थबकलेल्या चाकांना गती

Local
Local

मुंबईची जीवनवाहिनी असलेली उपनगरी रेल्वेसेवा सुरू होत असल्याने प्रगतीची आणि जगण्याची चाके पूर्ण गतीने धावू लागतील. तरीही कोरोनाची छाया लक्षात घेवून सामाजिक जबाबदारी आणि व्यक्तिगत काळजी यांचा मेळ घालावा लागेल.

कोरोना महासाथीशी जुळवून घेत जगण्याचे आता जगाने ठरवलेय, नाईलाज आहे. वर्षभरात प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. कोविड प्रोटोकॉल वैद्यकीय क्षेत्रात रुजला आहे, अन्‌ लसदेखील उपलब्ध आहे. महासाथीने जीव तर घेतलेच, पण रोजगाराचेही बळी गेले आहेत. सर्वेक्षणांद्वारे काही जिल्ह्यात ३०टक्के तर काही भागात तब्बल ६५टक्के रोजगार संपल्याचे निदर्शनाला आले आहे. जग पूर्ववत होईल का माहीत नाही, पण जनजीवन सुरळीत करावे लागते आहे. मुंबईत सगळा सुरळीतपणा अवलंबून असतो तो लोकलवर. लाखो मंडळी दररोज मुंबईतून इकडे तिकडे जातात. अर्धा युरोप दररोज घराबाहेर पडतो अन्‌ घरी परततो. मार्चपासून ठप्प झालेली ही ये-जा आता सुरु होत आहे.

सुमारे ४५टक्के मुंबईकर राहतात अत्यंत दाटीवाटीने. झोपडीत किंवा चाळीत. तेथे साथीच्या फैलावाचे भय सर्वत्र. हातावर पोट असणारी ही मंडळी आता घरात थांबूही शकत नाहीत. त्यामुळेच केंद्र आणि राज्य सरकारने एकत्रित निर्णय घेत लोकलसेवा सुरु करण्याचा निर्णय घेतला असावा. बसगाडीतून कोंबून जाणारी ही गर्दी सहा महिन्यांपासून मुंबईत वावरते आहेच. नोकरदार महिलांचा तीन-साडेतीन तासांचा अवधी प्रवासात जातो. ३०रुपयांत होणारा प्रवास दिवसाला अडीचशे-तिनशे रुपये मोजून वसूल करतोय. यामुळे आता पूर्वीच्याच वाटा धुंडाळल्या जात आहेत. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेल्या सहा महिन्यांत मुंबईच्या आयुक्तपदाची जबाबदारी इक्‍बालसिंग चहल यांनी स्वीकारल्यानंतर महानगरातील साथ बऱ्यापैकी नियंत्रणात आली आले. निदान तसे दिसते तरी आहे. सिरो सर्व्हेनुसार कोरोनाचा संसर्ग प्रचंड प्रमाणात फैलावला आणि आता नियंत्रणात आहे. जीवन पूर्ववत होते आहे. महाराष्ट्राच्या अन्य भागात जनजीवन सुरळीत सुरू झाले होतेच. सर्वाधिक प्रभावित पुणे-मुंबईचा भागही आता पूर्ववत होतोय. फक्त प्रश्न आहे तो यातून समूहमानस शिकले काय? खरे तर कोंडवाड्यात जगणाऱ्या मुंबईकरांना नवे मार्ग खुले करणे आवश्‍यक आहे. मुंबईचे शांघाय करणार की सिंगापूर घोषणा खूप होतात; पण मुंबई स्वच्छही ठेवता येत नाही. रोजगार घराजवळ असावेत, वाहतूककोंडीतला वेळ कमी व्हावा असे नियोजन तर होते, पण प्रत्यक्षात त्यातले काहीही उतरत नाही. स्पॅनिश फ्लूची साथ १००वर्षांपूर्वी आली. पुण्यातला प्लेग तर कुप्रसिद्धच आहे. घरे सोडून कुटुंबे जंगलात गेली अन्‌ साथ संपल्यावर सगळे घरोघरी परतले. त्यानंतर व्यवहार पूर्ववत झाले. कोरोनाकाळात विलगीकरण झाले आणि पुन्हा सगळे सुरु झाले. पण यातून आपण शिकलो तरी काय? 

बदल अटळ
आव्हानांचा वेध घेण्याचा प्रारंभ मुंबईसारख्या साहसवादी महानगरातून व्हायला हवा. खरे तर या काळात कितीतरी बदलले. जगण्याच्या संकल्पना बदलल्या. जीवन क्षणभंगूर असल्याच्या साक्षात्काराने मन ढवळून निघाले. ज्या तंत्रज्ञानाच्या नावाने बोटे मोडली जायची, त्याचीच कास धरून घरून काम सुरु झाले. असंघटित क्षेत्रातले रोजगार आक्रसले. त्यांना आधार देणाऱ्या संघटित क्षेत्रावर गदा आल्यामुळे हे होणे अपरिहार्य होतेच. मायबाप सरकारने धान्य पुरवल्यामुळे लोक जगू शकले. मजल दरमजल करत गेलेले तांडे पाहून राज्यकर्ते सावध झाले. आज गावी गेलेली मजूर मंडळी महानगरे जवळ करताहेत. गावात रोजगार नसल्याने पुन्हा शहरातल्या नरकयातनात जीवन फेकावे लागते आहे. व्यवस्था परिवर्तन सोपे नसतेच. वर्तमान अस्वस्थ आहे, त्यातून भविष्य घडवायचे आहे. हे आव्हान पेलावे लागेल. स्वच्छ मनाने एकूण व्यवहाराकडे पाहावे लागेल, बदल करावे लागतील.

हवे जबाबदारीचे भान!
मुंबईतील प्रवाशी वाहतूक विघ्नरहित हवी ही मनोकामना प्रत्येक सरकारची असते. विरार किंवा डोंबिबलीवरून चर्चगेट, छत्रपती शिवाजी टर्मिनस गाठणारे प्रवासी किमान एक तास एकमेकांसमवेत असतात. एकेका डब्यात ४०जण बसू शकतात, पण बसतात ते अडीचशेवर तेही कोंबूनच. यातली एक जरी बाधित व्यक्ती शिंकली तरी अवघ्या डब्यात जंतूंचा फैलाव होण्याची भीती असते. त्यामुळेच सरकारने जरी काळजी घेतली तरी नागरिकांनीदेखील कोरोनाबाबतच्या प्रतिबंधात्मक बाबींचे पालन केले पाहिजे. मास्क अनिवार्यपणे वापरावा. वरचेवर हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे, कोणतीही आरोग्यविषयक तक्रारी किंवा लक्षणे असतील तर सार्वजनिक ठिकाणी न जाणे याचे पालन केले पाहिजे. सामाजिक जबाबदारीचे भान हवेच हवे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com