राजधानी मुंबई : सावित्रीबाई घरोघरी, पण...

मृणालिनी नानिवडेकर
Saturday, 7 March 2020

विधिमंडळात महिला सबलीकरणावर झालेल्या चर्चेत महिला सदस्यांनी तळमळीने मते मांडली. महिला सक्षमीकरणाचे दिवस पाहायचे असतील, तर पुरुषांच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा, असा त्यांचा सर्वसाधारण सूर होता. महिला दिनाचा उत्सव थोर होईल; पण महिला दीन असू नयेत यासाठी समाज बदलेल? 

विधिमंडळात महिला सबलीकरणावर झालेल्या चर्चेत महिला सदस्यांनी तळमळीने मते मांडली. महिला सक्षमीकरणाचे दिवस पाहायचे असतील, तर पुरुषांच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा, असा त्यांचा सर्वसाधारण सूर होता. महिला दिनाचा उत्सव थोर होईल; पण महिला दीन असू नयेत यासाठी समाज बदलेल? 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महिला दिन आजकाल सर्वत्र साजरा होतो. या निमित्ताने ‘महिला दीन का’ याची चर्चा झडते आणि गुलाब देत, हॉटेलात जात स्त्रीस्वातंत्र्याचे नवे पर्व साजरे होते. हिंगणघाटच्या भर चौकात पेटवून दिलेल्या तरुणीची होरपळ होते किंवा देश हलवून सोडणाऱ्या ‘निर्भया’च्या बलात्काऱ्यांना अद्याप फाशी होत नाही याचे सोयरसुतक अशा सोहळ्यांना असते काय? राज्यात महिलांवरील अत्याचारांत वाढ झाली आहे. २०१८ मध्ये बलात्काराच्या ४,९७४ घटना नोंदवल्या गेल्या, तर ६८२५ अपहरणाच्या घटना झाल्या. अंदाजानुसार २०१९ मधील बलात्काराच्या घटना आहेत ५,४१२, तर अपहरणाची प्रकरणे ८३८२. जीवनाच्या अनेक क्षेत्रांना महिला गवसणी घालू लागल्या आहेत; पण पुरुष मात्र बदलले नाहीत. त्यामुळे आधी बहुतांश वेळा कौटुंबिक हिंसाचारापर्यंत मर्यादित असलेली महिलांसंबंधीच्या गुन्ह्यांची व्याप्ती वाढली.

‘महिला आधुनिक झाल्या, त्यांचा पेहराव बदलला,’ असे आक्षेप घेणाऱ्या पुरुषांच्या मनोवृत्तीत या मन्वंतरादरम्यान बदल झाला काय? सामाजिक कार्यकर्ते भीम रासकर व राजकारणात उमेदवारी करणाऱ्या त्यांच्या सहचरी नीला लिमये महिला राजसत्ता आंदोलन चालवतात. स्थानिक स्वराज्य संस्थांतले महिला आरक्षणाचे फायदे तळागाळात पोहोचवणाऱ्या त्यांच्या आंदोलनाचे घोषवाक्‍यच आहे : सावित्रीबाई घरोघरी, पण जोतिबांचा शोध जारी. महिलांना बदलायचे आहे, त्यांच्यात प्रचंड ऊर्जा आहे; पण त्यांना बदलू देणारे पुरुष कुठे आहेत? महिला दिनाच्या सिल्की सोहळ्यात न अडकता विचार करावा असे हे विधान आहे.

