राजधानी मुंबई : बलिष्ठांवर खैरात, वंचितांकडे पाठ

Uddhav-Thackeray
Uddhav-Thackeray

राज्याच्या तिजोरीत खडखडाट आहे. अशा परिस्थितीत खरे तर सरकारची कसोटी लागते; पण संकटाला तोंड देण्यासाठी तशी दृष्टी हवी. स्टॅम्पशुल्कात सवलत दिल्याने घरविक्रीने वेग घेतला, हे बरेच झाले. पण दारूविक्री परवानाधारकांना, टोलवसुली करणाऱ्यांना सवलत देण्यामागची कारणे अतर्क्‍य आहेत. 

सरकारे लोककल्याणाची काळजी घ्यायला स्थापन झाली असतात हा सर्वसामान्य समज. पुस्तकी धारणाही अशाच समजाला खतपाणी देत असतात. सरकारने ‘आहे रें’ च्या खिशातून कर काढावा अन तो सवलतींच्या रुपात गरजूंपर्यंत पोहोचवावा, ही माफक अपेक्षा. पण महाविकास आघाडी सरकारला याचे सोयरसुतक नसावे. इथे चाळकरी, झोपडीवासीयांच्या विजबिल कपातीसाठी निधी नाही; पण मद्य परवान्यात सवलत मिळते आहे.

कोविडकाळात मोदी सरकारने गरजवंतांना नाममात्र दरात धान्य उपलब्ध करून दिले, हे बरे झाले, हा समज त्या भावनेतून जन्मलेला. केंद्र सरकार मदत करते आहे अन्‌ राज्य सरकारनेही करावी अशी अपेक्षा. ती पूर्ण होत नाही, याचे कारण महाराष्ट्राच्या तिजोरीत खडखडाट आहे. जीएसटी करप्रणालीत उत्पन्नाचे सर्व स्त्रोत केंद्राकडे एकवटले आहेत आणि महाराष्ट्राची तब्बल २२ हजार ४८५ कोटींची थकबाकी मिळत नसल्याने राज्यावर आर्थिक ताण आहे खर्च कमी करणे ही अपरिहार्यता ठरली आहे, विकासकामे ठप्प पडली आहेत, असे समज रुढ आहेत. या आर्थिक कोंडीतून बाहेर पडण्यासाठी केंद्राने सुचवलेल्या ‘तुमचे तुम्ही उभारा कर्ज’ फॉर्म्युलाचे लोकांना काही पडले असेल नसेल; पण महाविकास आघाडी सरकार नको त्या घटकांना अनावश्‍यक मदत करत असल्याची धारणा पसरावी, असे निर्णय होत आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आर्थिक क्षेत्रात धनवानांवर सवलतींचा वर्षाव होतो आहे. गरीब असाल तर रडत रहा; अन सरकारला मदत करणारे बांधकाम कंत्राटदार असाल तर मलिदा खा, असा महाराष्ट्राचा शिरस्ता झाला आहे. दारूवरील उत्पादनशुल्क हे सरकारच्या उत्पन्नाचे महत्वाचे साधन. जीएसटीव्यवस्थेत केंद्राकडे सगळे उत्पन्न स्त्रोत वळले, तेव्हा उत्पादनशुल्क वाढवायचे का असा प्रस्ताव विचारात आला. फडणवीस सरकारच्या काळातही चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंत्री या नात्याने दारूविक्री परवान्यांचा लिलाव करण्याची योजना आखली होती.

पैशापासरी दारु झाली, तर महाराष्ट्र कशाला म्हणावे, ‘मद्यराष्ट्र’ संबोधावे असे शेरे अभय आणि राणी बंग यांच्यासारखे सामाजिक कार्यकर्ते मारतात. ते योग्य असतात, तरीही त्याकडे दुर्लक्ष करत दारूदुकाने वाढवली जातात ती महसुलाकडे डोळे ठेवून. या सरकारने दारु दुकानदारांवर खैरात केली आहे. लॉकडाउनच्या काळात प्रारंभी विक्रीला परवानगी नव्हती, त्यामुळे गरीब दुकानदारांचे जे नुकसान झाले ते भरून काढण्यासाठी दौलतजादा करण्यात आली आहे. परवानाशुल्कात जी १५ टक्के वाढ झाली होती, ती मायबाप सरकारने मागे घेतली आहे. 

