चिंता बृहन्मुंबईची

मृणालिनी नानिवडेकर
Saturday, 4 July 2020

राज्यातल्या ‘कोरोना‘ पॉझिटिव्ह रूग्णसंख्येपैकी ३१ टक्के रुग्ण एकट्या ठाणे जिल्हयातील आहेत. ठाणे, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मीरा- भाईंदर, वसई- विरार या महापालिकांत रुग्णसंख्या वाढते आहे. 

विस्तार कायमच वेध घेतो दशदिशांचा. विकास असो की संसर्ग, सारे काही व्यापून टाकण्याची ओढ आणि खोड आता प्रश्न निर्माण करते आहे. मुंबईतील रुग्णसंख्या कमी होते आहे, तसे चित्र दिसते तरी आहे, पण आजूबाजूची नियोजनशून्य महानगरे आता ‘कोरोना’ग्रस्त होण्याच्या धास्तीने प्रशासन हादरले आहे. मुंबई परिसरातील नऊपैकी सहा महापालिका आज अस्वस्थ आहेत. त्यांची अनेक बाबतीत झालेली ‘मुंबई’ कोरोना संसर्गाबाबत अपवाद ठरावी यासाठी हालचाली सुरू आहेत अगदी युद्धस्तरावर.

नगरनियोजनाचा विचारच नाही
भरावाच्या बेटांची मुंबई लेकुरवाळी. अंगाखांद्यावर माणसे वसली आणि मग सांदेकपारीतही घुसली. लोकसंख्येचा हा स्फोट आवरणे अशक्‍य झाल्यावर मग नवी मुंबई, पर्यायी मुंबई वसवण्याचे प्रयत्न झाले. मुंबईचा हा परिसर आता एकत्रितपणे ‘एमएमआर’ या नावाने ओळखला जातो. चौरस किलोमीटरात आकारमान ४४२५ एवढे, पण वस्ती जेमतेम ६१९ चौरस फुटांवर. घनता किती तर एका चौरस फुटामागे किमान ४० ते ४२ हजार लोक राहात असावेत, असा अंदाज. हा अख्खा परिसर राजकारण्यांसाठी केवळ रिअल इस्टेट, चरण्याची कुरणे. त्यामुळेच या महाविस्तारलेल्या शहरात उत्तम नगरनियोजनाचा विचार झालाच नाही. वाहतूक नीट नाही, अग्निशमन यंत्रणा नाहीत. आरोग्यसेवा देशभर जेमतेम दोन टक्के खर्चाच्या हक्कदार. त्यामुळे आज लॉकडाउनला शंभर दिवस उलटल्यावर पुन्हा एकदा देशातील सर्वात महत्त्वाच्या महानगराशेजारच्या नऊपैकी सहा महापालिकांत टाळेबंदी लागू झाली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

रुग्णसंख्येत वाढ 
शंभर दिवसांनंतर मुंबईत कूर्मगतीने का होईना, पण ‘कोरोना’ची स्थिती जरा काबूत आल्याचे चित्र आहे. रुग्णांना उपचारांसाठी खाटा मिळू लागल्या आहेत. चार टक्‍क्‍यांवर गेलेला मृत्यूदर खाली येईल, अशी आशा केली जात असतानाच या उपग्रह शहरांतील ‘कोरोना’चा कहर काळजीत भर घालतो आहे. राज्यातल्या ‘कोरोना‘ पॉझिटिव्ह रूग्णसंख्येपैकी ३१ टक्के रुग्ण एकट्या ठाणे जिल्हयातील आहेत. ठाणे, कल्याण- डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, मीरा- भाईंदर, वसई- विरार या महापालिकांत रुग्णसंख्या वाढते आहे. खरे तर ‘कोरोना’ मुंबईतून या शहरांत प्रवेशला. पूर्वी उपनगरात राहणाऱ्यांची कुटुंबे विस्तारली आणि नव्या जागांसाठी मग उपनगरी रेल्वेने जोडली गेलेली ही गावे विस्तारली. नोकरदारांच्या निवास गरजांवर गावठाणे बदलली. बदलातील संधी एकेकाळी मुंबापुरीला वेढून राहिलेल्या गुन्हेगारी जगताने हेरली. त्यामुळेच शहरे सुदृढ झाली नाहीत तर सुजली. त्यामुळे ‘कोरोना’सारख्या भयावह आजाराला दोन हात करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात कसे असणार? एक जुलै रोजी मुंबईतील ‘कोरोना’मृत्यूंची संख्या ५७ एवढी नोंदवली गेली होती, तर मुंबईबाहेर १२५ मृत्यू होते. नवे रुग्ण मुंबईत  १५५४ होते, तर मुंबईबाहेर तब्बल ६३३०. यातील पुणे, औरंगाबाद, नागपूरचा अपवाद वगळता बहुतेक लगतच्या उपग्रह शहरांतले. या महानगरांत आरोग्यसुविधा चांगल्या नसल्याने रुग्ण मुंबईत दाखल होत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने ‘कोरोना’समवेत जगणे हे ‘न्यू नॉर्मल’ असेल असे सांगितले असल्याने मुंबईच्या आजारी सार्वजनिक आरोग्य यंत्रणेवर पडणारा ताण हा चिंतेचा विषय असेल. मुंबईत ज्याप्रमाणे जम्बो आरोग्यसुविधा उभारल्या जात आहेत, त्याच धर्तीवर या महापालिकांतही प्रयत्न करावे लागतील. संसर्ग फैलावतोय हे लक्षात आल्यावर या महापालिकांचे प्रमुख बदलले गेले. ते पुरेसे असते काय ? या महानगरांतून अर्ध्याहून अधिक लोकसंख्या मुंबईच्या मुख्य भूमीत नोकरी-व्यवसायाला जाते. आता लोकलप्रवासाची परवानगी नसल्याने अडचण आहे. दोन महिन्यांपूर्वी ठाणे महापालिकेने मुंबईत नोकरी करणाऱ्यांनी परतू नका असा आदेश खबरदारी म्हणून काढला होता, तो मागे घेतला गेला. ‘कोरोना’ असा आदेशबद्ध नसल्याने फैलावतो आहे. त्यावर मार्ग काढण्यासाठी धारावीप्रमाणेच या भागांकडे लक्ष द्यावे लागेल. महानगरांचे उत्पन्न ‘जीएसटी’मुळे कमी झाले आहे. नागरीकरण आव्हान घेऊन येत असते. तेव्हा या भागांना वेगळी वागणूक देऊन चालणार नाही.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mrunalini naniwadekar writes article about corona bmc