पुरुषांच्या मानसिकतेत बदल हवा
महिला दिनाच्या निमित्ताने या वेळी मंत्रालयातील महिलांचे गुलाबपुष्प देऊन मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीतल्या पत्राने स्वागत झाले. सुट्या असल्याने महिला दिन आधीच साजरा झाला. विधिमंडळात अध्यक्ष नाना पटोले आणि सभापती रामराजे निंबाळकर यांच्या पुढाकाराने महिला सबलीकरणावर चर्चा झाली. दोन्ही सभागृहांत चर्चा झाली, तेव्हा पुरुषांची उपस्थिती तुरळक होती. चारचौघे हजर राहिले आणि एकदोघे बोलले. सर्वाधिक चर्चेत असणारे तरुण आमदार रोहित पवार हजर होते, तर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी उत्तम प्रतिपादन केले. महिला हक्‍कांची सनद तर केव्हाच तयार झाली, महिला धोरण महाराष्ट्रात सर्वप्रथम तयार झाले, पण अंमलबजावणीचे काय? कायदा व सुव्यवस्था, राज्यातील महिलांवर होणाऱ्या अत्याचारांची प्रकरणे सालाबादाप्रमाणे समोर आली आणि सत्ताधाऱ्यांनी उत्तरे दिली. दरवर्षीच्या या आन्हिकाला सामोरे जाताना या वेळी जरा चांगला प्रकार घडला तो चर्चेचा. 

उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे महिला चळवळीतल्या, पण खरी बाजी मारली ती निवडून आलेल्या नव्या महिला सदस्यांनी. यामिनी जाधव या शिवसेनेच्या मुंबईतल्या आमदार. पतीमुळे राजकारणात आलेल्या. त्यांनी या प्रस्तावावर जे सर्वंकष मंथन केले ते कुठल्याही महिला चळवळीतल्या विचारवंतीय प्रतिपादनापेक्षा पुढचे. महिला सक्षमीकरणाचे दिवस पाहायचे असतील, तर पुरुषांच्या मानसिकतेत बदल व्हायला हवा, असा महिला सदस्यांचा सर्वसाधारण सूर होता. सभागृहातल्या आमदार या राज्यभरातल्या महिलांच्या प्रतिनिधी. त्यांच्या मुखाने महाराष्ट्रातल्या महिलाच बोलत होत्या. भारती लव्हेकर उत्तम बोलल्या. सरोज अहिरे, श्‍वेता महाले, गीता जैन, सुलभा खोडके, देवयानी फरांदे, प्रतिभा धानोरकर, मोनिका राजळे, मंदा म्हात्रे, मेघना बोर्डीकर यांनी कधी एकत्रित कुटुंबाची गरज व्यक्‍त केली, तर कधी कायद्याच्या अंमलबजावणीची. सगळ्याच जणी अद्याप साकल्याने विचार करू शकतात असे नव्हे, पण त्यांना पुरुषांनी बदलावे असे वाटते. आज महिलांना अनुकूल असलेल्या कायद्यांमुळे पुरुष ‘गरीब बिचारे’ ठरत आहेतही; पण खरी गरज शारीरिकदृष्ट्या शक्तिमान ठरणाऱ्या या वर्गाच्या चिंतनात बदल होण्याची आहे.

‘दिशा’तल्या त्रुटींवर बोट  
‘दिशा’ कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी गृहमंत्री अनिल देशमुख आंध्रात जाऊन आले, त्यांनी सर्व महिला सदस्यांची या कायद्याबाबत बैठक बोलावली. मनीषा कायंदेंनी तेथे ‘दिशा’तल्या त्रुटींवर बोट ठेवले. वर्षा गायकवाड, यशोमती ठाकूर, आदिती तटकरे या महिला मंत्री हजर होत्या. त्या सगळ्याजणींचे एकमत झाले ते पुरुषांनी स्त्रीबद्दल संवेदनशीलता बाळगल्याशिवाय समाज बदलायचा नाही यावर. न्यायालये गतिमान व्हावीत, पोलिस ठाण्यातले वातावरण महिलांना दिलासा देणारे असावे, असे बरेच सुचवले गेले. बदल हे मनातून होतात, मगच कायदे प्रभावी ठरतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिषदेत ‘या चर्चेला अर्थ नाही, आपले संस्कार कमी पडताहेत,’ अशी प्रांजळ कबुली दिली. त्यांची ही तळमळ धाकात बदलेल? महिला दिनाचा उत्सव थोर होईल, पण महिला दीन असू नयेत यासाठी समाज बदलेल?


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article mrunalini nanivadekar on women Empowerment