काठोकाठ भरू द्या पेला...
कोविडच्या धक्‍क्‍यातून सावरण्यासाठी ’काठोकाठ भरू द्या पेला ,दु:ख महासाथीचे विसरू द्या ’ असे म्हणणाऱ्या जनांना आधार देण्याचे काम सुरू आहे. वीज बिल भरण्याची क्षमता कर्ज काढून मिळवता येईल; पण दारुसाठी मदत नको का, असा बहुधा त्यांचा प्रश्‍न असावा. टोलवसुलीतून गब्बर झालेल्या कंत्राटदारांनाही सरकारने मदत केलीच. काही काळ टोलवसुली होवू न शकल्याने भरपाईचा निर्णय झाला. पायाभूत सुविधा उभारणाऱ्यांच्या पाठीशी उभे रहायला हवेच; पण ज्या महामार्गातून हजारो कोटी बांधकाम व्यावसायिकांनी वसूल केले आहेत, त्यांचे हप्ते महाग करण्याचे कारण काय?

लॉकडाउनचा घरबांधणीवर जो परिणाम झाला आहे, तो दूर करायला बांधकाम व्यावसायिकांना ते सरकारी तिजोरीत जो निधी भरतात त्यातून सवलत देण्याचा प्रस्ताव दीपक पारीख समितीने ठेवला. त्यानुसार प्रिमियम माफीचा निर्णय होऊ घातला आहे. बांधकाम व्यावसायिक चोर नव्हेत. कठीण काळात त्यांना सवलती देण्याचा विचार चांगलाच; पण या सवलतीचा लाभ घर विकत घेणाऱ्यांपर्यंत पोहोचण्याची शाश्वती काय? उद्धव ठाकरेंचे सरकार अनुभवी मंत्र्यांचे. स्टॅम्पशुल्कात सवलत दिल्याने घरविक्रीने वेग घेतला, हे बरेच झाले. पण दारूविक्री परवानाधारकांना, टोलवसुलकांना सवलत देण्यामागची कारणे अतर्क्‍य आहेत. खरे तर अशा निर्णयांना विरोधातील भाजपने प्रखर विरोध करायला हवा. पण या पक्षाचे नेते संपत्तीचे शिसारी आणणारे प्रदर्शन करणाऱ्या विवाह सोहळ्यांना हजेरी लावण्यात दंग आहेत. कोविड महासाथीने पिचलेल्या जनतेला कुणी वाली नाही. गरीबांसाठी काम करावे, कर श्रीमंतांवर लावावेत, समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या दारू उत्पादकांवर कर जास्त असले तर बरेच, हे समज तकलादू ठरताहेत. पुस्तकी शिकवणी पुस्तकात. चालायचेच असे म्हणायचे अन भाकरीचा चंद्र शोधायचा झाले!

रात्रीस खेळ चाले...कोरोनाचा 
महाविकास आघाडी सरकारचे काही समज अफलातून आहेत.दिवसा झुंडी फिरल्या तर कोरोना होत नाही किंवा सूर्यप्रकाशाचे त्याला वावडे आहे, असे या बुद्धिमानांना वाटत असावे. रात्री अकरानंतर कोरोना अधिक सक्रिय होता , उसळतो हे कसे कळले,ते सांगावे ही जनतेची, शास्त्रज्ञांची कळकळीची विनंती. रात्री कोरोना विषाणू जेरबंद करीत दिवसा तो मोकाट सोडण्यामागे नाईटक्‍लबने लक्ष्मीदर्शनाचा खर्च केला नाही, असे तर नाही ना अशी शंका पसरली आहे. शंकेचे रुपांतर आधी संशयात अन लगेचच समजात होते हे सुज्ञास सांगणे न लगे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com