पण त्या मेणबत्त्या विझल्याच नाहीत. समाजमाध्यमांतून या आंदोलनाची हाक सर्वदूर उपनगरांत गेली आणि पाहतापाहता आंदोलक मुलांची संख्या वाढत गेली. ‘ऑक्‍युपाय वॉल स्ट्रीट’ची आठवण व्हावी, असे वातावरण होते. मुंबईतील अशा प्रकारचे हे पहिलेच आंदोलन म्हणावे लागेल. विधानसभा निवडणुकीनंतर मुंबईतील हवा कशा प्रकारे बदलली आहे, याची प्रचिती यातून आली. विरोधी मत मांडले तर काय होईल, हे भय विरत चालल्याचे यातून दिसले.

देशाच्या कानाकोपऱ्यातून शिक्षणासाठी मुंबईत आलेल्या विद्यार्थ्यांची ओळख कालांतराने ‘मुंबईकर’ अशीच होते. ते मुंबईच्या रहाटगाडग्यात रमतात. सुटीच्या दिवशी मित्रांच्या ग्रुपबरोबर टाईमपास करण्यासाठी फोर्टात, कुलाब्याच्या गल्ल्यांत वा गेट वेला फेरफटका मारायचा. परवाच्या दिवशी ते गेट वेच्या प्रांगणात अवतरले ते ना स्वतःच्या मागण्यांसाठी, ना टाइमपाससाठी. देशकालस्थितीची चिंता त्यांना तेथे घेऊन आली होती. सलग दोन रात्री त्यांनी तेथे शब्दश: ठाण मांडले होते.

अनेक विद्यार्थी पहिल्यांदाच आंदोलनात
वस्तुतः गेट वे ही काही आंदोलनासाठीची जागा नव्हे. ‘२६/११’ च्या दहशतवादी हल्ल्यात ताज हॉटेलला लक्ष्य करण्यात आले होते. त्यानंतर गेटवेवर त्या हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. तेथे मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर दिल्लीतील ‘निर्भया’ बलात्कार प्रकरण, हैदराबादमधील रोहित वेमुलाची आत्महत्या, अशा काही घटनांच्या वेळी गेट वेवर लहान- मोठ्या संघटना मेणबत्ती मोर्चे काढले होते. रविवारी रात्रीपासून गेट वेवर झालेले हे मात्र पहिलेच ठिय्या आंदोलन. सोमवारी मुंबईत हुतात्मा चौकात, मुंबई विद्यापीठाच्या राजाबाई टॉवरच्या खालीही आंदोलने झाली. त्यात तरुणांचा भरणा जास्त होता. नंतर पोलिसांनीच इतर ठिकाणच्या आंदोलकांना गेट वेवर आणून सोडले. तेथील वातावरण पाहण्यासारखे होते. समुद्राच्या खाऱ्या हवेच्या झोतावर फडकणारे राष्ट्रध्वज, चळवळीतील गाण्यांचा सूर, मधूनच एखाद्या गटाकडून दिल्या जाणाऱ्या घोषणा, तर दुसरीकडे कोंडाळे करून बसलेल्या गटाचे डफलीवरील पोवाडा गायन असे भारावलेले वातावरण होते ते. कोण होती ही मुले? या विद्यार्थ्यांचा चेहरामोहरा आंदोलकांचा नव्हता. एरवी आपल्याच नादात असलेल्या उच्चभ्रू महाविद्यालयांतील मुले यात होती. उच्च मध्यमवर्गातील, सधन कुटुंबातील मुले उन्हात उभे राहून घोषणा देत होती. टाटा सामाजिक विज्ञान संस्था, ‘आयआयटी’, वैद्यकीय महाविद्यालये यांतील सामाजिक जाणिवा असलेले विद्यार्थी-विद्यार्थिनींचे गट त्यात होते. या आंदोलनात काही मुले विद्यार्थी संघटनेची राजकीय पार्श्‍वभूमी असलेली होतीच; पण असंख्य विद्यार्थी पहिल्यांदाच एखाद्या आंदोलनात उतरलेले आहेत, हे स्पष्ट दिसत होते.

१९९० नंतर पहिल्यांदाच मुंबईच्या रस्त्यांवर आंदोलनासाठी विद्यार्थी उतरल्याचं निरीक्षण डाव्या चळवळीतील कार्यकर्ते सुबोध मोरे यांनी व्यक्‍त केलं. मुंबईत १९७५नंतर विद्यार्थ्यांनी मोठी आंदोलनं केली. फीवाढ, शिष्यवृत्ती, मुंबई विद्यापीठातील भ्रष्टाचाराला विरोध असे त्यांचे विषय असत.  कुलगुरूंना घेराव, रस्ते अडवणं अशी आंदोलनं होत. त्यासाठी राजाबाई टॉवर, हुतात्मा चौक ही ठिकाणं ठरलेली होती. मोरे सांगतात, ‘पुण्यातील ‘पुसू’ या विद्यार्थी संघटनेनं मेडिकलच्या विद्यार्थ्यांच्या जागांमध्ये वाढ करावी, यासाठी आंदोलन केलं. मुख्यमंत्री भेटतो म्हणाले; पण दिवस मावळला तरी भेटले नाहीत. मग विद्यार्थी आंदोलकांनी मंत्रालयातच रात्रभर मुक्काम ठोकला. दुसऱ्या दिवशी सकाळी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील आले आणि, ‘तुम्ही फारच चिकट आहात रे,’ असे म्हणत मेडिकलच्या जागा वाढवून देण्याची मागणी त्यांनी पूर्ण केली.’

महाराष्ट्राच्या अस्मितेची निशाणी
स्वातंत्र्यपूर्व काळात ऑगस्ट क्रांती मैदान हे आंदोलनाचे केंद्र होते. संयुक्‍त महाराष्ट्राच्या आंदोलनानंतर हुतात्मा चौक महाराष्ट्राच्या अस्मितेची निशाणी ठरला. नंतर मात्र आंदोलने, मोर्चे आझाद मैदानाच्या एका कोपऱ्यात ढकलली गेली. या मैदानाचे नाव आझाद असले तरी, त्या ठिकाणी आंदोलन करण्याच्या मर्यादा आता जाणवू लागल्या आहेत. ही मर्यादा आहे ‘ऑप्टिक्‍स’ची - दृश्‍यात्मकतेची. आझाद मैदानात सतत आंदोलने सुरू असतात; पण मुंबईकर या आंदोलनांशी जोडला जात नाही. मुंबईतला गिरणी कामगार वर्ग संपुष्टात आला आणि मोर्चे, आंदोलनांकडे मुंबईकर त्रयस्थाच्या नजरेने पाहू लागले. आझाद मैदान, हुतात्मा चौक, शिवाजी पार्क अशा नेहमीच्या कुठल्याही ठिकाणावर विद्यार्थ्यांचे हे आंदोलन झाले असते तर त्याला असा जोर आला नसता; पण आजच्या विद्यार्थ्यांना ‘ऑप्टिक्‍स’चे महत्त्व जाणवलेले असावे. त्यांनी ‘ऑक्‍युपाय गेट वे’ केले. आंदोलनाच्या जागाही त्या आंदोलनात महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, हे यातून स्पष्ट व्हावे. मंगळवारी हे आंदोलन स्थगित झाले. त्यातून निर्माण झालेली गर्म हवा थंडावणार की काय ते पुढे दिसेलच. एक खरे, की या आंदोलनाने मुंबईतल्या तरुणाईला व्यक्त होण्यासाठी एक प्रशस्त प्रवेशद्वार मिळवून दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article deepa kadam on jnu attack protest