‘भारतरत्न’चे राजकारण

‘भारतरत्न’चे राजकारण

मध्यरात्र उलटल्यावर शहरातील चौकात एका चौथऱ्यावर भेटलेल्या पाच पुतळ्यांची कविता त्या महामानवांची वेदना तीव्रतेने आपल्यापर्यंत पोचविते. संवेदनशील, देशप्रेमी नागरिकाच्या अंगावर काटा आणणारी ही कविता आहे. सध्या महापुरुषांच्या नावांचा वापर ज्या पद्धतीने राजकीय फायद्यांसाठी केला जात आहे, ती बाब धक्कादायक आहे. जातीपातीचे राजकारण असते मुळात विभाजक. त्यात धर्माचे, पंथाचे पाठभेद शिरले की ते ठरते विदारक अन्‌ एकाच विचाराच्या दोन पक्षांनी त्याचे राजकारण सुरू केले की ते ठरते विद्वेषक. गेल्या वेळी वेगळे लढून दोन पक्ष नंतर एकत्र आले. या वेळी उलटे झाले. लढले एकत्र अन्‌ नंतर झाले वेगळे. सत्तालालसा परस्परसंबंध ठरवतेय सध्या. पण एकेकाळी सत्ता अप्राप्य असल्याने हिंदुत्ववादी राजकारण हा दोघांनाही जोडणारा धागा होता. आज वेगळे झाल्यावरही या मतपेढीवर भाजप आणि शिवसेना हे दोघेही हक्‍क सांगत आहेत. त्यासाठी वैचारिक प्रतीके आपापल्या दिशेने ओढली जात आहेत. किमान समान कार्यक्रमानंतरही शिवसेनेचे ‘चलो अयोध्या’ आहेच अन्‌ भाजप त्यांना अडचणीत आणायला कधीही न मांडलेल्या ‘सावरकर गौरव ठरावा’चा आग्रह धरते आहे. या हिंदुत्वाच्या साठमारीत स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या नावाचा जो वापर केला जात आहे, तो निंद्यच आहे.

महापुरुषांचे जीवन तसेही सरळ, एकरेषीय नसतेच. सावरकरांसारखे व्यक्तिमत्त्व तर वादळी होते. त्यांच्याविषयीच्या काही प्रवादांवर चर्चा होऊही शकते; पण त्यापेक्षाही महत्त्वाचे ठरते ते त्यांना ‘भारतरत्न’ मिळावे काय, याबद्दल सुरू असलेले राजकारण. समाजजीवनात, राष्ट्राच्या वाटचालीत योगदान देणारा कुणीही सच्चा माणूस देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान मिळावा यासाठी मोर्चेबांधणी करत नसतो. त्यासाठी पुढे येतात ते अनुयायी. स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा नेहरू-गांधींना केंद्रस्थानी ठेवून लिहिला गेला ही उजव्या विचारसरणीची ठसठस. नेहरू-गांधी परिवाराच्या वरचष्म्याला विरोध करण्यासाठी सावरकर, सुभाषचंद्र बोस यांची चरित्रे मग प्रतीक पर्याय म्हणून प्रखरपणे समोर आणली गेली. वाजपेयी सरकार केंद्रात सत्तारूढ झाल्यानंतर संसदेत सावरकरांचे तैलचित्र लावले गेले ते विचारसरणीला लोकमान्यता मिळाल्याने. खरे तर मतभेदांना तिलांजली देत देशाने भविष्याकडे वाटचाल करायची असते; पण ज्या संस्कृतीत मंदिरप्रवेशाचे मुद्दे आजही वादविषय ठरतात, तेथे महापुरुषही ‘तुमचे ते’ अन्‌ ‘आमचे हे’ अशा विभाजनात वाटले जातात. 

काँग्रेसचे सध्याचे नेतृत्व बेरजेच्या राजकारणाचे भान नसलेले. ‘मी राहुल- सावरकर नाही’ असे गांधी घराण्याचे वारस अकारण म्हणतात अन्‌ वादाच्या आगीत विधानांच्या मोळ्या पडतात. खरे तर सावरकरांचे योगदान आणि मराठी माणसातले त्यांचे स्थान लक्षात घेत महाराष्ट्राच्या विधिमंडळातही त्यांचे तैलचित्र लावण्यात आले. दादरमध्ये सावरकर स्मारकासाठी ज्येष्ठ नेते जयंतराव टिळक यांनी स्थानिकांना मदत करत पाठविलेला प्रस्ताव वसंतदादा पाटील, शरद पवार अशा तत्कालिन राज्यप्रमुखांनी प्रत्यक्षात आणला. सर्वसमावेशकतेची, सामोपचाराची ही काँग्रेस संस्कृती आज पक्षनेतृत्वाच्या भीतीने दूर ठेवली जाते. ‘सावरकरांचे योगदान मोठे आहे,’ असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेसची बाजू स्पष्ट केली. काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांनी मात्र कुणी चुगली केली, तर राहुलजींची मर्जी फिरायची या भीतीने कणाहीन वागणे पत्करले.

आश्‍वासनाचे विस्मरण?
 हिंदुत्ववादी पक्षांचे वर्तनही तपासण्यासारखे. सावरकरांना ‘भारतरत्न’ देण्याचा विषय भाजपने विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात नमूद केला. देशाचा कारभार आपल्या मर्जीनुसार चालवायची या पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाची वृत्ती. अमित शहा तर सावरकरभक्‍त, पहिला ब्लॉग सावरकरांना समर्पित करणारे. ‘भारतरत्न’साठी पंतप्रधानांनी राष्ट्रपतींच्या कार्यालयाला शिफारस करणे एवढाच काय तो नियम अन्‌ निकष. तरीही पक्षाला या आश्‍वासनाचा विसर पडतो आहे, की राजकारण करीत हा विषय तापवत ठेवायचा आहे? सावरकरांबरोबर फडवणीस सरकाने महात्मा जोतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या नावांचीही शिफारस ‘भारतरत्न’साठी पाठविलेली आहे. त्याचे पुढे काय झाले?

मतांकडे डोळे ठेवून दक्षिणेतील एम. जी. रामचंद्रन यांना या सन्मानाने गौरविले गेले, त्याच दिवशी या सर्वोच्च सन्मानाचे राजकारण सुरू झाले. ते दु:खद आहे. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणाऱ्यांचा या सन्मानासाठी विचार करावा काय, याचा विचार जरूर व्हावा, पण स्वातंत्र्यवीर सावरकर, महात्मा जोतिराव फुले किंवा क्रांतिकारक भगतसिंग या महापुरुषांची नावे वापरत ‘भारतरत्न’चे राजकारण होऊ नये. दिवंगत राष्ट्रपुरुषांना मरणयातना कितीदा द्यायच्या?

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com